CAA: 'शाहीनबागचे हट्टाला पेटलेले आंदोलक एक प्रकारचे दहशतवादीच'- केरळचे राज्यपाल #5मोठ्याबातम्या

आरिफ मोहम्मद खान
फोटो कॅप्शन,

आरिफ मोहम्मद खान

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'शाहीनबागचे हट्टाला पेटलेले आंदोलक एक प्रकारचे दहशतवादीच'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (CAA) विरोध करणाऱ्यांवर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"लोकशाहीत असहमतीला स्थान आहे. पण समजा विज्ञान भवन बाहेर पाच जण ठाण मांडून बसले आणि मागणी पूर्ण होईपर्यंत हटणार नाही, असं ते बोलू लागले म्हणजे हे पण एक दहशतवादाचं दुसरं रूप आहे," असं राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले.

शाहीनबागमध्ये CAAविरोधी आंदोलनासाठी बसलेल्यांवरही त्यांनी टीका केली.

ते म्हणाले, "रस्त्यावर आंदोलनासाठी बसलेल्यांमुळे जनजीवनावर परिणाम होतोय. अशाप्रकारे आपले विचार दुसऱ्यांवर लादणं म्हणजे दहशतवादच आहे. आक्रमकता फक्त हिंसेचं स्वरूप नसतं. ती अनेक रूपात दिसून येते. तुम्ही माझं ऐकलं नाही, तर मी सामान्यांचा जीवन विस्कळीत करून टाकेन, याही रुपात ती दिसते."

2. सुप्रिया सुळे - 'माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय'

पैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात संजय वाघचौरे आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वाद झाला.

यावेळी संतप्त झालेल्या खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावत म्हटलं, "माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल, तर गाठ माझ्याशी आहे."

फोटो स्रोत, Getty Images

"आपण मोठे झालो आहोत, मॅच्युअर झालो आहोत. हुल्लडबाजी आपल्याला शोभत नाही. नवीन कार्यकर्ता असा वागला तर समजू शकतो. हुल्लडबाजी करणारे मॅच्युअर आहेत. सर्वांचे केस पांढरे झाले आहेत. मात्र, गोदरेजने ते रंगविल्याचे दिसते, ती गोदरेजची जवानी आहे." लोकमतनं ही बातमी दिलीय.

3. 'मुसलमानांना 1947लाच 'पाकिस्तानात' पाठवून द्यायला हवं होतं'

"जेव्हा आमचे क्रांतिकारी देशासाठी लढत होते तेव्हा जिन्ना हिंदुस्तानला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा कट रचत होते. आपल्या पूर्वजांनी एक मोठी चूक केली व त्याची किंमत आपण चुकवत आहोत. जर मुस्लीम बांधवांना त्यावेळीच पाकिस्तानात पाठवले असते आणि हिंदूंना इथे एकत्र आणले असते. तर आज ही परिस्थिती नसती," असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी केलं आहे. दैनिक भास्करनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Giriraj Singh/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

गिरीराज सिंग

बिहारमधील पूर्णिया येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी त्यांनी CAAबाबत बोलताना म्हटलं, "भारतवंशीयांना या देशात आसरा नाही मिळणार तर कुठे मिळणार?"

4. देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत- भय्याजी जोशी

"देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. तसंच त्यांना फार काळ माजी मुख्यमंत्रीही म्हणता येणार नाही," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नागपुरात केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, "देवेंद्रजी यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसेच माजी मुख्यमंत्रीपदीही अल्पायु आहे. लोकशाहीत कमी अधिक घडत असते."

नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं आहे. या देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

5. 'माझ्या मुलीचे पाय तोडा'

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्याचा प्रकार घडला होता. अमुल्या लिओना नावाच्या तरुणीनं व्यासपीठावर जाऊन घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी तिच्या वडिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

त्यांनी म्हटलं, "माझ्या मुलीला जेलमध्ये खितपत राहू द्या, पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर तिचे पायही तोडून टाका."

"अमुल्याने CAA रॅलीमध्ये जे काही केलं ते अयोग्य होतं. तिचे हे कृत्य माफ करण्या लायक नाही. मी तिला अनेक वेळा या आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.पण तिने माझं काही ऐकलं नाही. मी ह्रदयविकाराचा रुग्ण आहे. काल रॅलीला जाण्याआधी तिने माझ्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर ती घरातून निघून गेली. आमच्यात काहीही बोलणं झालं नाही," असंही तिच्या वडिलांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)