CAA: 'दिल्लीत दुसरं शाहीनबाग होऊ देणार नाही'- कपिल मिश्रा

कपिल मिश्रा

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीतील मौजपूर भागात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आणि या कायद्याचं समर्थन करणाऱ्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांनी अश्रुधुराचा वापरही केला आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यापासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे.

रविवारी मौजपूर भागात या कायद्याच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्याचं आवाहन केलं होतं.

भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी पोलिसांना तीन दिवसांची मुदत देताना म्हटलं होतं, "जाफराबाद आणि चांद बाग भागातील रस्ते रिकामे करा. त्यानंतर आम्ही समजूत काढण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. आम्ही तुमचं ऐकणार नाही. फक्त तीन दिवस आहेत तुमच्याकडे. तसंच दिल्लीत दुसरं शाहीनबाग होऊ देणार नाही असंही ट्वीट त्यांनी केलं आहे."

कपिल मिश्रा जमावाला संबोधताना म्हणाले, "आम्ही एकही दगड फेकलेला नाही. ट्रंप जाईपर्यंत आम्ही शांत आहोत.. ट्रंप जाईपर्यंत जाफराबाद आणि चांद बाग हे दोन्ही परिसर आम्ही रिकामे करा. त्यानंतर मात्र आम्ही तुमचंही ऐकणार नाही."

मौजपूरमध्ये सीएएच्या समर्थनार्थ निदर्शकांनी घोषणाबाजीही केली. त्याआधी कपिल मिश्रा यांनी लोकांन तिथे पोहोचण्याचं आवाहन ट्विटरद्वारे केलं होतं.

शाहीनबागमधील प्रदर्शन शांततापूर्वक

दिल्लीतील शाहीनबागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. आंदोलकांशी चर्चा करायला सुप्रीम कोर्टातर्फे नियुक्त केलेल्या मध्यस्थांमध्ये वजाहत हबिबुल्लाह यांच्या मते पोलिसांनी शाहीनबाग च्या आसपास पाच सहा जागांवर नाकेबंदी केली आहे.

ANI च्या बातमीनुसार त्यांनी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र तयार करणार असल्याचं म्हटलं होतं. या प्रतिज्ञापत्रावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

दिल्लीच्या जाफराबाद मेट्रो स्टेशनवर कडक सुरक्षाव्यवस्था

दिल्लीच्या जाफराबाद मेट्रो स्टेशनवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या परिसरात महिला नागरिकता सुधारणा विधेयकाच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून निदर्शनं करत आहे. रविवारी त्यांनी मेट्रो स्टेशनजवळ येऊन धरणं देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली.

तिथे पोलीस तैनात केल्यावर मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलं. या स्टेशनवर मेट्रो थांबत नाहीये. तत्पूर्वी शनिवारी दिल्लीच्या शाहीन बाग मध्ये नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधामुळे दोन महिन्यापेक्षा जास्त काळं बंद असलेला एक रस्ता बंद करण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)