बालाकोट एअरस्ट्राईक : 'ते' अनुत्तरित प्रश्न ज्यांची उत्तरं भारत-पाकिस्तानने टाळली

  • सलमान रावी
  • बीबीसी प्रतिनिधी
बालाकोट एयर स्ट्राइक

फोटो स्रोत, Bhushan Koyande/Hindustan Times via Getty Images

बालाकोट हवाई हल्ल्यांच्या दाव्यांना एक वर्षं पूर्ण झालंय. पण आजही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. याची उत्तरं ना भारताने दिली आहेत, ना पाकिस्तानने.

14 फेब्रुवारी 2019... जम्मू काश्मीरच्या पुलवामाजवळ एक जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) 78 वाहनांचा ताफा सापडला होता. या स्फोटामध्ये 40 जवान जागीच ठार झाले आणि साऱ्या देशात आक्रोश उसळला.

हे सगळं नेमकं लोकसभा निवडणुकीच्या आधी झालं आणि यावरून राजकारण तापलं.

याच्या दोनच आठवड्यांनंतर भारताने प्रत्युत्तराचा दावा केला. भारतीय वायु सेनेच्या 'मिराज - 2000' विमानांनी रात्रीच्या अंधारात नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानच्या वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामधल्या बालाकोट शहरातल्या जैश-ए-मोहम्मद नावाच्या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांवर एकामागोमाग एक 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याचा दावा भारताने केला.

या ऑपरेशनचं सांकेतिक नाव होतं - 'ऑपरेशन बंदर'

फोटो स्रोत, Getty Images

याविषयी भारताचे तेव्हाचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी जाहीर केलं : "या बिगर सैनिकी कारवाईत मोठ्या संख्येने जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी, त्यांना प्रशिक्षण देणारे, संघटनेचे मोठे कमांडर आणि आत्मघाती हल्ल्यांसाठी घडवण्यात येणारे जिहादी मारले गेले."

पाकिस्तानचं प्रत्युत्तर

दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. भारताची लढाऊ विमानंही कारवाईसाठी सज्ज होती. या 'डॉग-फाईट'मध्ये भारतीय वायुसेनेच्या मिग-21 ने पाकिस्तानी वायुसेनेचं एक एफ-16 पाडल्याचा दावा भारताने केला. नंतर पाकिस्ताननेही मिग-21 पाडलं आणि विंग कमांडर अभिनंदनना अटक केली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना मुक्त करण्यात आलं.

बालाकोटच्या या 'सर्जिकल स्ट्राईक'विषयी पाकिस्तान आणि भारताने दावे-प्रतिदावे केले आहेत. पण या पूर्ण प्रकरणाविषयीचे काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या उद्देशाने बालाकोटवर 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आला त्यात भारत यशस्वी झाला का?

मरकज सय्यैद अहमद शहीद हे जैश-ए-मौहम्मदच्या त्या मदरशाचं नाव आहे जो प्रत्यक्षात एक आत्मघातकी हल्ल्यांचं प्रशिक्षण देणारा कॅम्प असल्याचं भारताचं म्हणणं आहे.

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानी लष्करानं पत्रकारांच्या एका गटाला बालाकोटला नेलं, हे खरं आहे. पण ज्या इमारतीवर भारताने हल्ला केल्याचा दावा केला तिथ पर्यंत या पथकाला नेण्यातच आलं नसल्याचा आरोप आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या पत्रकारांनी ही इमारत ज्या टेकडीवर आहे तिथे जाण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी लष्करानं त्यांना खैबर पख्तुनख्वामधल्या त्या टेकडीवर जाण्याची परवानगी न दिल्याचाही आरोप आहे. ही परवानगी का देण्यात आली नाही? याविषयी सवाल उपस्थित होत आहेत.

या घटनेच्या महिन्याभरानंतर 28 मार्चला पत्रकारांच्या एका गटाला पाकिस्तानी लष्करानं त्या ठिकाणी नेलं. आणि ही इमारत सुस्थितीत असल्याचं या गटाला आढळलं. या पत्रकारांनी मदरशात शिकणाऱ्या मुलांशी आणि स्थानिक नागरिकांसोबत चर्चाही केली. पण हल्ल्यामुळे झालेल्या नासधुसीची पाकिस्तानी लष्करानं महिन्याभराच्या काळात डागडुजी केल्याचा भारताचा आरोप आहे.

