Donald Trump यांच्या तीन तासांच्या गुजरात भेटीचा खर्च कोण उचलणार?

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप Image copyright Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अहमदाबाद शहरातल्या मोटेरा या नव्या स्टेडियमचं उद्घाटन करतील आणि तिथूनच जनतेला संबोधित करतील. त्यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा असणार आहेत.

मोटेरा स्टेडियमवर 24 तारखेला संध्याकाळी हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, या भव्यदिव्य सोहळ्याच्या खर्चावरून सध्या प्रश्न उपस्थित होत आहे. या कार्यक्रमाचा खर्च कोण करतंय?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिल्लीत गुरुवारी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ट्रंप यांचं स्वागत एक नागरिक अभिनंदन समिती करत आहे.

Image copyright Twitter/@TrumpNamaste

या समितीचं नाव डोनाल्ड ट्रंप नागरिक अभिनंदन समिती असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र, द हिंदू वृत्तपत्रात छापून आलेल्या एका वृत्तानुसार अशा कुठल्याच समितीविषयी गुजरातमध्ये कुणालाच कसलीच कल्पना नाही.

या कार्यक्रमाचे जे होर्डिंग्ज लागले आहेत त्यावरही या समितीचा उल्लेख नाही.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांना या आयोजनावरून अनेक प्रश्न विचारले आहेत.

यापैकी काही प्रश्न आहेत -

- डोनाल्ड ट्रंप नागरिक अभिनंदन समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

- या समितीने ट्रंप यांना कधी निमंत्रण दिलं आणि त्यांनी निमंत्रण कधी स्वीकारलं?

- या कार्यक्रमाला 70 लाख लोक येतील, असा दावा तुम्ही केल्याचं डोनाल्ड ट्रंप का म्हणाले?

- गुजरात सरकार एका खाजगी अज्ञात संस्थेतर्फे करण्यात येत असलेल्या आयोजनावर 120 कोटी रुपये खर्च का करत आहे?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अहमदाबादमध्ये फक्त 3 तास असणार आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार या 3 तासांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी तब्बल 85 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

Image copyright Twitter/@rssurjewala

अहमदाबाद शहरात सगळीकडे 'नमस्ते ट्रंप' असे फलक झळकत आहेत. मात्र, या फलकांवर गुजरात सरकार, अहमदाबाद महापालिका, भाजप, सरकारी संस्था किंवा बिगरसरकार संस्था यापैकी कुणाचंच नाव नाही.

https://gujaratindia.gov.in या गुजरात सरकारच्या वेबसाईटवरसुद्धा 'नमस्ते ट्रंप' कार्यक्रमाचा फोटो आहे. मात्र, वेबसाईटवर कार्यक्रमाविषयी तपशीलवार माहिती दिलेली नाही.

या इव्हेंटसाठी https://namastepresidenttrump.in/ नावाने वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या गुजरात इन्फोर्मेटिक्सने ही वेबसाईट डिझाईन केली आहे. मात्र, या वेबसाईटवर about us बद्दल कुठलीच माहिती नाही.

Image copyright Website/namastepresidenttrump.in
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेली वेबसाईट

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या कार्यक्रमाशी संबंधित एक व्हिडियो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या व्हीडिओतही आयोजकांविषयी माहिती नाही.

मात्र, जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण आणि सुशोभीकरणावर सर्वाधिक खर्च केल्याचं अहमदाबाद महापालिकेचं म्हणणं आहे.

कार्यक्रमावर होणारा खर्च योग्यच असल्याचं अहमदाबाद महापालिका आयुक्त विजय नेहरा यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "आम्ही अहमदाबाद महापालिकेच्या बजेटमधून खर्च करत आहोत. या सर्व सोयी कायमस्वरुपी असणार आहेत."

या कार्यक्रमात एक ते दोन लाख लोक सहभागी होतील, असं नेहरा सांगतात. मात्र, अहमदाबादमधल्या रोड शोमध्ये 70 लाख लोक सहभागी होतील, असं स्वतः ट्रंप यांनी म्हटलं होतं.

