डोनाल्ड ट्रंपः नरेंद्र मोदी धार्मिक स्वातंत्र्याच्या बाजूनेच

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, PMO

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या बाजूनेच असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या डोनाल्ड ट्रंप यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यासंबंधी माहिती दिली.

भारतात CAA वरुन सुरू असलेल्या विरोधी आणि समर्थनार्थ मोर्चांसंबंधी डोनाल्ड ट्रंप यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "आमच्यात (मोदींसोबत) धार्मिक स्वातंत्र्याबाबत चर्चा झाली. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असायला हवं, या बाजूनंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यादृष्टीनं ते कामही करतायत."

तसंच, "काही जणांवर हल्ले झाल्याचं मी ऐकलं, मात्र आम्ही त्यावर चर्चा केली नाही. कारण ते भारतापुरतं मर्यादित आहे," असं ट्रंप म्हणाले.

यावेळी ट्रंप यांना दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावरही प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, दिल्लीतली अशांतता हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

काश्मीरबाबात बोलताना ट्रंप म्हणाले, "काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील प्रमुख अडथळा आहे. मात्र, मोदी हे कणखर नेते आहेत. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात."

दरम्यान, डोनाल्ड ट्रंप यांनी भारत दौऱ्यादरम्यान 3 अब्ज डॉलर किंमतीच्या हेलिकॉप्टार व्यवहारावर स्वाक्षरी केली. शिवाय, अमेरिका आणि भारतात ऊर्जा करारावरही स्वाक्षरी करण्यात आली.

भारतातील हा दौरा विशेष होता, हा दौरा विसरणं अशक्य आहे, भारतीयांनी केलेलं स्वागत अप्रतिम होतं, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यात दुपारी नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

"आपली लोकशाही एकसारखी आहे, आपली मूल्यं एक आहेत, आपली राज्यघटना कणखर आहे. जेव्हापासून मी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतलाय, तेव्हापासून भारत-अमेरिकेतील व्यापार वाढलाय, त्यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो," असं ट्रंप यांनी पुढे म्हटलंय.

"आपल्या आर्थिक संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करून आनंदी आहे, रत आणि अमेरिकेतील भागिदारी आधीपेक्षा आणखी कणखर झालीय," असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

दोन्ही देशांमध्ये तीन अब्ज डॉलरपेक्षा अधिक किंमतीचे लष्करी उपकरणं खरेदी करण्याच्या करारासह संरक्षण सहकार्याचा करारावर एकमत झालं आहे.

ट्रंप यांनी आज सकाळी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

भारत-अमेरिका संबंध दृढ-मोदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भारतभेट अतिशय महत्त्वाची आणि दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांना बळकटी देणारी आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

मोदी म्हणाले, "गेल्या आठ महिन्यातली ट्रंप यांच्याबरोबरची ही पाचवी भेट आहे. अहमदाबाद इथल्या मोटेरा स्टेडियमवर ट्रंप, यांचं झालेलं दिमाखदार भव्य स्वागत कायमस्वरुपी स्मरणात राहील. अमेरिका-भारत संबंध हे फक्त दोन्ही देशांच्या सरकारदरम्यानचे नसून दोन्ही देशांच्या नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन आहेत.

"मोठ्या व्यापारी करारादृष्टीने सकारात्मक चर्चा झाली आहे. अंतर्गत सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीने झालेला करार भारत-अमेरिका संबंध बळकट करणारे आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. दोन्ही देशातील लष्करी उपकरणांचे उत्पादक एकमेकांसाठी लष्करी साहित्याचे पुरवठादार झाले आहेत. सुरक्षा, ऊर्जा, व्यापार- दोन्ही देशांदरम्यानचे संबंध आणखी बळकट करण्यादृष्टीने आमची प्रदीर्घ चर्चा झाली," असं मोदी म्हणाले

ते पुढे म्हणाले, "भारत-अमेरिका मैत्रीचा पाया दोन्ही देशातील लोकांच्या एकमेकांशी असलेल्या घनिष्ठ ऋणानुबंधाने रचला आहे. भारतीय तंत्रज्ञ असो किंवा विद्यार्थी-भारतीयांनी अमेरिकेच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली आहे. गेल्या तीन वर्षात दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारी संबंधांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारी संबंधांमध्ये स्थिरता आली आहे.

दोन्ही देशांदरम्यानच्या परस्पर सामंजस्यामुळे संबंध अधिक दृढ झाले आहेत. इंडो-पॅसिफिक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भांचा विचार करता इंडो-अमेरिका संबंध महत्त्वाची भूमिका बजावतील."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)