नारायण राणे: 'उद्धव ठाकरेंचं सरकार 11 दिवसात पडणार'

नारायण राणे Image copyright Getty Images

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या 11 दिवसात पडेल, असं भाकित माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वर्तवलंय. त्यामुळं आता पुन्हा चर्चेला उधाण आलंय.

भिवंडीतल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले, "महाराष्ट्रातील चालू घडामोडी पाहता, असं वाटतं की, सरकार आज पडेल की उद्या पडेल. पण मी त्याची मुदत 11 दिवसांपर्यंत वाढवलीय. त्यामुळ 11 दिवसात सरकार पडेल की नाही, हे मीडियानं पाहावं. आम्हाला वाटतं, कुठल्याही क्षणी हे सरकार पडू शकतं"

"महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या कुठल्याच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आश्वासनं दिली, पण पूर्तता करण्याची क्षमता मुख्यमंत्री किंवा या सरकारमध्ये नाहीय," असंही नारायण राणे म्हणाले.

Image copyright Getty Images

याआधीही अनेकदा नारायण राणे यांनी सरकार पडणाची आणि पाडण्याची विधानं केली होती.

राणेंच्या वक्तव्यावर बीबीसी मराठीनं महाविकास आघाडीची बाजूही जाणून घेतली.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली. गुलाबराव पाटील म्हणाले, "ते भविष्यकार आहेत का? स्वत:चं भविष्य ते बनवू शकले नाहीत, दुसऱ्याचं काय सांगणार?"

Image copyright Twitter/@OfficeofUT

तसंच, महाविकास आघाडीचं काम जोरात सुरू असल्याचं म्हणत गुलाबराव पाटील पुढं म्हणाले, "ज्यांना भाजपना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये."

दरम्यान, नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडण्याबाबतचं भाकित पहिल्यांदाच केले नाही. याआधीही ते अशाप्रकारे म्हणालेत. त्याचवेळी, सद्यस्थितीत राज्यात सुरु असलेल्या घडामोडींचा विचार करता, राणेंचं वक्तव्य किती गंभीर मानायचं, याबाबत आम्ही राजकीय पत्रकारांचंही मत जाणून घेतलं.

याबाबत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकमेकांवर अवलंबून आहेत. प्रत्येकजण आपापली स्पेस निर्माण करतंय. मात्र, सरकार पडणं आपल्या कुणाच्याही हिताचं नाही, हेही त्यांना चांगलं ठाऊक आहे."

Image copyright Twitter/@MeNarayanRane

मग हे सरकार पडण्याचं भाकित करुन नारायण राणे काय साध्य करतायत, असा प्रश्न उपस्थित होतो. यावर बोलताना दीक्षित म्हणतात, "विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना आपल्या वक्तव्यांमधून हवा निर्माण करणं हे सहाजिक आहे."

शिवाय, "अशी विधानं करुन राणेंचा प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न आहे. दुसरा पक्ष फोडायचं म्हटल्यास मोठी संख्या फोडावी लागेल. मध्य प्रदेशसारखी स्थिती इथं नाहीय. त्यामुळं महाराष्ट्रात सद्यस्थिती पक्ष फोडून सरकार पाडणं अशक्यप्राय गोष्ट आहे," असं मतही प्रशांत दीक्षित नोंदवतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)