मोदी सरकारच्या काळात बँकांच्या NPAमध्ये पाचपट वाढ, #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, AFP

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मोदी सरकारच्या काळात बँकांच्या NPAमध्ये पाचपट वाढ

देशातील आघाडीच्या दहा बँकेतील ढोबळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 2014 पूर्वीच्या दहा वर्षांच्या तुलनेत अवघ्या 5 वर्षांत जवळपास पाचपट वाढले आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियापासून बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब बँक, बँक ऑफ इंडिया अशा सरकारी आणि व्यावसायिक बँकांचा समावेश आहे.

या बँकांकडे 2003-04 नंतरच्या दहा-अकरा वर्षांच्या कालावधीत साडेचार लाख कोटींचे थकीत कर्ज होते. त्यात 2014 ते 2018-19 या कालावधीत 21.41 लाख कोटीपर्यंत वाढ झाली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.

व्यावसायिक प्रफुल्ल सारडा यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) बँकांच्या एनपीएची माहिती मागविली होती. त्यानुसार 2004 ते 2014 या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाच्या (2014-2018) काळात NPAचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे.

देशातील आघाडीच्या केवळ दहाच बँकांच्या ढोबळ NPAचा येथे विचार करण्यात आला आहे. त्यात 2003-04 ते 2013-14 या कालावधीमध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, आयडीबीआय, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकांमधे मिळून NPAचे प्रमाण 4 लाख 50 हजार 574 कोटी रुपये होते. त्यानंतर 2014 ते 2018-19 या आर्थिक वर्षात NPA तब्बल 21 लाख 41 हजार 929 कोटींवर पोहोचला आहे.

2. 'राज ठाकरेंवर खटला दाखल करणार'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातून पकडून दिलेले ते तीनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे नागरिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता या नागरिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या सर्व प्रकाराने संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला असून याविरोधात आता कायदेशीर लढणार असल्याचा निश्चय या नागरिकांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी पुणे पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे रोशन शेख, बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी शनिवारी सकाळीच मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी तिघांना बांगलादेशी असल्याचे सांगून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर हे तिघेही पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.

3. चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागेल : शरद पवार

"देशाचं भवितव्य घडवण्याची युवकांमध्ये ताकद आहे. त्यामुळे तरुणांना संधी मिळाली पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुका सुरु करायला हव्या. त्यामुळे कॉलेज तरुणांना संधी मिळेल," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने 'संवाद साहेबांशी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मार्गदर्शनपर मुलाखत घेण्यात आली.

यावेळी शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. "चंद्रकांत दादांना माझ्यावर पीएचडी करायची असेल, तर त्यांना 10 ते 12 वर्षे वेळ काढावा लागेल," असं शरद पवार म्हणाले.

4. रवी पुजारीला बंगळुरूत आणण्यात आलं

खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या रवी पुजारीला सेनेगलमध्ये पुन्हा अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बंगळुरूमध्ये आणण्यात आलं आहे.

बॉलीवूड कलाकारांसह अनेक बिल्डर्सना त्याने धमकावल्याचे आरोप आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजाराने दाखल केलेली याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. भारतात परतायचं नसल्याने रवी पुजारीने कायदेशीर मार्ग अवलंबला होता.

रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह 200हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. सेनेगलमध्ये रवी पुजारी, अँथनी फर्नांडिस या नावाने राहत होता.

5. सनी हिंदुस्तानी झाला Indian Idol 11 चा विजेता

पंजाबच्या भटिंडा येथील सनी हिंदुस्तानीने इंडियन आयडॉलच्या विजेतेपदावर नाव कोरलं आहे. गरीब पार्श्वभूमी असणाऱ्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचं विजेतपद पटकावलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रातील रोहित राऊत हा या स्पर्धेचा उपविजेता ठरला. विजेतेपद पटकावणाऱ्या सनी हिंदुस्तानीला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रोहितला 5 लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)