स्टेडियम परिसरातल्या पायाभूत सुविधा सुधारणं आणि 18 रस्त्यांची डागडुजी यात आतापर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्याची माहितीही नेहरा यांनी दिली.

Image copyright Twitter/@InfoGujarat
प्रतिमा मथळा मोटेरा मैदान

इतकंच नाही तर ट्रंप ज्या मार्गाने जाणार आहेत त्या रस्त्याच्या सुशोभीकरणावर 6 कोटी रुपये खर्च झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

ते म्हणतात, "केवळ अहमदाबादच नाही तर संपूर्ण जगासाठी हा अविस्मरणीय सोहळा ठरावा, असा आमचा प्रयत्न आहे. आमचे कर्मचारी ओव्हरटाईम करत आहेत."

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर लगेच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' हा भव्य कार्यक्रम झाला होता. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हेदेखील सहभागी झाले होते.

टेक्सास इंडिया फोरमने तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात जवळपास 50 हजार लोक सहभागी झाले होते.

आयोजकांवर प्रश्नचिन्हं

'नमस्ते ट्रंप' सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. मात्र, त्याचे आयोजक कोण, हे कुणालाच माहिती नव्हतं. आता नागरिक अभिनंदन समिती असं नाव पुढे आलं आहे. मात्र, या समितीत कोण आहेत, आयोजक कोण याचे तपशील अजूनही गुलदस्त्यात आहेत.

या कार्यक्रमासाठी गुजरातचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठकांवर बैठका सुरू आहेत. राज्य सरकारच हा कार्यक्रम आयोजित करत असल्याचं वाटतंय. मात्र अधिकृत आयोजक दिसत नाही.

'हाउडी मोदी' इव्हेंटचं आयोजन टेक्सास इंडिया फोरमने केलं होतं. फोरमने आपल्या ट्वीटर अकाउंटवरून या कार्यक्रमाची अधिकृत घोषणाही केली होती.

इकडे अहमदाबादमध्ये विमानतळ ते स्टेडियमपर्यंतच्या रस्त्यासाठी किती खर्च झाला, याची आकडेवारी आयुक्त देतात. मात्र, या रस्त्यांवर जे होर्डिंग्ज लागले आहेत, त्यावर महापालिकेचा लोगो दिसत नाही.

नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, असं ज्येष्ठ पत्रकार आलोक मेहता सांगतात.

मेहता यांच्या मते अशा भव्य कार्यक्रमांची सुरुवात राजीव गांधी यांच्या काळात झाली. मात्र, त्यानंतर नरसिंह राव सरकारने असे कार्यक्रम बंद केले.

ते पुढे असंही सांगतात की एकदा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनीही तत्कालीन अमेरिकी अध्यक्षांसाठी अशाच प्रकारचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाविषयी माजी परराष्ट्र सचिव नवतेज सरना म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि मॅडिसन स्क्वेअरमध्ये अशा प्रकारचे सोहळे आयोजित केले आहेत. तशाच प्रकारचा इव्हेंट आता अहमदाबादमध्ये होतोय."

नव्या प्रकारची मुत्सद्देगिरी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी एवढा खर्च करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार राज गोस्वामी यांनी बीबीसी गुजरातीचे जिगर भट्ट यांना सांगितलं, "सामान्य माणसाच्या नजरेत ही मोठी रक्कम असू शकते."

गोस्वामी 'नमस्ते ट्रंप' आयोजनाकडे परराष्ट्र धोरण म्हणून बघतात. ते म्हणतात, "कुठल्याही राष्ट्राचे प्रमुख दुसऱ्या राष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर असतात तेव्हा त्या देशाची संस्कृती, पर्यटनस्थळांव्यतिरिक्त ऐतिहासिक स्मारकांनाही भेटी देतात."

गोस्वामी म्हणतात, "असे इव्हेंट जगभरात आयोजित होत असतात. प्रत्येक देश अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांवर पैसे खर्च करतात."

