Father's Day: 'बाबांना शेवटची मिठी मारायची राहून गेली'

  • प्रतिनिधी
  • बीबीसी मराठी
दिक्षा दिंडे

फोटो स्रोत, Facebook/Diksha Dinde

फोटो कॅप्शन,

दिक्षा दिंडे

(व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या एका वक्तव्याने मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर चर्चा सुरू झाली होती. यातले काही संदर्भ मुद्दामहून ठेवले आहेत. फादर्स डे आहे त्यानिमित्त हा लेख शेअर करत आहोत.)

व्याख्यात्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या महिलांविषयक वक्तव्यांची बीबीसी मराठीनं बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे. काहीजण अपर्णा रामतीर्थकर यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत तर काही जणांनी त्यांच्यावर टीका केली.

आजकालच्या मुली या वडिलांना मिठी मारतात, वडील पुरुष आहे याचं भान मुलींना नको का? अशा आशयाचं वक्तव्य रामतीर्थकर यांनी केलं होतं. त्यावर अनेक मुलींनी आक्षेप नोंदवला आहे. एका मुलीच्या आयुष्यात वडिलांची किती महत्त्वाची भूमिका असते आणि जर ते नसतील तर तिला काय वाटतं ही गोष्ट एक तरुणीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिक्षा दिंडे ही तरुणी सांगते की "आज माझे वडील असते तर माझं यश पाहून ते आनंदाने मोहरून गेले असते. मी त्यांना मिठी मारली असती पण ती शेवटची मिठी मारायची राहून गेली."

फोटो स्रोत, Facebook/Diksha Dinde

फोटो कॅप्शन,

दिक्षा दिंडे

राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध सामाजिक पुरस्करांनी गौरवलेल्या दिक्षा दिंडे या तरुणीनं बीबीसी मराठीशी बातचीत करत, अपर्णा रामतीर्थकर यांच्या वक्तव्यांबाबत आपली भूमिका मांडली.

दिक्षा ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'वर्ल्ड अॅट स्कूल' उपक्रमाची 'जागतिक युवा शिक्षण राजदूत' म्हणून काम केलंय. तसंच, स्त्रियांशी संबंधित विविध सामाजिक संघटनांशीही दिक्षा संलग्न आहे.

अपर्णा रामतीर्थकर यांनी स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधात आजवर अनेक विधान केली आहेत. बीबीसीच्या 'अपर्णा रामतीर्थकर फक्त महिलांनाच का देताहेत उपदेशाचे डोस?' या बातमीत तुम्हाला ती विधानं सविस्तर वाचता येतील.

दिक्षानं बीबीसीशी बोलताना अपर्णा रामतीर्थकर यांच्या या दोन वाक्यांवर विशेष भर दिला :

"आमच्या पिढीनं कधी वडिलांच्या अंगाला हात लावला नाही. आणि आज आपले एवढाले टाईट टाईट कपडे घालायचे, थ्री फोर्थ घालायचं, एवढसं वरचं घालायचं, पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. पप्पा पुरुष आहेत ते लक्षात येत नाही? गाऊन घातल्यानं कसलं मोकळं वाटतं तुम्हाला?"

"चूल आणि मूल जोखड आहे? चूल आणि मूल जोखड असेल तर भारतीय स्त्रीचं अस्तित्व काय राहतं याचं उत्तर देऊ शकता? चूल हे अन्नपूर्णेचा मान आहे."

ही दोन्ही वाक्यांवर दिक्षाने आपले विचार मांडले आहे. विशेषत: वडिलांना मिठी मारण्याला रामतीर्थकरांचा असलेला आक्षेप दिक्षाला चुकीचा वाटतो.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'जागतिक युवा शिक्षण राजदूत' होण्यापर्यंत भरारी घेणाऱ्या दिक्षाचं वैयक्तिक आयुष्य फारच खडतर राहिलंय. दिक्षा जन्मत: विकलांग आहे.

दिक्षाच्या वडिलांचा 2005 साली अपघात झाला. त्यानंतर दिक्षाचं संपूर्ण कुटुंब मोठ्या हलाखीच्या स्थितीला सामोरं गेलं. आजारपणात असलेल्या दिक्षाच्या वडिलांचं 2016 साली निधन झालं.

फोटो स्रोत, DIKSHA DINDE

फोटो कॅप्शन,

दिक्षा दिंडे आणि तिचे कुटुंबीय

वडिलांना 'हक्काचा खांदा' अशी उपमा देत दिक्षा सांगते, "आज जर वडील असते, तर माझं यश पाहून त्यांना मला जवळ घेतलं असतं. आजही कित्येकदा राहून राहून असं वाटतं की, आज बाबा असते तर त्यांना मिठी मारता आली असती."

जागतिक स्तरावर भारताचा झेंडा अभिमानानं फडकवणाऱ्या दिक्षा तिच्या वडिलांना शेवटची मिठी मारायची राहून गेल्याचं सांगताना भावनिक होते.

अपर्णा रामतीर्थकर यांचं म्हणणं ती फेटाळतेच. त्याचसोबत दिक्षा तरुण मुला-मुलींना म्हणते, "तुमचे बाबा असतील, तर हक्कानं मिठी मारा, त्यांना जवळ घ्या, मिठी मारा आणि त्यातून तुमचं निस्वार्थी नातं असंच उलगडू द्या."

बापलेकीचं नातं आणि त्या नात्यातलं आपलेपण अनुभवकथन करतानाच, अपर्णा रामतीर्थकर यांच्या दुसऱ्या वाक्याकडेही दिक्षा वळते. ते वाक्य म्हणजे, 'चूल हे अन्नपूर्णेचा मान आहे.'

फोटो स्रोत, APARNA RAMTIRTHKAR/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

अपर्णा रामतीर्थकर

इथं मात्र दिक्षा तिच्या आईचं उदाहरण देते. दिक्षाला सर्वांत मोठा पाठिंबा तिच्या आईनं दिल्याचं ती सांगते.

"घरची आर्थिक स्थिती बिकट असताना, आईनं घराबाहेर पाऊल ठेवलं आणि काम करून पैसे मिळवले. त्यातून दिक्षा आणि तिच्या बहिणीला शिकता आलं, उंबरठा ओलांडता आला आणि उंच आकाशात भरारी घेता आली."

दिक्षा म्हणते, "अपर्णा रामतीर्थकर सांगतात त्याप्रमाणे माझी आई चूल आणि मूल करत राहिली असती, तर मीही इतक्या उंचीवर पोहोचू शकले नसते."

ती म्हणते, "ज्यावेळी वडिलांचा अपघात झाला आणि आई घराबाहेर कामासाठी पडली. त्यावेळी आजूबाजूच्या पुरुषसत्ताक संस्कृतीच्या पगड्याखाली असलेल्या अनेकांनी हिणवलंच की, नवरा घरी आणि बायको बाहेर कामावर."

दिक्षाच्या आईने घराची जबाबदारी उचलून मुलींना शिकवलं.

अपर्णा रामतीर्थकर सांगतात की बायकांना स्वयंपाक आलाच पाहिजे आणि घर सांभाळणं हे बाईचंच काम आहे. दिक्षा सांगते, "माझे वडील घरातली सगळी कामं करायचे. माझे मित्र-मैत्रीण जरी घरी आले, तरी त्यांच्यासाठी चहापासून जेवणापर्यंतची कामं ते करायचे. त्यांना त्यात कोणताच कमीपणा वाटत नव्हता."

असं सांगत ती आपल्या वडिलांच्या आठवणीत हरवते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)