जागतिक पालक दिन : 'माझी लेकच आता मला सांगते, ममा टेन्शन मत लो, सब हो जाएगा'

  • अमृता दुर्वे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"माझा मुलगा दोन - तीन महिन्यांचा होता...आणि मला त्याचा खूप राग यायचा...माझ्या मोठ्या मुलीचाही राग यायचा, समजायचंच नाही असं का होतंय...मग नंतर ढसाढसा रडू कोसळायचं..."

मूल झाल्यानंतरच्या अपेक्षित नेहमीच्या गोंडस - गोजिरवाण्या भावनांच्या अगदी उलट असं हे विधान.

बाळाचा जन्म झाला की घरात सगळीकडे आनंदी आनंद असतो, बाळाच्या आईच्या आयुष्यातला हा सगळ्यात सुंदर काळ असतो या आणि अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्षं ऐकलेल्या असतात. पण अनेक नव-मातांसाठी वास्तव यापेक्षा प्रचंड वेगळं आणि धक्कादायक असतं.

साधारणपणे 15 ते 20 टक्के महिलांना बाळंतपणानंतर या पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास होतो.

पोस्टपार्टम ब्ल्यूज आणि पोस्टपार्टम डिप्रेशन

बाळंतपणानंतर जसे स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होतात, तसेच बदल मनातही होतात. त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या तीव्रता दिसून येतात.

फोटो स्रोत, Getty Images

बाळंतपणानंतर लगेच जाणवणारं सौम्य प्रकारचं नैराश्य म्हणजे पोस्टपार्टम ब्ल्यूज. बाळाची काळजी आपल्याला घेता येईल का, आपल्याला पुढे सगळं जमेल का याप्रकारची ही चिंता असते. बाळ झालेल्या जवळजवळ 40 ते 50 % महिलांमध्ये हे ब्लूज आढळत असल्याचं डॉ. हमीद दाभोलकर सांगतात. ते म्हणतात, "साधारण एका आठवड्यात पोस्टपार्टम ब्लूजची लक्षणं कमी होतात. पण त्यापेक्षा जास्त काळ ही लक्षणं राहिली आणि त्याची तीव्रता वाढली, त्याचा परिणाम दैनंदिन आयुष्यावर व्हायला लागला तर त्याचं रूपांतर पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये झालंय असं समजलं जातं.साधारणतपणे 15 ते 20 टक्के महिलांना बाळंतपणानंतर या पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास होतो."

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसांगाना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख या सीरिजचा भाग आहे.

बाळंतपणानंतर घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. हा काळ कुटुंबाच्या आयुष्यातला चांगला काळ समजला जातो. पण आजूबाजूला असं आनंदाचं वातावरण असूनही या नवीन आईला मात्र निराश वाटत असतं. वेगवेगळे विचार मनात यायला लागतात. आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटतं. काही करू नये असं वाटायला लागतं किंवा आजूबाजूच्या माणसांवर चिडचिड होऊ लागते. झोपेवर परिणाम होतो. भुकेवर परिणाम होतो.

काही वेळा त्यातून टोकाच्या भावना डोक्यात येतात. स्वतःचा जीव घ्यावा किंवा बाळाचा जीव घ्यावा असे विचार डोकावू लागतात.

घालमेल, राग आणि नैराश्य

"माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी माझी मोठी मुलगी 5 वर्षांची होती. माझी सतत चिडचिड व्हायची. नवरा कामानिमित्त बाहेर असायचा आणि मग सगळा राग लेकीवर निघायचा..." बाळंतपणानंतरच्या नैराश्याविषयी विचारल्यानंतर 38 वर्षांच्या बिंदी गुडखा भडाभडा बोलू लागतात.

