मराठी भाषा दिन : महाराष्ट्रातल्या लोप पावत चाललेल्या या बोलीभाषा तुम्हाला माहिती आहेत?

लमाण महिला Image copyright Getty Images

भाषा ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते. प्रत्येक भाषेचं वेगळं वैशिष्ट्य असतं. यामध्ये उपभाषा, पोटभाषा, बोलीभाषा, लिपी या सगळ्यांचा गोतावळा असतो.

परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य भाषेच्या माध्यमातून केलं जातं. भाषेमुळेच संस्कृतीची देवाणघेवाण होते. पण एखादी भाषा किंवा त्यातील बोली लोप पावत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम संस्कृतीवरही होतो. त्यामुळेच की काय, भाषा हा कोणत्याही संस्कृतीच्या अस्मितेचा विषय मानला गेला आहे.

आज मराठी राजभाषा दिन. या निमित्ताने मराठीतील लोप पावत चाललेल्या बोलीभाषांची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

महाराष्ट्राचे भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या पाच भाग पडलेले आहेत. त्यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांचा समावेश आहे. याशिवाय कर्नाटक-तेलंगणच्या सीमावर्ती भागाचाही विचार केला जातो.

सध्याच्या काळात महाराष्ट्रात वैदर्भीय बोली, मराठवाडी बोली, कोकणातील बोली आणि उर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापुरी, आगरी, पुणेरी, मालवणी, वऱ्हाडी, झाडीबोली, अहिराणी, डांगी, कोकणी या अशा अनेक बोलींचा मराठीत समावेश आहे.

लोप पावत चाललेल्या बोलीभाषा पुढीलप्रमाणे -

कोळी भाषा

होय, वरकरणी हे खरं वाटणार नाही, पण कोळी भाषा संकटात असल्याचं मत डॉ. सुधीर देवरे व्यक्त करतात. डॉ. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङमयांचे अभ्यासक आहेत. त्यांनी अहिराणी भाषेवर विपुल लेखन केलेलं आहे.

डॉ. देवरे सांगतात, "महाराष्ट्रातील किनारी भागात प्रामुख्याने राहणारा कोळी समाज पूर्वी एकत्र राहत होता. त्यातून त्यांची कोळी भाषा आणि संस्कृती विकसित होत गेली. पण मासेमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे कोळी बांधवांना आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ आली. मासेमारी सोडून हा समाज बांधकाम मजुरी, शेतमजुरी तसंच शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणावर वळला. त्यामुळे एकत्र राहणारा समाज विखुरला गेला आहे. याचा परिणाम भविष्यात त्यांच्या भाषेवर होऊ शकतो."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कोळी समाज

कोळी गीते आणि इतर मुबलक लेखन असूनसुद्धा बोलणारे व्यक्ती विखुरल्यामुळे कोळी भाषा संकटात आहे. संस्कृत भाषेतसुद्धा अशाच प्रकारे विपुल लेखन झालं होतं. पण बोलणारे लोक नसल्यामुळेच आज संस्कृत भाषेवर परिणाम झाला असल्याचं डॉ. देवरे सांगतात.

पारधी भाषा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भाषा आणि वाङमय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पारधी भाषेविषयी विस्तृतपणे सांगितलं.

ते सांगतात, "महाराष्ट्राच्या मध्यभागातील अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील माळरानावर पारधी समाज प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्यांची विशिष्ट अशी पारधी बोलीभाषा आहे. ही भाषा मराठी, गुजराती, राजस्थानी आणि कानडी भाषेचं मिश्र स्वरूप आहे. या समाजातील उच्च शिक्षित तरूणांचं या भाषेवर प्रभुत्व नाही. त्यामुळे पूर्वीच्या पिढीतील लोकांशी ते मराठी किंवा हिंदीत व्यवहार करतात. त्यामुळे हळुहळू ही भाषा बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे."

वडारी

सोलापुरातील सीमावर्ती भागात सापडणाऱ्या वडारी समाजात ही भाषा बोलली जाते. तेलुगू आणि कन्नड या भाषांचा वडारी भाषेवर प्रभाव आहे.

वडार समाज हा मूळतः बांधकाम व्यवसायात आहे. समाजातील शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. गेल्या काही काळात बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आल्यामुळे समाजातील काही लोकांकडे पैसा तर आला.