तर ज्येष्ठ पत्रकार आलोक मेहता यांच्या मते अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून दोन्ही राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारतात.

मेहता म्हणतात, "जेव्हा दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून देता तेव्हा निश्चितच त्यांचं प्रेम आणि आदर मिळतो. तेव्हा या आयोजनाचा भारतीयांना, देशाला आणि राजकीय विषयात फायदा होईल."

मेहता यांच्या मते ट्रंप यांच्या या दौऱ्यामुळे भारताला केवळ राजकीय फायदा होणार नाही तर आर्थिक फायदाही होईल.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाला जगातला सर्वात महागडा कार्यक्रम म्हटलं होतं. अशाप्रकारचा कुठलाच इव्हेंट भारताची आर्थिक स्थिती लपवू शकत नसल्याचंही ते म्हणाले होते.

इकॉनॉमिक टाईम्समध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार भाजपने म्हटलं होतं की 'हाउडी मोदी'चं आयोजन अमेरिकेतील स्वयंसेवकांनी केलं होतं. त्यात भारत सरकार किंवा भाजपची भूमिका नव्हती.

ज्येष्ठ पत्रकार रमेश ओझा यांनी बीबीसी गुजरातीच्या जिगर भट्ट यांच्याशी बोलताना अशा प्रकारचे कार्यक्रम पैशांची नासाडी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, "नरेंद्र मोदी असं यासाठी करत आहेत कारण त्यांना याची सवय आहे. त्यांना असे जंगी कार्यक्रम आवडतात."

अर्थतज्ज्ञ इंदिरा हिरवे म्हणतात, "देशाची आर्थिक परिस्थिती वाईट असताना आपण एवढा मोठा खर्च पेलू शकत नाही."

ते झोपड्या लपवण्यासाठी उभारण्यात येणारी भिंत पाडणार असल्याकडेही लक्ष वेधतात.

अर्थतज्त्र हेमंत कुमार शहा बीबीसी गुजरातीच्या जिगर भट्ट यांच्याशी बोलताना म्हणतात, "पैसा अचल संपत्ती उदाहरणार्थ रस्ते, फुटपाथ, पूल बनवण्यासाठी खर्च झाला असता तर वेगळी गोष्ट होती. कारण त्यांचा वापर पुढेही होतो."

अशा गर्दीच्या कार्यक्रमांच्या आयोजनात होणारा खर्च बघता ते करू नये, असं मतही ते व्यक्त करतात. हेमंत कुमार म्हणतात, "असे कार्यक्रम खूप भव्यदिव्य असतात. मात्र, त्यांचा कायमस्वरूपी वापर होत नसतो. त्यातून रोजगारही मिळत नाही."

'सरकारने खर्चाचा हिशेब दिला पाहिजे'

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोषी यांच्या मते 'नमस्ते ट्रंप' कार्यक्रमावर खर्च होणारा पैसा स्रोतांची नासाडी आहे.

बीबीसी गुजरातीशी बोलताना दोषी म्हणाले, "मी डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्याचं स्वागत करतो. मात्र, गुजरात बेरोजगारी, आरोग्य समस्या, शेती संकट आणि कुपोषणाचा सामना करतोय. त्यामुळे अशा कार्यक्रमांवर पैसे खर्च करण्याऐवजी जनतेच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे."

मनीष दोषी यांच्या मते, "दोन राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट हाच खरंतर मोठा इव्हेंट आहे. त्याला वेगळ्याप्रकारे ग्लॅमराईज करण्याची गरज नाही."

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शंकर सिंह वाघेला यांनीदेखील या कार्यक्रमावर टीका केली आहे.

बीबीस गुजरातीशी बोलताना वाघेला म्हणाले, "मी राज्य आणि केंद्र सरकारला आवाहन करतो की राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या दौऱ्यावर झालेल्या खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा."