फोटो स्रोत, Getty Images

"घरात कामं पडलेली असायची, पण मला बसून रहावंसं वाटायचं. क्षणात राग यायचा, क्षणात रडू कोसळायचं. काय होतंय ते कळायचं नाही. तान्हं बाळ रात्री जागलं की माझी चिडचिड व्हायची. दुसरीकडे पाच वर्षांच्या माझ्या मोठ्या मुलीलाही आई हवी असायची. पण काहीही कारण नसताना मला तिचा राग यायचा. खरंतर ती देखील लहानच होती. रागाच्या भरात कधीतरी तिला मी फटका द्यायचे आणि मग नंतर एकटीच रात्ररात्र रडत बसायचे. माझा नवरा कामानिमित्त बाहेर असायचा. आणि मला होणारा त्रास नेमका काय आहे, ते सासूला समजत नव्हतं. "

"काय होतंय ते खरंतर मलाही समजत नव्हतं. तासाभरापूर्वी ठेवलेली वस्तूही सापडायची नाही. मला माझ्या बाळाची ओढ होती, त्याच्याविषयी प्रेम वाटायचं, पण सोबतच खूप चिडचिड - वैताग व्हायचा. घरातली कामं, मोठं मूल हे सगळं सांभाळणं मला जमत नाहीये, असं मला वाटत होतं. तर आम्ही हे सगळं केलं, तर तुला का जमत नाही, असं सासूचं म्हणणं होतं."

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पेशाने पत्रकार असलेल्या प्राची कुलकर्णींचा अनुभवही असाच काहीसा. प्राची सांगतात, "मला मुलगीच हवी होती. डिलिव्हरी नंतर तिला घेऊन घरी आलो. पण मला खोलीबाहेर पडावंसचं वाटायचं नाही. बाळाच्या निमित्ताने खाणं-पिणं सगळंच खोलीत व्हायचं. कोणी भेटायला आलं तरी बाहेर यावंस वाटायचं नाही. लेक रडायला लागली की खूप चिडचिड व्हायची. आमचं घर वरच्या मजल्यावर आहे. तिला एकदा फिरवताना मनात विचार आला, इथून हिला खाली टाकून दिलं तर काय होईल? असं काही बाही डोक्यात यायचं. आणि नंतर आपण आपल्याच बाळाविषयी असा विचार करतोय, हे जाणवून धक्का बसायचा.

हे सगळं सुरू असताना मुख्य अडचण होती ती लॅक्टेशनची - लेकीला पुरेस स्तनपान देता येत नव्हतं. त्यासाठी एका डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आम्ही दीनानाथ हॉस्पिटलला जात होतो. रस्त्यात एका सिग्नलला गाडी थांबली. अचानक डोक्यात आलं, हे बाळ सारखं रडतं. जर आपण हिला आता रस्त्यात सोडून दिलं, तर ती मोठी झाल्यावर आपल्याला सापडेल का? ओळखू येईल का? आपल्या डोक्यात काय विचार आला हे जाणवल्यावर डोक्यात धोक्याची घंटा वाजली. कोणी स्वतःच्या बाळाबद्दलच असा विचार कसा करू शकतं? म्हणून मग मी माझ्या गायनॅकचा सल्ला घेतला. मला सतत काम करण्याची सवय असल्यानेही हा त्रास होत असेल असं त्यांना वाटलं. यानंतर मी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. हा पोस्टपार्टमचा त्रास असल्याचं मला हमीद दाभोलकरांशी बोलल्यावर समजलं. B12 आणि D3ची डेफिशियन्सी हे देखील माझ्या नैराश्यामागचं एक मोठं कारण होतं. "

का येतं नैराश्य?

