MPSC & UPSC: 'तू अधिकारी झालीस आणि आमची मुलगी आम्हाला परत मिळाली'

युपीएससी Image copyright Getty Images

मी जेव्हा परीक्षा पास झाले तेव्हा माझ्या घरचे मला म्हणाले, "तू आम्हाला परत मिळालीस, गेली तीन चार वर्षं आम्ही तुला खूप मिस केलं. तू असून नसल्यासारखी होतीस. तू घरीच असायचीस मात्र तुझं लक्ष दुसरीकडे असायचं." एमपीएससीची परीक्षा पास होऊन कक्ष अधिकारी या पदाचं प्रशिक्षण घेत असलेली स्वाती (नाव बदललं आहे.) सांगत होती.

सुरुवातीचे दिवस

स्वाती सांगते, "पुण्याला आले तेव्हा मला परीक्षेबद्दल काहीच माहिती नव्हती. मी अॅग्रीकल्चर विषयात पदवी घेतली होती. त्याच क्षेत्रात मला पुढे शिकायचं होतं. मी या क्षेत्रात अपघाताने आले. पहिली दोन वर्षं अभ्यास केला मात्र यश मिळालं नाही. खरंतर बहुतांश मुलींना दोन किंवा तीनच वर्षं मिळतात. त्या काळात मुलींना पद मिळालं नाही तर त्यांची चिंता वाढत जाते. मीही त्याला अपवाद नव्हते. मी जे कष्ट घेत होते ते घरच्यांना कळत नव्हते. पण सुदैवाने मला मित्रमैत्रिणी चांगले मिळाले. आम्ही सगळे खूप मनापासून अभ्यास करायचो. पहिल प्रयत्न वाया गेल्यावर आम्ही परीक्षेचं स्वरूप नीट समजून घेतलं आणि प्रयत्नांना दिशा दिली. आज आमच्या प्रत्येकाकडे पोस्ट आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनाही काहीतरी करूनच घेऊ असा त्यांना विश्वास आहे.त्या काळात तीच लोक माझे दु:ख समजून घेत असत. मला आयएएस ऑफिसर व्हायचं होतं. त्यात सातत्याने अपयश होतं. मग माझी एमपीएससीतून कक्ष अधिकारी पदावर माझी नियुक्ती झाली."

"या पदावर नियुक्ती झाल्यावर माझ्यासाठी येणाऱ्या स्थळांमध्ये वाढ झाली. त्यात अनेक उद्योगपती होते. मी मंत्रालयात काम करणार म्हटल्यावर आपली कामं होणार या आशेने ते माझ्या कुटुंबाशी सलगी दाखवत होते. या काळात मला अतिशय त्रास झाला. मी काय आहे, माझ्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे जाणून घेण्यात कुणालाही रस नव्हता. त्याचा मला प्रचंड त्रास झाला. मला एक पद मिळालं होतं तरी मला युपीएससीचा अभ्यास करायचा होता. याबद्दल कुणालाही काही बोलायचं नव्हतं."


आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसांगाना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख या सीरिजचा भाग आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मुलींना विविधांगी ताणाला सामोरं जावं लागतं. अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात काय आंदोलनं सुरू असतात यावर उहापोह करणारा हा लेख.


सहनही होत नाही.. सांगताही येत नाही

वनिता मिसाळ पुण्यात या परीक्षांचा सध्या अभ्यास करत आहे. गेल्या चार वर्षांत त्या या परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांना अजून कोणतंही पद मिळालेलं नाही. ती सध्या अतिशय वैतागली आहे. डीएड झाल्यानंतर त्यांना नोकरी नव्हती, घरच्यांची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत तिने या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र एमपीएससीमधले घोळ संपता संपत नाहीये. त्यामुळे वनिताला पद मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. आता परत जाण्याचीही तिची इच्छा नाही. पैशाचा प्रश्न आहेच मात्र पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणंही कठीण आहे. अशा दुहेरी गोष्टीत अडकल्यामुळे वनिता वैतागली आहे. तरीही ती प्रयत्न करतेय. प्रस्तुत लेखकाशी बोलताना तिचा त्रास जाणवत होता. तरीही तिने अजून धीर सोडला नाही. लग्नासाठी दबाव, नातेवाईकांचे टोमणे हे तिलाही चुकलेले नाहीत. त्यातून मार्ग काढत ती हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधीक छायाचित्र

आलं अपयश तरीही...

पूजा पटवर्धन मूळची ठाण्याची. लहानपणापासून आयएएस अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. आई वडील नोकरीत, भाऊ कमावता त्यामुळे तिला आर्थिक चणचण फारशी भासली नाही. तिने ठाण्यातून एक वर्षं पुणे आणि त्यानंतर पाच वर्ष दिल्लीत राहिली. सलग पाच अटेंम्पट दिल्यावरही तिला यश मिळालं नाही. तिच्या आजूबाजूला अतिशय सकारात्मक, अभ्यासू वातावरण होतं. त्याची तिला मदतही झाली आमि त्रासही झाला. आपल्या बरोबर अभ्यास करणारी लोक अधिकारी होत आहेत आणि आपण प्रिलिम, मेन्स, मुलाखत, या चक्रात अडकलो आहोत याचा मला प्रचंड त्रास व्हायचा. मग तिने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

