गाडगेबाबांच्या महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज जेव्हा लोकप्रिय होतात

  • श्रीकांत बंगाळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
गाडगेबाबा

महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभली आहे. या संतांपैकी एक डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगेबाबा. आज गाडगेबाबा यांचा जन्मदिन. संत गाडगेबाबा हे फक्त संतच नव्हते तर ते समाजसुधारक आणि कीर्तनकार होते. कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते.

आजच्या महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार आहेत. नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन अशा अनेक पद्धतींद्वारे कीर्तन करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या कीर्तनकारांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे इंदुरीकर महाराज.

संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राची एक पिढी कीर्तनाच्या माध्यमातून घडवली असं म्हटलं जातं. तेव्हा गाडगे महाराजांच्या महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज आणि त्यांची कीर्तनं कशी लोकप्रिय झाली याचा आढावा घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला आहे.

सुरुवातीला गाडगेबाबा यांची कीर्तनाची पद्धत आणि त्यातून समाजावर झालेला परिणाम आपण बघूत.

'गाडगेबाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवली'

डॉ. सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. गेल्या 40 वर्षांपासून त्यांचा संतपरंपरेचा अभ्यास आहे. त्यांनी 'लोकमान्य ते महात्मा', 'ज्ञानोबा तुकाराम', 'पालखी सोहळा-उगम आणि विकास', 'अमृतानुभवाची वासुदेवी टीका', 'तुकाराम गाथेची देहू प्रत' ही पुस्तकंही लिहिलं आहे.

डॉ. सदानंद मोरे यांची राजा कांदळकर यांनी रिंगण या आषाढी विशेषांकासाठी घेतलेली मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी गाडगेबाबांविषयी म्हटलं होतं, "संत गाडगे महाराज देहूत येत असत. ते खरे वारकरी. त्यांना वारकर्‍यातलं क्रांतीकार्य पहिल्यांदा कळलं. बाबांना तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, शामराव देसाई हे मोठे शिष्य लाभले. गाडगे बाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवून आणली. हिंदू धर्माचा सामाजिक वारसा सांगण्याचं, त्यातलं क्रांतीकारत्व उजळून दाखवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. तसंच काम गाडगे महाराजांनी वारकरी संप्रदायांच्या बाबतीत केलं."

इंदुरीकरांच्या कीर्तनाच्या शैलीविषयी त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "इंदुरीकर महाराज ज्या पद्धतीचं कीर्तन करतात, ती पद्धत वारकरी कीर्तनात बसत नाही. कीर्तनात शांतिरस आणि भक्तिरस यांचा परिपोष व्हावा अशी परंपरा आहे. त्याअनुषंगानं एखाद्या ठिकाणी स्थायी रस आला, तर आपण ते समजू शकतो. पण, जेव्हा हास्य रस किंवा विनोद हा स्थायी बनतो आणि तो शांति आणि भक्तीरसावर कुरघोडी करतो, तेव्हा काळजी करण्याची वेळ येते. इंदुरीकरांच्या बाबतीत सगळ्या गोष्टींची उलटापालट झाली. त्यामुळे मग अभंगाचा मूळ आशय, त्याचा अर्थ ते बाजूला राहतो आणि वेगळ्या गोष्टीला प्राधान्य येतं. त्यामुळे मग कीर्तनाची मूळ जी परंपरा आहे गेली काही शतकं चाललेली, नामदेव रायांनी सुरू केलेली, तिला कुठंतरी बाधा यायला लागली आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोनातून हे चिंताजनक आहे."

"कीर्तनाची पद्धत, बाज, एक कीर्तनकार म्हणून त्यांनी सांभाळला पाहिजे. विनोदासाठी बाकीचे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. कीर्तनाला कीर्तनच राहू द्यायला हवं, त्याचा पोवाडा, लावणी, स्टँडअप कॉमेडी, चुटका काहीही करू नये. माझ्या 18 पिढ्यांमध्ये कीर्तनाची परंपरा आहे. त्यामुळे या गोष्टींचं मला दु:ख होतं,"असंही त्यांनी म्हटलं आहे.

'तुलना शक्य नाही'

गाडगेबाबांचं कीर्तन भौतिकवादी, तर इंदुरीकरांचं विनोदी शैलीतलं आहे, असं मत साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व्यक्त करतात.

त्यांच्या मते, "गाडगेबाबांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. गाडगेबाबा अध्यात्म पचवलेले आणि देवत्वाचे मूल्य पचवलेले संत होते. गाडगेबाबांचा देव हा लोकांच्या कल्याणामध्ये रममाण होणारा आहे. तो दगडात नाहीये. माणसांमध्ये देव पाहणारे गाडगेबाबा संत परंपरेमध्ये वेगळा ठसा उमटवून जातात. पारंपरिक संतत्वाला चौकटीतून मुक्त करून एक मोकळेपणाचा अनुभव गाडगेबांनी लोकांना दिला. सर्व प्रकारची विषमता, अंधश्रद्धा यांना गाडगेबाबांच्या कीर्तनात फाटा मिळालेला आहे. गाडगेबाबा निमित्तमात्र अध्यात्मवादी ते आहेत. त्यांचं कीर्तन पूर्णत: भौतिकवादी आहे. गाव साफ करणारे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करतात. माणूस भौतिकदृष्ट्या सुखीसंपन्न व्हावा, अशाप्रकारची परिवर्तनवादी भूमिका गाडगेबाबा आहे. त्यांचं कीर्तन प्रबोधनकारी आहे, कल्याणकारी आहे."