"आपल्याकडे एक मानसिकता असते. पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलेला गरजेपेक्षा जास्त सल्ले आणि मदत मिळते. तिला बाळ झाल्यानंतर सगळे जण मदतीला तयार असतात. पण बाळ झाल्याझाल्या त्या महिलेने 'नॉर्मल' व्हावं आणि काम करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा असते. दुसऱ्यांदा बाळ होताना मात्र फारसं कोणी लक्ष देत नाही. कारण यावेळी तिला बाळंतपणाचा अनुभव असतो, मूल सांभाळण्याचा - वाढवण्याचा अनुभव असतो. पण प्रत्येक प्रेग्नन्सी, डिलीव्हरी वेगळी असते. दुसऱ्यांदा बाळंत होणाऱ्या स्त्रीलाही ही मदत मिळायला हवी." बिंदी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

याविषयी डॉ. हमीद दाभोलकर म्हणतात, "आपण अनेकदा बातम्या वाचतो की आईने बाळाचा जीव घेत स्वतःचंही आयुष्य संपवलं. खरंतर हे बहुतेकदा निदान न झालेल्या पोस्टपार्टम डिप्रेशनचं प्रकरण असतं. पण त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. आपल्या समाजात खासकरून जर मुलगी जन्माला आली तर त्याचं समाजात तितकंसं अजूनही स्वागत होत नाही. मुलाची अपेक्षा असेल तर त्या महिलेवर सासरच्यांचा दबाव असतो. अशा सगळ्यातनं मुलीच्या जन्मानंतर त्या आईला असं नैराश्य येण्याची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे एकत्र कुटुंब राहिलेली नाही. त्यामुळे पूर्वी सहजपणे उपलब्ध असणारी सपोर्ट सिस्टीम आता उपलब्ध नसते. नोकरी करणाऱ्या आईला तशा स्वरूपाच्या सुविधा मिळत नाहीत. कधीकधी बाळाच्या बाबाचा हवा तितका या सगळ्यात सहभाग नसतो. मग या सगळ्याचं दडपण, बाळाची काळजी, अपुरी झोप, या सगळ्या चिंतांमधून निराशेची लक्षणं चालू व्हायला लागतात. शिवाय समाजाने आणि स्वतः उभ्या केलेल्या चांगल्या आईच्या संकल्पनांविषयीच्या अपेक्षांचं ओझंही असतंच."

समाजाची भूमिका

पेशाने पत्रकार असलेल्या प्राची कुलकर्णींनी आपला हा अनुभव फेसबुकच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला. फेसबुकवरचा हा त्यांचा गोतावळा नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या पलिकडचा होता. फारशा बोलल्या न जाणाऱ्या या गोष्टीबद्दल प्राचीने अगदी खुलेपणाने लिहीलं. मग त्यावरच्या प्रतिक्रिया काय होत्या?

"बहुतेक सगळ्यांचं म्हणणं होतं, की असं काही असतं हेच मुळात आम्हाला माहिती नव्हतं. अनेक मैत्रिणींनी सांगितलं की आम्हालाही हा त्रास झाला, पण असं प्रेग्नन्सीनंतर होतंच असं आम्हाला वाटलं. हे काहीतरी वेगळं आहे हे आम्हाला माहितच नव्हतं. कोणाची तरी मदत घ्यायला हवी हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं हे आपल्याकडे अजूनही 'टॅबू' आहे. त्यामुळेसुद्धा हे टाळलं जातं. अजूनही मला हे विचारणारे फोन येतात की आम्हाला अमुक त्रास होतोय, आम्ही डॉक्टरांकडे जायला हवं असं तुला वाटतं का. कोणी माझ्या अनुभवाविषयी सवाल केले नाहीत. पण त्यामुळे एक जागरूकता निर्माण झाली. मी ज्या वर्तमानपत्रात काम करते त्या पुणे मिररमध्येही मी पुढे याविषयी लेख लिहीला."

2018मध्ये प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सनेही एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याविषयीचं मनोगत व्यक्त केलं होतं.

