गुप्तधनाचं आमिष दाखवून 5 बहिणींवर बलात्कार : #5मोठ्याबातम्या

महिला अत्याचार

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

1. गुप्तधनाचं आमिष दाखवून 5 बहिणींवर बलात्कार

पुत्रप्राप्ती आणि घरात असलेलं गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्यानं एका भोंदूबाबानं एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरीमध्ये 22 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पिंपरी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोमनाथ याने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे आणि नग्नपूजा करावी लागेल, असे उपाय या भोंदूबाबाने सांगितले होते.

2. दिल्लीत तत्काळ गोळी घालण्याचे आदेश

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. या हिंसाचारामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेक जण जखमी आहेत. एकूणच दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण आहे.

या परिस्थितीत केंद्र सरकारने दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ही बातमी लोकमतने दिली आहे.

फोटो स्रोत, PTI

बुधवारी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली.

3. अरविंद सावंत, रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द

माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या विशेष नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना युतीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तर रवींद्र वायकर यांना राज्यातील मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं.

फोटो स्रोत, Facebook

त्यामुळे विशेष नियुक्या करत दोन्ही नेत्यांच पुनर्वसन करण्यात आलं होतं. मात्र दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप होत असल्याने त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

4. तुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका

नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडका लावला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अनधिकृत असलेल्या संतोष आंबेकर यांचा इतवारी परिसरातील आलिशान बंगला पाडण्यात आला आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

संतोष आंबेकर यांच्यावर अनेक वर्षे गँग चालवून कोट्यवधींची संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. याच बंगल्यात अनेक काळे कारनामे, मारहाण, खंडणीसाठी टॉर्चर, तरुणींवर बलात्कार केल्याचे सुद्धा आरोप आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात आतापर्यंत मारहाण, खंडणी, बलात्कार, लुबाडणूक असे वेगवेगळे 18 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.

5. नितीश कुमारांचा NRC विरोधात ठराव

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारच्या विधीमंडळात NRC विरोधातील ठराव मंगळवारी मंजूर केला. तसंच बिहारमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) देखील नव्या नियमांनुसार न करता जुन्या पद्धतीनेच करण्याचं त्यांनी निश्चित केलं आहे. यामुळे त्यांनी मोदी सरकारला एक प्रकारे धक्काच दिला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

CAAला पाठींबा असणाऱ्या नितीशकुमार यांनी सुरुवातीपासूनच NRCला मात्र विरोध दर्शवला आहे. बिहारच्या सरकारने एनपीआरमधील काही नियम बदलण्यात यावेत यासाठी पत्र लिहिल्याचं देखील नितीशकुमार यांनी सभागृहात सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे भाजपनं या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)