पण मग भारताच्या लढाऊ विमानांनी डागलेले बॉम्ब त्यांचा रोख असणाऱ्या दहशतवादी तळांवर नेमके पडले का? अतिरेकी संघटनांचं खरंच यामुळे नुकसान झालं का? हल्ल्यात पाकिस्तानचं किती नुकसान झालं?

याविषयीची ठोस सरकारी माहिती उपलब्ध नाही. पण सरकारी सूत्रांचा हवाला देत भारतीय मीडियाने केलेल्या दाव्यांनुसार, 'या हल्ल्यात जवळपास 300 अतिरेकी मारले गेले.' हे हल्ले बालाकोट, चाकोठी आणि मुज्जफराबादमध्ये असणाऱ्या तीन 'अतिरेकी तळांवर' करण्यात आल्याचा दावा एएनआय वृत्तसंस्थेने केला होता. पण यानंतर आपण फक्त बालाकोटवरच हल्ला केल्याचं भारताने स्पष्ट केलं.

भारतातर्फे एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानतर्फे चालवण्यात येणाऱ्या 'दहशतवादी तळांवर' भारताने हल्ला केला असून यामध्ये 'अतिरेकी संघटनेचं' मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.

या नुकसानाचा अंदाज बांधला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण नेमकं किती नुकसान झालं हे सांगण्याची जबाबदारी त्यांनी देशाच्या राजकीय नेतृत्त्वावर सोडली. पण असं असूनही या हल्ल्यामध्ये नेमके किती अतिरेकी मारले गेले, हे आजवर सांगण्यात आलं नाही.

पण बालाकोटमध्ये झालेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती 'दहशतवादी' मारले गेले आणि त्यांचं किती नुकसान झालं यावषियची बातम्या सूत्रांच्या हवाल्याने मीडिया देत राहिला.

सर्जिकल स्ट्राईक ज्यावेळी झाला तेव्हा मदरशाजवळ 200च्या आसपास मोबाईल हजर होते आणि याच फोन्सना ट्रेस करत भारतीय वायुसेनेच्या विमानांनी निशाणा साधल्याचं सांगण्यात आलं. म्हणूनच या हल्ल्यामध्ये 'अतिरेकी संघटनेचे' जवळपास 200 आत्मघातकी अतिरेकी मारले गेल्याच्या गोष्टी भारताद्वारे करण्यात येतात.

पण भारताने खरंच पाकिस्तानचं एक लढाऊ एफ-16 विमान पाडलं होतं, या दाव्याचंही ठोस उत्तर मिळू शकलेलं नाही. या विमानाचा युद्धात वापर केला जाणार नाही, या अटीवर अमेरिकेने पाकिस्तानला हे विमान दिलेलं होतं.

बॉम्ब नेमके कुठे पडले?

जिथले 'दहशतवादी तळ' उद्ध्वस्त करण्याचा दावा भारताने केला होता त्या भागात जाण्याची परवानगी सर्जिकल स्टाईकला महिन्याभरापेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने वृत्तसंस्था रॉयटर्स, अल जझीरा आणि बीबीसीच्या पत्रकारांना दिली.

पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी पत्रकारांना त्या मदरशात घेऊन गेले तेव्हा तिथे काही मुलं अभ्यास करत होती. आणि या मदरशाच्या इमारतीचं नुकसान झाल्याच्या कोणत्याही खाणाखुणा दिसत नसल्याचं या पत्रकारांनी आपल्या वृत्तात म्हटलं होतं.

काही पत्रकारांनी जवळच्या गावांनाही भेट दिली आणि स्फोटांचे आवाज या गावांत ऐकू आल्याचं एका साक्षीदाराचा हवाला देत म्हटलं.

एक गावकरी हल्ल्यात घायाळ झाल्याचंही सांगण्यात आलं. या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली होती. हे बॉम्ब जंगलात पडल्याचं साक्षीदाराने पत्रकारांना सांगितलं. त्यानंतर पत्रकारांचा गट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तिथे कोसळलेली झाडं आणि स्फोटांमुळे जमीनीवर झालेल्या खड्ड्यांच्या खुणा आढळल्या.

