नारायण राणेः उद्धव ठाकरे सरकार 11 दिवसही का टिकणार नाही याची ही आहेत कारणं

नारायण राणे, उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप, देवेंद्र फडणवीस
फोटो कॅप्शन,

भाजप नेते नारायण राणे

"मुख्यमंत्री स्वतः फाईल बघत नाहीत, निर्णय घेत नाहीत. असे कसे मुख्यमंत्री असू शकतात," अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे सरकार अकराच दिवसांत पडेल, या त्यांच्या वक्तव्यामागचं कारणं सांगितली आहेत.

सरकार अस्थिर असून 11 दिवसही टिकणार नाही, असं भिवंडीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी म्हटलं होतं.

"या कार्यक्रमाची सांगता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण तो पर्यंत परिस्थिती बदलू शकते आणि 'माजी मुख्यमंत्री' म्हणण्याऐवजी 'मुख्यमंत्री' देवेंद्र फडणवीस म्हणावं लागू शकतं" असं नारायण राणे म्हणाले होते.

बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणेंनी सांगितलं, "हे सरकार जास्त काळ टिकेल असं काही काम करत नाहीये. सरकारने दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. आताच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही सातबारा कोरा करु, कर्जमाफी देऊ.

आताची जी कर्जमाफीची नावं जाहीर केली आहेत, त्यात सातबारा कोरा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. राज्याचा विकास आम्ही करु असं ते म्हणाले होते. पण राज्याने विकासाच्या दृष्टीने कोणंतही पाऊल पुढे टाकलेलं नाही. बेकारीचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ते प्रश्न सोडवायला सरकार असमर्थ आहे. तीन पक्षांत अंतर्गत वाद आहेत. पक्षा-पक्षामध्ये वाद आहेत. सरकार दीर्घकाळ चालेल असं या परिस्थितीमुळे वाटत नाही.

"विकासकामं, रेल्वे, पीडब्ल्यूडीच्या कामांना स्थगिती दिलीय. कामं थांबवलेली आहेत. आता ती काम परत सुरू करतील, तोपर्यंत सरकारचा कितीतरी पैसा वाया जाणार आहे. कामं तर कोणतीही होत नाहीयेत. सरकारची आर्थिक स्थिती कठीण आहे. अशावेळेला सरकार काम करतंय, असं कसं म्हणायचं?

फोटो कॅप्शन,

नारायण राणे

नारायण राणेंनी कार्यक्रमादरम्यान सरकार अस्थिर असल्याचं म्हटल्यानंतर त्याविषयीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

भाजपने ज्यांना बकरा बनवलं त्यांनी अकराची भाषा करू नये, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं.

यावर नारायण राणे म्हणाले, "कोणीच म्हणत नाहीये की हे स्थिर सरकार आहे. मुख्यमंत्रीही म्हणतात, कधीही पाडा. ते कधी मोदींना भेटतात, कधी अमित शहांना भेटतात. कधी सोनियाजींना भेटतात. गुलाबराव पाटील यांच्यासारख्या व्यक्तीकडून मी दुसरी अपेक्षा करणार नाही. त्याच्या वाक्याला मी उत्तर देणार नाही."

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

नारायण राणे

नारायण राणेंनी अशी भविष्यवाणी यापूर्वीही अनेकदा केली होती, त्यामुळे त्यांना आता गांभीर्याने घेतलं जाऊ नये, असं विरोधकांचं म्हणणं आहे. याविषयी नारायण राणे सांगतात, "गांभीर्याने घ्यावं की घेऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी सीरियसलीच बोलतो. पडद्यामागे जे घडतंय, ते घडल्याशिवाय मी सांगणार नाही. ते घडेल तेव्हा आपल्याला कळेल."

सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू असताना 'बाजारात खूप आमदार आहेत' असंही विधान नारायण राणेंनी केलं होतं. त्यावर राणे म्हणतात, "त्यावेळी देवेंद्रंनी शपथ घेतली होती, अजितदादा परत गेले नसते, तर सरकार भाजपंचं आणि एनसीपीचं असतं."

पण अजितदादा कोणामुळे परत गेले, हे आपल्याला माहित नसल्याचं नारायण राणे सांगतात. शिवाय देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, याविषयीही आपल्याला माहीत नाही, पण ते दिल्लीत जातील असं वाटत नसल्याचंही नारायण राणेंनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)