देवेंद्र फडणवीस यांना सामनातून सल्ला, 'तुम्ही कामाला लागा' : #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस, सामना, शिवसेना, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

देवेंद्र फडणवीस

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. देवेंद्रजी, कामाला लागा - सामना

नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं होतं. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतील पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा, असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

'शेतकरी, कष्टकरी अशा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला काहीच हरकत नव्हती. विरोधी पक्षनेता शॅडो मुख्यमंत्री असतो. विरोधी पक्ष नेत्याकडे प्रश्न आणि माहिती घेऊन लोक जात येत असतात. पण फडणवीस या कामात अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यांच्याकडे अर्धवट माहिती आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सुसंवाद आहे. सरकार चालवणे या भूमिकेवर तिन्ही पक्ष ठाम आहेत. हीच विरोधी पक्षाची पोटदुखी असेल तर आमचा नाईलाज आहे,' असं सामनातील अग्रलेखात लिहिण्यात आलं आहे.

'फडणवीस यांनी दोनदा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत संवाद साधूनही महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे.' असं पुढे लिहिण्यात आलं आहे.

2. सरपंचच काय, मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडायला हवा-अण्णा हजारे

"या सरकारला विकेंद्रीकरण आणि आर्थिक पारदर्शकता नकोय, असं स्पष्ट दिसतंय. त्यामुळेच ग्रामपंचायत सदस्यातून सरपंच निवडीची पद्धत आणली जातेय. पण त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. फक्त गावचे सरपंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडून दिले पाहिजेत," असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, GANESH BHAPKAR

फोटो कॅप्शन,

अण्णा हजारे

लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालवलेली लोकशाही येऊ शकेल. त्यामुळे सकाळी आठ वाजता शपथविधी घेण्याची वेळ येणार नाही किंवा वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये राजकारण्यांना राहण्याची गरज पडणार नाही असंही ते म्हणाले.

3. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं जात प्रमाणपत्र रद्द

सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. निवडणुकीच्या वेळी त्यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जातपडताळणी समितीने घेतला आहे. 'नेटवर्क 18'ने ही बातमी दिली आहे.

लिंगायत समाजातील गुरु असणाऱ्या जयसिद्धेश्वर स्वामी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला त्यांनी सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान दक्षता समितीचा अहवाल आपल्याला मान्य नसून उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामींनी स्पष्ट केलं.

4. भीमा-कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांचीही साक्ष नोंदवणार

भीमा-कोरेगावप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांनी ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी भीमा कोरेगावबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे.

अॅड. प्रदीप गावडे यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तात्काळ साक्ष घेण्यात यावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. तसा अर्ज त्यांनी चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानंतर आयोगानं शरद पवारांना चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

5. म्हणून वडिलांनी डीजेच्या तालावर काढली 22 वर्षीय मुलाची अंत्ययात्रा

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अंत्ययात्रेवेळी वातावरण गंभीर असतं. जो व्यक्ती गेला आहे त्याचे आप्तस्वकीय शोकाकुल असतात. मात्र नागपुरात डीजे लावून चक्क अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजत होता, दुसरीकडे लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. लोक एकमेकांना धीर देत होते. 22 वर्षीय युवा बॉक्सर प्रणव राऊतने गळफास घेऊन आत्महत्या केली. 'दिव्य मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

शास्त्री स्टेडियमजवळ असलेल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रणवने गळफास लावून आत्महत्या केली. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. प्रणवचे वडील राष्ट्रपाल हे नागपूर शहर पोलिसांच्या गणेशपेठ ठाण्यामध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाही बॉक्सिंगची प्रचंड आवड होती. त्यांनीच प्रणवला बॉक्सिंग खेळण्यासाठी प्रेरणा दिली होती. रोहतकमध्ये 28 जानेवारी रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये प्रणव पराभूत झाल्याने तो निराश झाला होता.

आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये प्रणवने बाबा मला माफ करा, मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं नाही. आपली अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी अशी इच्छा प्रणवने व्यक्त केली होती. म्हणून डीजेच्या तालावर अंत्ययात्रा काढण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)