भारताचं म्हणणं काय?

पाकिस्तानी सैन्याने पत्रकारांना लगेचच घटनास्थळी जाण्याची ताबडतोब परवानगी का दिली नाही? असा सवाल उपस्थित होतो.

मग महिनाभरापेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर पत्रकारांच्या गटाला तिथे का नेण्यात आलं? या काळात पाकिस्तानी लष्कराने तिथे असलेले सगळे पुरावे नष्ट केल्याचा भारत सरकारचा आरोप आहे.

'सर्जिकल स्ट्राईक'च्या ताबडतोब नंतर भारतीय पत्रकारांना दाखवण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये इमारतींच्या छपरांचं नुकसान झालेलं दिसत होतं. पण महिन्याभरानंतर पाकिस्तानात असणाऱ्या परदेशी वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना जेव्हा तिथे नेण्यात आलं तेव्हा त्या इमारतीचं नुकसान झाल्यासारखं वाटत नव्हतं.

पाकिस्तानचं म्हणणं काय?

भारताच्या या ऑपरेशनमध्ये रिकाम्या डोंगरावर बॉम्ब टाकण्यात आले आणि यामध्ये कोणीही जखमी झालं नसल्याचं मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पाकिस्तानी लष्करातर्फे बोलताना सांगितलं.

यात फक्त काही झाडांचं नुकसान झाल्याचा त्यांचा दावा होता. भारताची जेट विमानं पाकिस्तानच्या रडारवर आल्यानंतर पाकिस्तानी वायु सेनेने त्यांना आव्हान दिलं आणि ही विमानं परत गेल्याचं त्यांचं म्हणणं होतं. या विमानांनी परत जाताना 'जाबा' डोंगरांवर बॉम्ब टाकले.

फोटो स्रोत, TWITTER/MAJ GEN ASIF GHAFOOR

फोटो कॅप्शन,

जर जनरल आसिफ गफूर

पण पाकिस्तानी वायु सेनेने आव्हान देऊनंही भारताच्या लढाऊ विमानांना बॉम्ब टाकण्यात यश कसं आलं? हे गफूर यांनी सांगितलं नाही.

प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानने भारतीय वायु दलाची दोन विमानं पाडली आणि दोन पायलट्सना पकडल्याचं पाकिस्तानी मीडियाने लष्कराचा दाखला देत म्हटलं होतं. पण त्यानंतर एकच विमान पाडण्यात आल्याला दुजोरा देण्यात आला. याच विमानातून विंग कमांडर अभिनंदन यांना अटक करण्यात आली होती. यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना मुक्त केलं.

भारताचा दावा

भारतीय वायु सेनेने दाखवलेल्या 'हाय रिझोल्यूशन' फोटोंमध्ये ढासळलेल्या चार इमारती दिसत होत्या. सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला त्यावेळी मदरशात 200च्या आसपास मोबाईल्स काम करत होते असं आपल्या 'नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन' म्हणजेच 'एनटीआरओ'ने सांगितलं होतं, हे मोबाईल ट्रॅक करण्यात आले आणि त्यावेळी तिथे अतिरेकी उपस्थित असल्याचा हा पुरावा होता असं भारताचं म्हणणं होतं.

फोटो स्रोत, AFP

या इमारतींची डागडुजी करण्यात आल्यानंतरच पत्रकारांना तिथे नेण्यात आलं, असा भारताचा दावा आहे.

नुकसान झाल्याचं मान्य केल्यास किती नुकसान झालं आणि त्यावेळी इमारतीत किती लोक उपस्थित होते याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून चौकशी होईल म्हणूनच पाकिस्तान नुकसान झाल्याचं नाकारत असल्याचं तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटलींनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. किती जण मारले गेले आणि किती जखमी आहेत, हे प्रश्न पाकिस्तानला टाळायचे होते.

सध्यातरी दोन्ही देशांकडून विचारण्यात आलेल्या या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. दोन्ही देश आपापल्या दाव्यांवर ठाम आहेत. आपल्याकडे याविषयीचे पुरावे असल्याचा दोन्ही देशांचा दावा आहे. पण दोन्ही देश आपल्याकडे पुरावे दाखवायला तयार नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)