डोनाल्ड ट्रंप यांच्या सुरक्षेसाठी 22 किमीच्या मार्गावर लोखंडी बॅरिकेड आणि 12,000 पोलीस

ट्रंप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडिअम किंवा मोटेरा स्टेडिअमवर ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करतील.

ते साबरमती आश्रमाला भेट देतील की नाही याबाबत अद्याप संदिग्धता आहे. मात्र या तयारीत कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत. मोटेरा स्टेडियमधील कार्यक्रमानंतर मोदी आणि ट्रंप साबरमती आश्रमाला भेट देतील आणि तिथेच चर्चा करतील असं गुजरात सरकारच्या सुत्रांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं. बीबीसीने अद्याप या बातमीवर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

सध्या शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ट्रंप यांच्या 22 किमी रोड शो दरम्यानच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रंप, मेलानिया ट्रंप आणि मोदी यांचे होर्डिंग संपूर्ण शहरात लावण्यात आले आहेत. नमस्ते ट्रंप हा कार्यक्रम भारत अमेरिका व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.

सध्या अहमदाबाद शहराला छावणीचं रूप आलं आहे. सगळीकडे पोलीस तैनात झाले आहेत. तैनात झालेल्या पोलिसांबरोबर ज्येष्ठ पोलीस अधिकारीही आहेत. या रस्त्यावर कायम पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येतो. ज्या लोकांनी काळे कपडे घातलेत किंवा रस्त्यावर पडलेल्या वस्तू याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

रस्त्याच्या बाजूला सुरक्षा तपासणीसाठी केबिन उभारण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणाहून ट्रंप यांचा ताफा जाणार आहे तिथल्या रोड शो मध्ये सहभागी व्हायचं असेल तर सुरक्षा तपासणी करणं अनिवार्य आहे. या 22 किमीच्या मार्गावर लोखंडी बॅरिकेड उभारले आहेत.

अहमदाबादचे पोलीस उपायुक्त विजय पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी 12000 पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. पोलीस दल, राखीव पोलीस दल यांच्याबरोबरच साबरकांठा, मेहसेना, बनासकांठा या जिल्ह्यातून आयपीएस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

याबरोबरच US Secret service, NSG आणि SPG चे अधिकारीही या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्था पाहतील.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांतर्फे या मार्गावर कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी Anti Drone technology चा वापर केला जाणार आहे. या मार्गावर NSG ची अँटी स्नायपर टीम तैनात राहील.

रविवारी रस्त्यावर ज्या गाड्या दिसत आहेत, त्या अहमदाबाद महापालिकेच्या , पोलिसांच्या आणि किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आहेत. सध्या हे विभाग या तयारीत व्यस्त आहेत.

अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी ट्वीट करत लोकांना रोड शोला येण्याचं आणि भारतीय संस्कृती आणि विविधतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं.

या रोड शो साठी एक लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. अहमदाबाद महापालिकेने या रोड शोला इंडिया रोड शो असं नाव दिलं आहे.

आपापल्या संस्कृतीचं प्रदर्शन व्हावं या उद्दिष्टाने तिथे ठिकठिकाणा व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. उदा. आसामची संस्कृती पाहण्यासाठी त्या राज्यासाठी उभारलेल्या स्टेजवर कलाकार कला दाखवतील. एअरपोर्ट सर्कल भागात पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्याचं व्यासपीठ उभारण्यात आलं आहे.

अहमदाबाद महापालिकेची प्राणी नियंत्रण विभागाची गाडी सध्या सतत रस्त्यावर गस्त घालत आहे. त्यामुळे या मार्गावर गायीचा त्रास जवळजवळ संपला आहे.

विमानतळाच्या परिसरातून जवळपास 50 माकडांना जेरबंद करण्यात आलं आहे.

रविवारी परिसरातील बहुतांश दुकानं बंद होती. सोमवारीही दुकानं बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

रोड शो मध्ये कसं सहभागी व्हाल?

अहमदाबादमध्ये 16 विधानसभा क्षेत्रं आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून लोकांना उभं राहण्यासाठी विशिष्ट जागा उभारण्यात आल्या आहेत. उदा. विजालपूर विधानसभा क्षेत्रातील सदर बाझार विभागात अहमदाबाद कँन्ट परिसरात उभे राहतील . त्याचप्रमाणे बापूनगर विधानसभा क्षेत्रातील लोक सिमरन फार्म जवळील कँट भागात उभे राहतील.

अहमदाबाद महापालिकेने ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. जी लोकं रोड शो ला येणार त्यांना विशिष्ट जागेवरून ताफा जाईपर्यंत घरी जाता येणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)