या समाजातील लोक मोठ्या प्रमाणात महानगरांमध्ये स्थलांतरित झालेत. पण भाषेविषयी पुरेशी जागरुकता नसल्यामुळे त्यांची भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहे, असं कोळेकर सांगतात.

कादोडी बोलीभाषा

कादोडी ही मराठीची अत्यंत दुर्लक्षित बोली म्हणता येईल. वसई आणि वसईच्या आसपासच्या गावांमध्ये या बोलीचा वापर केला जातो. त्याला सामवेदी किंवा कुपारी असंही म्हटलं जातं. सामवेदी बोली ही सामवेदी ब्राह्मण, पाचकळशी आणि सामवेदी ख्रिस्ती समुदायांमध्ये बोलली जाते.

या भाषेवर कोकणी, मराठी, गुजराती भाषांचा प्रभाव दिसून येतो. या बोलीला लिपिबद्ध करणं थोडेसं अवघड आहे, मात्र तरिही गेल्या काही वर्षांमध्ये या बोलीचं देवनागरी लिपीमधलं लेखन प्रकाशित करण्याचे प्रयत्न झाले आहेत. कुपारी समाजाने आपल्या चालीरिती, लग्नप्रथा, गाणी जपण्याचा प्रयत्न केला आहे. कादोडी नावाने एक अंकही प्रकाशित केला जातो.

कैकाडी, महारी, चांभारी, लमाण

महाराष्ट्रातील ठराविक मागास जातींच्या विशिष्ट भाषा आहेत. त्यांना त्यांच्या जातीच्या नावाने ओळखले जाते. पूर्वी या समाजातील लोक या बोलीभाषेचा वापर सर्रास करायचे. पण आता या भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं निरीक्षण डॉ. सुधीर देवरे नोंदवतात.

'बोलीभाषांच्या लुप्त होण्याला जातीयवादाची किनार'

बोलीभाषांच्या ऱ्हासाला सामाजिक परिस्थिती कारणीभूत असल्याचं निरीक्षण डॉ. देवरे आणि डॉ. कोळेकर हे दोन्ही संशोधक नोंदवतात.

Image copyright INDRANIL MUKHERJEE

डॉ. देवरे यांच्या मते, "तुलनेत मागास असलेल्या जातीतील लोक शिक्षणामुळे मुख्य प्रवाहात आले. पण सामाजिक परिस्थिती आणि मागासलेपणाच्या न्यूनगंडातून आपली ओळख जाहीर होण्याची भीती नेहमीच त्यांच्यामध्ये होती. या भीतीतूनच त्यांनी त्यांच्या बोलीभाषांचा त्याग केला. अजूनही या भाषा काही ठिकाणी बोलल्या जातात. पण सार्वजनिकरीत्या या भाषा बोलणं टाळलं जातं. त्यामुळे याचा परिणाम या बोलीभाषांवर होऊ शकतो. या भाषा बोलणाऱ्यांची संख्या केवळ बोटांवर मोजण्याइतपत उरेल.

प्रा. कोळेकर यांचं मतही अशाच प्रकारचं आहे. पूर्वी आपली ओळख जपण्यासाठी या भाषा निर्माण झाल्या होत्या. पण कालांतराने समाजातील हेवेदाव्यांमुळे आयडेंटीटी क्रायसिस निर्माण झाला. अशा स्थितीत या भाषा बोलल्या तर समाजात आपल्यासला मागास समजलं जाईल. त्यामुळे आपण मुख्य प्रवाहातून दूर जाऊ ही भीती सतत ही बोलीभाषा बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये असल्याचं ते सांगतात.

लिपीत रुपांतर नाही

लोप पावत चाललेल्या भाषांचे डॉक्युमेंटेशन झाल्यास या भाषांचे संवर्धन करता येईल, असं प्रा. कोळेकर यांना वाटतं.

ते सांगतात, "महाराष्ट्रातील विशेषतः भटक्या विमुक्त समाजाच्या भाषांना वाईट अवस्था आलेली आहे. शैक्षणिक अज्ञान आणि विशिष्ट लिपी नसल्यामुळे या बोलीभाषा मागे राहिल्या आहेत. त्यामुळे या भाषा टिकवून ठेवायचं असेल, तर या भाषांचं डॉक्यूमेंटेशन होणं गरजेचं आहे. जुन्या जाणत्या लोकांनी आपली अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसंच आजच्या तरूणांनी ही आपली बोलीभाषा म्हणून स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच या बोलीभाषा टिकून राहण्यास मदत होईल."