सेरेना विल्यम्स आणि पोस्टपार्टम डिप्रेशन

टेनिस जगामध्ये सर्वात जास्त चॅम्पियनशिप्स जिंकणाऱ्या या जगज्जेतीला आपण चांगली आई नसल्याच्या भावनेने घेरलं होतं. या पोस्टमध्ये सेरेनाने लिहीलं, "माझ्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवर काही घडामोडी होत होत्याच पण मी एकूणच घाबरलेली होते. मी चांगली आई नसल्याचं मला वाटत राही. पोस्टपार्टम डिप्रेशनवर उपाय केला नाही तर ते अगदी 3 वर्षांपर्यंत राहू शकतं असं मी काही लेखांमध्ये वाचलं होतं. माझी आई, बहिणी आणि मैत्रिणींशी बोलल्यावर समजलं की माझ्या मनातल्या या भावना अगदी नॉर्मल होत्या. आपण आपल्या बाळासाठी पुरेसं काही करत नाही, असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आपण सगळ्यांनाच ते कधी ना कधी वाटलेलं आहे. मी खूप काम करते, व्यायाम करते. सर्वोत्तम अॅथलीट होण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करतेय. मी माझ्या लेकीसोबत रोज असते. पण मला तिला हवा तेवढा वेळ देता येत नाही. तुमच्यापैकी अनेकांच्या बाबतही हेच होत असेल. गृहिणी असो वा नोकरीवर जाणारी आई, मुलं आणि काम यात समतोल साधणं कौशल्याचं आहे. तुम्ही खऱ्या हिरो आहात.

मला फक्त इतकंच सांगायचं - तुमचा दिवस वा आठवडा खराब जात असेल, तर - इट्स ओके. माझीही तीच स्थिती आहे. पण रोज एक नवीन दिवस असतो!"

भारतामध्ये अभिनेत्री मंदिरा बेदीनेही 'द तारा शर्मा शो'मध्ये बोलताना आपल्या पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी सांगितलं होतं.

उपचार

प्रत्येकासाठी यावरचे उपाय वेगवेगळे असतात. आपल्याला होत असलेला त्रास हा - पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे बाळंतपणानंतर येणारं नैराश्य असल्याचं रूटीन चेकअपसाठी गेल्यानंतर बिंदीला समजलं. तिला होणारा त्रास नेहमीपेक्षा वेगळा असल्याचं तोपर्यंत तिच्या नवऱ्याच्याही लक्षात आलं होतं. घरची परिस्थिती मग पुढे त्याने सांभाळून घेतली. घरातून मिळालेला पाठिंबा आणि काहीही मनात आलं तर सांगता येईल अशा हक्काच्या मैत्रिणी बिंदीच्या आधार बनल्या. सोबत त्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढत व्यायाम करायला, संगीत ऐकायला सुरुवात केली. हळुहळू मनातला कल्लोळ शांत झाला.

"हल्ली काही झालं, मी चिडचिड करायला लागले तर माझी लेकच मला सांगते, 'ममा, इतना टेन्शन मत लो, सब हो जाएगा...' 10 वर्षांची माझी लेकच आता माझा मोठा आधार बनलीय," बिंदी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

या पोस्टपार्टम डिप्रेशनमधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेविषयी प्राची सांगतात, "डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढचं वर्षंभर उपचार घेतले. सुदैवाने मला वेळेत उपचार मिळाले. औषधं आणि काऊन्सेलिंग सेशन्सच्या मदतीने मी यातून बाहेर पडले. माझ्या घरच्यांची मला भक्कम साथ होती. गोळ्यांनी मला रात्री झोप यायची. हा तो काळ होता जेव्हा बाळं रात्री दुधासाठी उठतात. तेव्हा मग मुलगी आजी जवळ असायची. असं काही असतं, असा त्रास होऊ शकतो याची कल्पना ना आईला होती ना सासूला. पण समजल्यानंतर त्यांनी पूर्ण सोबत केली. भावनिक कल्लोळ आणि हे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे हे लक्षात येणं या दरम्यानचा काळ मात्र कठीण होता. डोक्यात काहीही विचार आला तरी ते कृतीत आणायचं नाही, हे डॉक्टरांनीही बजावलं होतं. मनातून या गोष्टी काढून टाकण्यासाठी मी डायरीत लिहून काढायचे. बेबी वेअरिंगचीही मला खूप मदत झाली. "