Image copyright Getty Images

वाघेला पंतप्रधान मोदी यांना हेदेखील विचारतात, "तुम्ही ट्रंप यांना मार्केटिंगसाठी बोलावलं आहे का? ट्रंप यांना इथे बोलवण्यामागे काही कारण आहे? मला हेसुद्धा कळत नाही की तुम्ही स्वतःला ट्रंपचे प्रचारक म्हणून का दाखवू इच्छिता?"

वाघेला म्हणतात, "अशा कार्यक्रमांसाठी तुम्हाला कर देणाऱ्या जनतेचा पैसा खर्च करण्याचा अधिकार नाही. तुम्ही जनतेचे सच्चे सेवक असाल तर खर्चाचा हिशेब द्या."

या कार्यक्रमाच्या भव्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शंकर सिंह वाघेला विचारतात, "हे गांधी, सरदार आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणाची टर उडवण्यासारखं आहे."

ट्रंप अहमदाबादच्या दौऱ्यावर येत आहेत आणि आताच नर्मदा जिल्ह्यातल्या केवडिया भागातल्या 14 गावांमधले लोक धरणं आंदोलन करत आहेत. आपल्या समस्या सोडवण्यासाठी ट्रंप यांनी मध्यस्थी करावी, अशी या आदिवासी जनतेची मागणी आहे.

'नमस्ते ट्रंप'

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अहमदाबाद शहराला सजवण्यात आलं आहे. ट्रंप अहमदाबादमध्ये फक्त तीन तास थांबणार आहेत. यासाठी शहरातल्या रस्त्यांची साफ-सफाई झाली आहे.

गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं ट्रंप अहमदाबादमध्ये तीन तास थांबणार आहेत आणि या दौऱ्याच्या आयोजनावर जवळपास 85 कोटी रुपये खर्च होणार आहे.

ट्रंप यांच्या सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. या कामासाठी 85 कोटी रुपयातले जवळपास निम्मे पैसे खर्च होणार आहेत.

अहमदाबाद शहराचे डीसीपी विजय पटेल यांनी सांगितलं, "25 आयपीएस, 65 पोलीस सहआयुक्त, 200 पोलीस निरीक्षक, 800 उपनिरीक्षक आणि 10 हजार पोलीस जवान ट्रंप यांच्या दौऱ्यादरम्यान तैनात असणार आहेत."

Image copyright Getty Images

स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ट्रंप यांच्या दौऱ्यात सजावटीसाठी तब्बल साडे तीन कोटी रुपयांची फुल वापरण्यात येणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर ट्रंप यांचा हा पहिला भारत दौरा आहे. ते अहमदाबादमधल्या गांधी आश्रमात जातील की नाही, हे अजून स्पष्ट नाही.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात गुजरात मॉडेलवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

ट्रंप यांना गरिबी दिसू नये, गरिबी लपवावी, यासाठी तब्बल 1 अब्ज रुपये खर्च करण्यात येणार आहे.

ट्रंप अहमदाबाद विमानतळावरून येणार आहेत. यानंतर त्यांचा 22 किमी लांब रोड शो होणार आहे. यावेळी ट्रंप आणि पंतप्रधान मोदी एकत्र असणार आहेत. हा रोड शो आणि मोटेरा स्टेडिअममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात लाखो लोक येतील, असा अंदाज आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाचा धारावीत शिरकाव, आता आव्हान संसर्ग रोखण्याचं

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 423

कोरोनाची चाचणी करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर इंदूरमध्ये दगडफेक?-फॅक्ट चेक

'येत्या 20 दिवसांत मी आई होईन, माझं बाळ सुखरूप राहायला हवं'

जास्त चाचण्या घेतल्या असत्या, तर तबलीगी प्रकरण वेळेत समोर आलं असतं?

कोरोना संकटात मोदी सरकार या प्रश्नांपासून पळ काढू शकत नाही

कोरोना व्हायरस : घरात आहेत पण हिंसाचारापासून सुरक्षित नाहीत त्यांचं काय?

HIV निर्मूलनासाठी झटणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रख्यात शास्त्रज्ञाचं कोरोनामुळे निधन

'माझ्या छातीत दुखतंय,' असं बोलून चालता चालता त्याने प्राण सोडला