"खरं सांगू का मुलींइतकाच ताण मुलांनाही असतो. त्यामुळे परीक्षा पास न होणं त्यांच्यासाठीही तितकंच त्रासदायक ठरतं. मुलींना परीक्षा पास झाली नाही तर लग्न करून निघून जाण्याचा पर्याय असतो. मुलांचं तसं होत नाही. मुलांचं करिअर कायमच जास्त गांभीर्याने घेतलं जातं. मुलींना आपण गृहिणी होण्याचा पर्याय ठेवला आहे. मी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा मला अनेक प्रकारची लोक भेटले. मी एका मोठ्या शहरात वाढली आहे. माझी आणि माझ्यासारखंच अनेकांची आई नोकरी करते. त्यामुळे मुलींनाही नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. पण ती नसेल करायची तरीही कुणाला फारशी अडचण नसते. काही जणींना हा पर्याय नसतो. मुलांना तर तो अजिबात नसतो. मुलींच्याबद्दल समाजात वेगळा दृष्टिकोन असला तरीही हा त्यातला एक सकारात्मक मुद्दा आहे." पूजा सांगत होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

परीक्षा देण्याचा आणि न देण्याचा निर्णय यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय या प्रश्नाच्या उत्तरादाखल पूजा म्हणते, "मी स्वत:च खूप निराश झाले होते. मी सलग चार अटेम्प्ट दिले. त्यात मला यश मिळालं नाही.एक तर मी खूप लवकर या परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्याकडे वेळ होता आणि अजूनही आहे. त्यामुळे घरच्यांना जाणवलं की हिला या परिस्थितीतून बाहेर काढणं आवश्यक आहे. त्याबाबतीत मी फार नशीबवान आहे. असं मला वाटतं. मग मी दिल्लीत त्याच क्षेत्रात नोकरी करायला लागले. मात्र तरीही त्यातून नीट बाहेर पडले नाही. मग मी पुण्याला आले आणि आता इंटेरिअर डिझाईन शिकतेय. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या ज्या समस्या आहेत, त्या समाजाने किंवा माझ्या आईवडिलांपेक्षा माझ्या अपयशाने निर्माण झाल्या होत्या."

लग्न हा विषय पूजाच्या घरीही निघाला होता. मात्र तिच्या मते तिच्या आईवडिलांचंही बरोबर होतं. मुळातच या मुद्दयावरून तिला वाद नको होता. त्यामुळे आईवडिलांचेही मुद्दे तिने समजून घेतले. स्पर्धा परीक्षा देताना किती वर्षं त्यात घालवायचे हा मुद्दाही असतोच. त्याचा सारासार विचार करणं गरजेचं असतं. पूजा आणि तिच्या घरच्यांनी हे मुद्दे आपापसात चर्चा करून व्यवस्थित सोडवले. काही वेळेला पूजाने मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेतली. या अपयशातून व्यवस्थित बाहेर पडण्याची तजवीज तिने केली होती. शहाणी माणसं गरजेची

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इतर गोष्टींपेक्षा मानसिक ताण हाताळणे ही एक टप्प्यावर कठीण गोष्ट होऊन बसते. स्वातीच्या मते चार शहाणी माणसं अभ्यास करताना आजूबाजूला असणं गरजेचं असतं. घरच्यांना ते दु:ख समजेलच असं नाही. त्यांना वाटत राहतं की ही करतेय अभ्यास पण पुढे काय? स्वातीच्या मते पदवीनंतर दोन अडीच वर्षं काहीच हातात नसताना घरच्यांनी तिच्यासाठी पैसे पुरवणं हीसुद्धा मोठी गोष्ट होती. माझ्यासह माझ्या अनेक मैत्रिणींना दोन प्रयत्नानंतर नोकरी करण्याची सक्त ताकीद घरच्यांनी दिली होती.

मुलगी म्हणून घरच्यांचा आणि नातेवाईकांचा प्रचंड ताण स्वातीवर होता. नातेवाईक आई वडिलांवर दबाव टाकत असत. लग्नाबद्दल वारंवार बोलत असत. त्यामुळे परीक्षा पास झाल्यावर स्वत:पेक्षा घरच्यांना समजावणं हाच एक मोठा कार्यक्रम असायचा असं स्वाती व्यथित होऊन सांगते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

नोकरी करणे हा ताण जसा मुलांना असतो तसा मुलींनाही असतोच. कारण अभ्यासाचं सोंग आणलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्या सोबत शिकलेली मुलं मुली त्यांच्या करिअरमध्ये पुढे जात असतात. त्यांची लग्नं होतात, पोरंबाळं होतात. आपण इथे अभ्यासच करत असतो. जळीस्थळी अभ्यासाबाबत प्रश्न विचारले जातात तेव्हा ते नकोसं होतं. जेव्हा माझा निकाल लागला, आणि माझा साखरपुडा झाला तेव्हा त्यांना एक वेगळाच आनंद झाला. मला पोस्ट मिळाल्यावर त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे निकाल हीच आपली ओळख आहे का असा प्रश्न स्वातीला पडला.

स्वाती, वनिता आणि पूजा या तिघींशी बोलल्यावर मला असं लक्षात आलं की प्रत्येकीचा एक वेगळा संघर्ष आहे. स्वातीने तो पूर्ण केला, वनिता अजूनही करतेय आणि पूजा ने तो काही काळ थांबवला असला तरी पुन्हा करण्याची तिची तयारी आहे. मुली स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर लग्न हा विषय असला तरी नोकरीची चिंता मुलींनाही चुकलेली नाही. त्यांच्याकडूनही अर्थाजर्नाची अपेक्षा करणारा समाज आता उभा राहतोय. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा ताण मुलांना आणि मुलींनाही चुकलेला नाही. तो अटळच आहे. या तिघी याच समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मनात डोकावताना असं लक्षात आलं की त्यांनी हा संघर्ष मनापासून केला, करताहेत, अनेक समस्यांना तोंड दिलं, समाजाची आणि स्वत:चीही वेळोवेळी समजूत घातली आणि लढत राहिल्या. स्वत:च्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहिल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)