डॉ. हमीद दाभोलकर सांगतात, "दोन - तीन पातळ्यांवर प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सी ठरवून केलेली असणं आणि त्यानंतर बाळंतपणानंतरच्या जबाबदाऱ्यांची विभागणी होणं महत्त्वाचं आहे. यामध्ये कुटुंबाचा आणि बाळाच्या बाबाचा सहभाग असला तर हे टळू शकतं. जर कधी लक्षणं जाणवायला लागली तर त्यात आपल्यात काही कमतरता आहे, किंवा आपल्याला हे जमत नाही असा विचार करण्याऐवजी ही पोस्टपार्टम ब्लूज वा डिप्रेशनची लक्षणं नाहीत ना, हे समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्या विवाहित जोडप्यांना याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे. कारण यांना आज ना उद्या बाळ होणार आहे. अशी लक्षणं दिसली तर सगळ्यांनाच काही डॉक्टरकडे जाऊन औषधं घ्यावी लागत नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यावर अनेक छोट्या छोट्या गोष्टी करता येतात. भावनिक प्रथोमपचारांनी आपल्या जवळच्या व्यक्तीतल्या अस्वस्थपणाची काळजी घेता येईल. भावनिक प्रथमोपचार म्हणजे - त्या स्त्रीला पुरेशी झोप मिळेल याची काळजी घेणं, थोडावेळ बाळाची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घेणं, कामाच्या ठिकाणी त्या स्त्रीला आधाराची भावना, फ्लेक्झिबिलीटी मिळाली तर यातूनही ताण कमी होऊ शकतो."

जर समजा लक्षणं आठवडाभरापेक्षा जास्त काळ राहिली, कामावर परिणाम व्हायला लागला, स्वतःचा किंवा बाळाचा जीव घ्यावा असे विचार येऊ लागले तर मनोविकारतज्ज्ञांची मदत तातडीने घ्यावी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

डॉ. दाभोलकर सांगतात, "अशा परिस्थितीमध्ये मन स्थिर करण्यासाठी औषधं घ्यावी लागू शकतात. आपल्या समाजात याविषयीही फारशी चांगली भावना नाही. शिवाय बाळंतपणानंतर बाळ अंगावर पीत असताना देखील बाळाला औषधांमुळे काही होईल का, अशा स्वरूपाच्या चिंता कुटुंबाला वाटत असतात. पण तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करता येऊ शकतं. आता खूप सेफ आणि प्रभावी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे हे नैराश्य आटोक्यात येऊ शकतं. हे स्त्रीच्या आरोग्यासाठी जसं महत्त्वाचं आहे तसंच हे बाळाच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठीही महत्त्वाचं आहे. कारण आईचं मन जर आनंदी नसेल तर स्वाभाविकपणे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतं."

अशाप्रकारे मानसिक उपचारांसाठी तज्ज्ञांची मदत घेण्याचं प्रमाण आता वाढतंय. समाजात याविषयी खुलेपणा येतोय. पण हे प्रमाण अजून वाढायला हवं.

शरीर जसं आजारी पडतं, तसंच मनही आजारी पडू शकतं.

शरीर आजारी पडल्यास त्यात आपल्याला कमीपणा वाटत नाही. मग मन आजारी पडल्यावर कमीपणा का वाटून घ्यावा?

त्यावर वेळच्या वेळी उपचार घेतल्यास आपण अधिक चांगलं आयुष्य जगू शकतो.

या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग बिंदी सांगतात, "आपल्याला त्रास होतोय हे जर लक्षात येत असेल तर घाबरण्याची वा गप्प राहून ते सहन करण्याची गरज नाही. हे नॉर्मल आहे. यात लाज वाटण्यासारखं काही नाही. आपण स्वतःलाच सांगायला हवं - इट्स ओके. स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी, यातून बाहेर पडण्याची मुळात तुम्ही तयारी दाखवायला हवी. पॉझिटिव्ह रहायला हवं. जर तुम्हीच स्वतःला 'जज' केलं नाहीत, तर मग जगही तुम्हाला 'जज' करणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)