फोटो स्रोत, KIRAN GUJAR

फोटो कॅप्शन,

इंदुरीकर महाराज

इंदुरीकरांच्या कीर्तनाविषयी ते सांगतात, "इंदुरीकरांचं कीर्तन विनोदी शैलीतलं आहे. त्याला कीर्तन म्हणावं की नाही याविषयी चर्चा होऊ शकते. कारण अनेक कीर्तनांमध्ये ते निमित्तमात्र एखादा संताचा अभंग घेतात. आणि पूर्ण कीर्तन हे भौतिक प्रबोधनाच्या संदभार्त स्त्री-पुरुष, रीतिरिवाज, स्वभाव यावर देतात, त्यामध्ये उपदेशाची सूत्रं बरीच आहेत. पण, काही ठिकाणी त्यांची जी स्त्री-पुरुष विषमतेची संस्कार पचवणारी कर्मठ मानसिकता आहे, ती काही वेळा व्यक्त होते. ती क्षमाशील मानावी का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

"इंदुरीकरांचं कीर्तन प्रबोधनकारी आहे, पण त्याची शैली एवढी विनोदी ठेवावी का, हा प्रश्न पडतो. त्यामुळे ते एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारे गृहस्थ आहेत, की कीर्तनकार आहेत हा प्रश्न निर्माण होतो. कीर्तनाची परंपरा नामदेवांपासून चालत आली, त्या परंपरेला हसवणारं कीर्तन मान्य आहे का, हास्यरस शांति आणि भक्ती रसाच्या डोक्याला बसला, तर ते वारकरी परंपरेला चालणार आहे का, असे प्रश्न निर्माण होतात," असं सबनीस सांगतात.

'काळानुरुप बदल आवश्यक'

कीर्तनाच्या स्वरूपात काळानुरुप बदल आवश्यक आहेत, असं मत संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक उदय जाधव मांडतात.

ते म्हणतात, "गाडगेबांबाचा काळ वेगळा होता. गाडगेबाबा कृतीशील संत होते. आधी केले, मग सांगितले, असे ते होते. चिंध्या पांघरूण सोन्यासारखा विचार देणारा संत म्हणजे गाडगे महाराज. पण, आता बदलणाऱ्या काळाप्रमाणे कीर्तन ऐकून मनाला आणि कानाला सुख वाटलं पाहिजे. गाडगेबाबा आणि इंदुरीकर या दोघांनी समाजाला मार्ग दाखवून दिला आहे. दोघांच्या कीर्तनाच्या शैलीत काही साम्य आढळून येतं. त्यातील एक म्हणजे दोघेही बोलीभाषेतून कीर्तन करतात. गाडगेबाबांनी वऱ्हाडी भाषेतून कीर्तनं केली, तर इंदुरीकर महाराजही कीर्तनात प्रमाणभाषा वापरत नाहीत."

फोटो स्रोत, sgbau.ac.in

"याशिवाय इंदुरीकर महाराजांचं समाज निरीक्षण सूक्ष्म स्वरुपाचं आहे. दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या माध्यमातून ते कीर्तन पुढे घेऊन जातात आणि म्हणूनच ते लोकांना पटतं. गाडगेबाबांच्या काळात गाडगेबाबा महान होते. इंदुरीकरांच्या बाबत म्हणाल तर आता कुठे त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आहे," जाधव पुढे सांगतात.

'चांगल्यावर भर द्यावा'

कीर्तनकारानं आपल्या कीर्तनातून चांगलं काय ते सांगावं. लोकांच्या उणीवा, त्यांच्या कमीपणाची खिल्ली उडवू नये. गाडगेबाबांनी कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देशाला दिला. त्याप्रमाणे व्यसनमुक्ती, वासना यावर बोलावं, असं मत भारूडकार चंदाताई तिवाडी व्यक्त करतात.

फोटो स्रोत, kiran gujar

त्या म्हणतात, "गाडगेबाबा ज्या गावात कीर्तनाला जायचे, त्या गावात जेवतसुद्धा नसत. आताचे किर्तनकार मात्र कीर्तनाचे पैसे अॅडव्हान्स घेतात. दिनचर्यापुरते पैसे घेणं ठीक आहे, पण त्यातून मी शाळा चालवतो, आश्रम चालवतो, हे सगळं कशासाठी सांगावं लागतं?"

यारे सारे लहान थोर । याति भलते नारी नर।।

असं तुकाराम महाराज म्हणायचे. त्याप्रमाणे सगळ्यांचा आदर करून कीर्तन करायला हवं, असं त्या पुढे सांगतात.

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या शैलीबाबत असलेल्या आक्षेपांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)