नवाब मलिक प्रकरण: शिवाजी महाराजांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज बनली आहे का?

नवाब मलिक Image copyright Nawab Malik/FACEBOOK

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हीडिओत राष्ट्रवादीचे इतर नेते 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा देत असताना नवाब मलिक गप्प का राहिले, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला आहे.

त्यानंतर नवाब मलिक यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

त्यांनी म्हटलंय, "दोन वर्षांपूर्वी शिवस्वराज्य यात्रेचे निमित्त साधून राष्ट्रवादीचे सर्व नेते रायगड किल्ल्यावर गेले होते. तिथे फोटो काढण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहिलो होतो. तेव्हा धनंजय मुंडे यांनी 'शिवाजी महाराज की जय' अशी घोषणा दिली आणि सर्वांनीच शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. त्यात मी सुद्धा महाराजांचा जयजयकार करत होतो. फक्त हात वर केला नव्हता."

असं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणं, ही राजकीय गरज झालं आहे का, याला राष्ट्रवादी काँग्रेसही जबाबदार आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाराजांभोवती राजकारण

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जानेवारी 2004 मध्ये हल्ला झाला. या हल्ल्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित विषयाशी होता.

जेम्स लेन या लेखकानं 'Shivaji: Hindu King in Islamic India' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप होता.

या प्रकरणाविषयी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात, "2004 पूर्वी राज्यात शिवाजी महाराज हे फक्त शिवसेनेच्या राजकारणाचा विषय होते. पण, 2004मध्ये जेम्स लेनचं प्रकरण समोर आलं आणि त्यावरून वाद सुरू झाला, तेव्हा मात्र शिवसनेनं गप्प राहण पसंत केलं. मग आर. आर. पाटलांनी हाच प्रचाराचा मुद्दा बनवला आणि या भूमिकेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा झाला होता."

Image copyright @NCPSPEAKS

हाच मुद्दे पुढे नेत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर शिवसेनेनं पहिल्यांदा केला. 2004मध्ये जेम्स लेन पुस्तकाचं प्रकरण समोर आलं. हा वाद राष्ट्रवादीनं प्रचारात आणला आणि मराठा संघटना पक्षाच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. याचा राष्ट्रवादीला तेव्हाच्या निवडणुकीत फायदा झाला. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे राष्ट्रवादीनं 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराजांच्या नावानं शिवस्वराज्य यात्रा सुरू केली.

"अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली. अमोल कोल्हे यांना नेतृत्व करण्याची संधी देऊन भावनात्मक मुद्द्यांना हात घालून मत मिळवणं हा त्यामागचा उद्देश होता आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यशही आलं. त्यामुळे मग रिझल्ट येतो म्हटल्यावर शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणात वापर केला जातो आणि त्यांच्या नावाचा जयजयकार अपरिहार्य होतो," देसाई पुढे सांगतात.

नवाब मलिक यांच्या स्पष्टीकरणाविषयी ते म्हणतात, "नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. आपल्या कृतीमुळे गैरसमज निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलं असावं. शिवाय AIMIMचे नेते वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. ते पाहता त्यांना खुलासा करावा लागला असेल."

निवडणुकीवर परिणाम होत नाही?

शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रचार करून निवडणुकीवर परिणाम होत नाही, असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ मांडतात.

त्यांच्या मते,"शिवाजी महाराजांच्या नावाचा प्रचार करून निवडणुकीवर परिणाम होत नाही. शिवाजी महाराज हा निवडणुकीचा विषय आहे, असं महाराष्ट्रातील जनता मानत नाही."

Image copyright Getty Images

"शिवाजी महाराजांच्या नावामुळं निवडणुकीचा निकाल बदलतो, असं अद्याप महाराष्ट्रात झालं नाही. त्यामुळं मिथकं तयार केली गेलीत की, शिवाजी महाराजांमुळं मतं मिळतात," असंही प्रकाश बाळ म्हणतात.

'महाराष्ट्राचा डीएनए'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं निवडणुकीत प्रचारादरम्यान घोषणा देणं हे महाराष्ट्राला नवीन नाही. 2014 साली भाजपनं 'शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चलें मोदी के साथ' असं म्हणत प्रचार केला होता.

त्यानंतर 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनंही 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' म्हणत 'शिवस्वराज्य यात्रा' राज्यभर काढली. या यात्रेलाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचाच संदर्भ होता.

आता म्हणजेच 2020मध्ये ज्या नवाब मलिकांच्या व्हीडिओवरून भाजपनं टीका केली आहे, त्यातही शिवाजी महाराजांच्या नावाचा संदर्भ आहे.

Image copyright Getty Images

याविषयी चोरमारे सांगतात, "शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा डीएनए आहे. या राज्याची जी काही अस्मिता, स्वाभिमान आणि अस्तित्व जे काही आहे ते शिवाजी महाराजांपासून सुरू होतं आणि त्यांच्यामुळेच टिकतं. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह गोष्टी घडल्या आहेत, की तो इथे अपमान समजला जातो आणि प्रतिक्रिया येते.

"जरी या प्रतिक्रिया बघता ते राजकारण असलं तरीही ते केवळ राजकीय नसतं. शिवाजी महाराजांच्या बद्दल जी भावना आहे, त्यामुळे प्रतिसाद सतत मिळत राहतो हे इथल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी पाहिलं आहे."

'ऐतिहासिक वारशाचं सर्वोच्च प्रतीक'

"शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचं सर्वोच्च प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल वा त्यांच्याशी संबंधित प्रतिकांचा अन्वयार्थ चुकीचा लावला गेला की त्याची प्रतिक्रिया येते. वाद निर्माण होतो," असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात.

Image copyright MAHARASHTRA DGIPR

ते पुढे म्हणतात, "महाराष्ट्राचं आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. स्वराज्याचे संस्थापक म्हणून तर आहेच पण आजही अनेक राजकीय, सामरिक, प्रशासकीय, व्यवस्थापन, सामाजिक धोरणांचे उद्गाते म्हणून वर्तमानात शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. परिणामी अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वं वेगवेगळ्या विचारधारांशी जोडले गेलेली असतांना, शिवाजी महाराज मात्र महाराष्ट्रात प्रत्येक विचारधारेसाठी जवळचे राहिले आहेत. त्यामुळे आजच्या महाराष्ट्राच्या समाजकारणावर, निवडणुकींच्या राजकारणावर शिवाजी महाराजांच्या प्रभाव सर्वाधिक आहे. परिणामी त्यांच्याशी संबंधित न पटलेल्या उल्लेखांमुळे महाराष्ट्रात भावनिक आंदोलनं सुरू झाल्याचा इतिहास आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)