दिल्ली हिंसाचार: 'सरकारनं आम्हाला मरण्यासाठी सोडून दिलंय'

दिल्ली, हिंसाचार Image copyright EPA
प्रतिमा मथळा दिल्ली

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्ताने उफाळलेल्या हिंसाचारामुळे दिल्ली जळते आहे अशी परिस्थिती आहे.

मंगळवारी ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचार होत असलेल्या भागात आम्ही पोहोचलो तेव्हा काही लोकांनी आम्हाला घेरून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

आमच्या फोनमध्ये हिंसक घटनांचं रेकॉर्डिंग होतं. आम्ही मोबाईल फोन वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच दगडफेकीला सुरुवात झाली. तेवढ्यात एका गल्लीतून हाताला कपडा बांधलेल्या एका मुलाला बाहेर निघताना पाहिलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या छतावरून कोणीतरी गोळी झाडली.

हा सगळा प्रकार बघितल्यानंतर हा रस्ता जा-ये करण्यासाठी बंद करण्यात आला. आम्ही या मार्गानेच मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत होतो.

हा रस्ताच बंद करण्यात आल्याने आम्हाला अरुंद छोट्या गल्ल्ल्यांमधून वाट काढत यावं लागलं. आम्हाला तुलनेने सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं होतं जिथे जमाव कमी आक्रमक असेल.

प्रतिमा मथळा दिल्लीतलं दृश्य

उत्तर दिल्लीत वृत्तांकन करताना अशा परिस्थितीचा सामना करण्याचा आमची ही पहिलीच वेळ नव्हती. दिल्लीला पाहून असं वाटतं की उद्रेकाच्या उंबरठ्यावरचं शहर आहे. कधीही, कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

मंगळवारी आम्ही जमावबंदीचं कलम लागू केलेल्या भागात गेलो. या कलमाचा अर्थ तीनपेक्षा जास्त माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. याच भागात जमावाने अख्ख्या बाजाराला आग लावली. स्थानिकांनी सांगितलं की बहुतांश दुकानं मुसलमान समाजाची होती.

प्रतिमा मथळा संवेदनशील भाग

जळत्या टायरचा दुर्गंध आणि जळत्या बाजारातून निघणारा काळा धूर खूप दुरूनही दिसत होता. मात्र या सगळ्याचं चित्रीकरण करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर काही तरुण दुकानांवर दगडफेक करत होते. आम्ही हे रेकॉर्ड करत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी आमच्यावरही दगड फेकायला सुरुवात केली. आम्ही एका ओव्हरब्रिजवर होतो परंतु दगडांच्या हल्ल्यातून आम्ही थोडक्यात बचावलो. जीव वाचवून आम्हाला तिथून पळावं लागलं.

धार्मिक घोषणांचा जयघोष

आम्हाला सातत्याने जय श्रीरामच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. काही ठिकाणी शंभर ते दोनशे जणांचे जमाव चाल करून जात होते. यापैकी काही लोकांच्या हातात तिरंगा होता. काहीजण भगवा झेंडा घेऊन जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. या जमावातली काही माणसं देशाच्या गद्दारांना गोळी घाला अशा घोषणाही देत होते.

प्रतिमा मथळा दिल्लीत झालेला हिंसाचार

दुसरीकडे मुस्लीम मोहल्ल्यांच्या काही गल्ल्यांमध्ये हातात लोखंडी सळ्या, लाठ्या आणि तत्सम वस्तू हातात घेऊन तरुण उभे होते.

दोन्हीकडची माणसं आम्हाला सांगत होती की परिसराच्या बाहेर तरुण मुलांना उभं केलं होतं जेणेकरून हल्ला झाला तर थोपवता येईल.

या हिंसक घटनांमध्ये अनेक मुसलमान मारले गेल्याच्या अफवा पसरल्या. अनेक हिंदू जखमी झाल्याच्या बातम्या पसरल्या. हिंदूंची घरं जाळलं गेल्याच्या बातम्या येत होत्या.

मात्र कोणीही या बातम्यांसंदर्भात अधिकृत माहिती देत नव्हतं.

ऑटो ड्रायव्हर गुलशेर सांगतात, प्रशासन नावाचं काही उरलंच नाही. सरकारने लोकांना लढणं आणि मरण्यासाठी सोडून दिलं आहे.

राजीव नगरच्या रेजिडेंट कमिटीचे महासचिव इस्लामुद्दीन सांगतात की, काही बाहेरचे लोक हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

1984 दंग्यांशी तुलना

इस्लामुद्दीन यांनी परिस्थतीची तुलना 1984 दंगलीशी केली आहे. त्यावेळी अख्ख्या दिल्लीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहायला मिळाला होता.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक वक्तव्यं केलं होतं तेव्हाच त्यांच्यावर कारवाई झाली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती असं इस्लामुद्दीन यांना वाटतं.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा दिल्लीतली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

कपिल मिश्रा आम आदमी पक्षाचे माजी आमदार आहेत. आता ते भाजप नेते आहेत आणि प्रक्षोभक भाषणं आणि वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांवेळी भारत वि. पाकिस्तान मुकाबला पाहायला मिळेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

गेल्या रविवारी त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दिल्ली पोलिसांना अल्टीमेटम दिला होता. तीन दिवसात जाफ्राबादचे रस्ते रिकामे झाले नाहीत तर आम्ही तुमचंही (पोलिसांचं) ऐकणार नाही.

दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारासाठी कपिल मिश्रा यांचंच वक्तव्य जबाबदार असल्याचं मानलं जात आहे. मात्र उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार गौतम गंभीर कपिल यांच्या वक्तव्याशी सहमत नाहीत. असं असूनही कपिल मिश्रा यांच्यावर भाजपकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मिश्रा यांनी आपल्या भाषणात जे म्हटलं तीच भाषा जमावातली अनेक माणसांच्या तोंडी होती.

मंगळवारी रात्री कपिल मिश्रा यांनी ट्वीट करून म्हटलं की जाफ्राबाद रिकामं झालं आहे, दिल्लीत दुसरं शाहीन बाग होऊ देणार नाही.

याच्या काही तासांआधीच त्यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बंद रस्ते खुले करणं हा काही गुन्हा नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थन हा गुन्हा नाही.

आशावाद बाकी

एका रिटेल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या रोशनने मुस्लीमबहुल भागात खजूरी कच्ची च्या दिशेने इशारा करताना सांगितलं की येत्या तीन दिवसात त्या लोकांकडून हा भाग रिकामा करून घेण्यात येईल.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पृथ्वीराजने जवळपास तीनशे लोकांच्या जमावाकडे इशारा देताना सांगितलं की पोलीस या लोकांना काहीच सांगत नाहीत. कारण हे लोक दंगलखोर नाहीत. हे सगळं मुसलमान करत आहेत.

पोलिसांनी खजुरी कच्ची की परिसरात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

हिंसा आणि भीतीच्या वातावरणातही राजेंद्र मिश्रा यांच्यासारखी काही माणसं आहेत जे हिंसाग्रस्त भागापैकी एक असणाऱ्या चांदबागेत सुरक्षित वाटतं. चांदबाग मुस्लीमबहुल भाग आहे.

सोमवारी रात्री मुसलमान आणि हिंदूंनी एकत्र येऊन मंदिराच्या बाहेर पहारा दिला. याआधी सोमवारी एका जमावाने पीर चांद शाह यांच्या दर्ग्याला काही दंगलखोरांनी आग लावून दिली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)