रवी पुजारीला सेनेगलमध्ये पुन्हा अटक?

मुंबई, रवी पुजारा, अंडरवर्ल्ड

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

अंडरवर्ल्ड

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. रवी पुजारीला सेनेगलमध्ये पुन्हा अटक?

खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या रवी पुजारीला सेनेगलमध्ये पुन्हा अटक करण्यात आली आहे. बॉलीवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना त्याने धमकावल्याचे आरोप आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मात्र भारत सरकार, कर्नाटक पोलीस किंवा अन्य यंत्रणांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केलेलं नाही.

गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी 'रॉ' अर्भात भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारीही तिथे आहेत.

भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजाराने दाखल केलेली याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. भारतात परतायचं नसल्याने रवी पुजारीने कायदेशीर मार्ग अवलंबला होता.

रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह 200हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. सेनेगलमध्ये रवी पुजारी, अँथनी फर्नांडिस या नावाने राहत होता.

पुजारीचा जन्म मंगळुरूजवळच्या मालपे इथं झाला. सातत्याने नापास होत असल्याने शाळेतून काढून टाकण्यात आलं. रवी 1980च्या दशकात मुंबईत आला. त्याने हॉटेलात काम करायला सुरुवात केली. त्याने छोटा राजन गँगचा भाग झाला.

बिल्डर प्रकाश कुकरेजा हत्येत सहभाग होता. 2000 साली त्याने स्वत:ची गँग सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुबईत राहून गँगचा कारभार हाकला. नवी मुंबईतील बिल्डर सुरेश वाधवा यांच्या हत्येचा प्रयत्न. 2005 मध्ये पुजाराच्या सांगण्यावरून वकील माजीद मेमन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

पत्नी, 2 मुली आणि एक मुलगा असं पुजारीचं कुटुंब आहे. पत्नी पद्माला 2005 मध्ये फेक पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर मंगळुरूला रवाना.

पुजारीकडे ऑस्ट्रेलियन पासपोर्ट असल्याची माहिती. चीन, हाँगकाँग आणि आफ्रिका असं फिरत असतो. इंटरपोलने रवी पुजारी आणि पद्मा यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती.

2. आम्ही जे करतोय ते बाबासाहेबांनीच घटनेत लिहून ठेवलंय : नितीन गडकरी

नागरिकत्वाचा मुद्दा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत लिहून ठेवल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एबीपी माझा आयोजित 'माझा महाराष्ट्र ,माझं व्हिजन' या कार्यक्रमात केलंय.

यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी बोलताना गडकरी म्हणाले, "नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा नवीन कायदा नाही, तर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांनी यापूर्वीच लिहून ठेवलं आहे."

ते पुढे म्हणाले, "प्रत्येक गोष्ट आपल्या देशात तयार व्हायला हवी, कारण ती क्षमता आपल्या देशात आहे. गेल्या 5 वर्षांत दळणवळण क्षेत्रात महाराष्ट्रानं चांगलं काम केलं आहे."

"महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र, या पाण्याचा म्हणावा तसा वापर झालेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती आहे, त्याचा वापर करणं महत्वाचं आहे. जलमार्ग वाहतूक तुलनेनं स्वस्त आहे. त्यामुळेच आगामी काळात जलमार्गाने मुंबई ते गोवा वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत," असंही ते म्हणालेत.

3. मी माझे शब्द मागे घेतो- वारिस पठाण

'15 कोटी आहोत, पण 100 कोटींवर भारी पडू,' असं वादग्रस्त विधान MIM चे नेते वारिस पठाण केलं होतं. आता त्यांनी हे विधान मागे घेतलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"मी माझे शब्द मागे घेतो. तसंच फक्त 100 लोक या देशात असे आहेत की जे मुस्लीम समाजाविरोधात आहेत, अशा भाजप, RSS, बजरंग दल या संघटनांच्या 100 लोकांविरोधात मी ते वक्तव्य केलं होतं," असं त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Waris Pathan/Facebook

फोटो कॅप्शन,

वारिस पठाण

"मी माझे शब्द परत घेतोय, मी देशाचा सच्चा नागरिक आहे. मी सच्चा भारतीय मुस्लीम असून या महान देशावर माझं प्रेम आहे. मुस्लिमांचा संविधानावर विश्वास आहे," असंही ते म्हणालेत.

4 'भारतमाता की जय! या घोषणेचा राजकीय फायद्यासाठी अतिरेकी वापर'

भारतमाता की जय! या घोषणेचा एका विशिष्ट वर्गाकडून राजकीय फायद्यासाठी अतिरेकी वापर करण्यात आला आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "देशातील काही घटकांनी राजकीय फायद्यासाठी भारताची प्रतिमा ही कट्टर किंवा उग्र कशी करता येईल यावर भर दिला."

फोटो स्रोत, Getty Images/Sean Gallup

दिल्लीत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी नाव न घेता मोदी सरकारवर आणि भाजपावर टीका केली आहे.

ते म्हणाले, "भारत हा लोकशाही स्वीकारलेला देश आहे. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु होते. आपल्या देशाला जगानं एक मोठी शक्ती मानलं आहे. या देशासाठी पंडित नेहरुंनी दिलेलं योगदान विसरुन चालणार नाही."

5. दहशतवाद्यांना प्रायव्हसीचा अधिकार नाहीः रवीशंकर प्रसाद

दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रायव्हसीचा (व्यक्तिगत गोपनीयता) मूलभूत अधिकार नाही. त्यांना इंटरनेटचा दुरुपयोग करू देऊ नये, असं केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

आंतरराष्ट्रीय न्यायिक संमेलन-2020 मध्ये 'न्यायपालिका आणि बदलते जग' या परिसंवादात ते बोलत होते.

फोटो स्रोत, Ravi Shankar Prasad/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

रवीशंकर प्रसाद

ते म्हणाले, "प्रायव्हसीला मूलभूत अधिकार मानलं गेलंय. सरकारही ते स्वीकार करतंय. पण दहशतवादी आणि भ्रष्टाचाऱ्यांसाठी प्रायव्हसीचा मूलभूत अधिकार नाही. कारण प्रायव्हसीच्या अधिकाराला डिजिटल साथ मिळाली तर जागतिक पातळीवर त्याला मोठं स्वरुप येतं. हे माहितीचं युग आहे आणि माहिती ही शक्ती आहे," असं रविशंकर प्रसाद म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)