एकूण बोलीभाषा किती?

मराठी विश्वकोशातील लेखात मराठी भाषा आणि तिच्या बोलीभाषांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मराठीच्या पोटभाषांचा पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. अभ्यासकांमध्ये याबाबत विविध मतप्रवाह आहेत.

मराठीला बोलीभाषांचा समृद्ध वारसा लाभलेला असल्याचं पाहायला मिळत. ढोबळमानाने विचार केल्यास मराठीत 60 ते 70 च्या दरम्यान बोलीभाषा आहेत, असं म्हणता येईल.

विश्वकोशातील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे भाषातज्ज्ञ ग्रीअर्सनने वेगवेगळ्या भागांतले नमुने गोळा करून दिल्यामुळे पोटभाषांचे पुसट चित्र आपल्याला मिळते. पण सबंध भाषिक प्रदेशाचा अभ्यास झाल्याशिवाय हे चित्र स्पष्ट होणार नाही.

पोटभाषांचं वर्गीकरण कसं?

पोटभाषांच्या वर्गीकरणात ध्वनी, व्याकरणप्रक्रिया आणि शब्दसंग्रह यांच्यातील भेदांचा विचार करावा लागतो. इतर काही मराठी बोलींतील 'ळ' च्या 'ल' किंवा 'य' किंवा 'र' असणाऱ्या बोली निश्चितपणे वैशिष्यपूर्ण आहेत. तीच गोष्ट 'ला' (मला) याऐवजी 'ले' (मले) किंवा '-आक' (माका, घराक) यांचा उपयोग करणाऱ्या बोलींची. अशा प्रकारची वैशिष्टये आणि त्यांची प्रदेशवार व्याप्ती, म्हणजे भौगोलिक मर्यादा शोधून काढल्याशिवाय मराठीचे म्हणजेच ती ज्या पोटभाषा, बोली यांनी बनली आहे. त्यांचे स्वरूप निश्चत होणार नाही.

Image copyright Getty Images

त्याचप्रमाणे जाती, धर्म वर्ग इ. स्पष्टपणे भिन्न असणाऱ्या समूहांच्या बोलींचे भौगोलिक सहअस्तित्व लक्षात घेणेही या बाबतींत आवश्यक आहे.

सध्यातरी किनारपट्टीतील 'सागरी' किंवा कोकणी मराठी, घाटाच्या पूर्वेला लागून असलेली देशी, उत्तरेकडील 'खानदेशी' पुर्वेकडील 'वऱ्हाडी' आणि साधारणत: मध्यवर्ती अशी मराठवाडयाची 'दक्षिणी' असे भेद स्पष्ट होतील. तसंच तावडी, कुणबी, नागपुरी, कोल्हापुरी, बेळगावी आणि डांगी किंवा चित्पावनी यांसारख्या बोली प्रामुख्याने बोलल्या जातात. आदिवासींच्याही कोरकू, माडिया आणि वारली यांच्यासारख्या भाषाही महत्त्वाच्या मानल्या जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या

जगातील कोरोनबाधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे, 52 हजार मृत्यू

'जिवंत राहायचंय बस, पुढचं पुढे पाहता येईल,' लॉकडाऊनमध्ये भरडलेल्या सेक्स वर्कर्सची कहाणी

चीनमधल्या या शहरात आता कुत्रा आणि मांजर खाण्यावर बंदी

कोरोनाशी मुकाबला करणारे व्हेंटिलेटर्स नेमके काय असतात, ते इतके महत्त्वाचे का आहेत?

कोरोना व्हायरस: धारावी झोपडपट्टीत तिसरा रुग्ण सापडला

'5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनिटं विजेचे दिवे बंद करा, पणत्या लावा,' नरेंद्र मोदींचं आवाहन

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच चेहऱ्यावर मास्क बांधावेत?

मुंबईतील 'त्या' 3 दिवसांच्या बाळाची कोरोना चाचणी आता निगेटिव्ह

'येत्या 20 दिवसांत मी आई होईन, माझं बाळ सुखरूप राहायला हवं'