दिल्ली दंगल : अजित डोभाल यांनी RSS आणि अमित शहा यांच्याबद्दल बोलण्यापासून रोखलं

अजित डोभाल Image copyright Ani

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून झालेल्या धार्मिक हिंसाचारामुळे दिल्लीत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

तीन दिवसांनंतरसुद्धा परिस्थिती नियंत्रणाखाली येऊ शकली नाही. बुधवारी उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारलं तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाला भेट देऊन लोकांशी चर्चा केली.

यावेळी यमुनेच्या दुसऱ्या ताटवरच्या परिसरातील मुस्लिमांवर अत्याचार झाल्याचं एका ज्येष्ठ मुस्लीम व्यक्तीने अजित डोभाल यांना सांगितलं. यादरम्यान, त्यांनी RSS आणि अमित शाह यांचं नाव घेतलं. तेव्हा दोभाल म्हणाले, "माझ्या कानांना गरज आहे इतकंच बोला."

ज्या ठिकाणी मुस्लीम कमी संख्येने आहेत, अशा ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहे. आपण कोणत्याच हिंदूवर अत्याचार होऊ देत नसल्याचंही त्या व्यक्तीने सांगितलं. ते म्हणाले, "RSS आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर सगळं होत आहे."

यावर डोभाल यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ती व्यक्ती बोलत राहिली. नंतर अजित डोभाल तिथून निघून गेले.

याच घडामोडींदरम्यान अजित डोभाल यांना एक मुस्लीम मुलगी रडत रडत म्हणाली, "आम्ही इथं सुरक्षित नाही. दुकानं जाळली गेली आहेत. आम्ही विद्यार्थी आहोत, पण आम्ही अभ्यास करू शकत नाही. पोलीस त्यांचं काम करत नाहीत. आम्ही घाबरलेलो आहोत. रात्री आम्हाला झोप येत नाही.

याला उत्तर देताना डोभाल म्हणाले, "तुम्ही काळजी करू नका. आता पोलीस काम करतील. मी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या सूचनेनंतर इथं आलो आहे. तुम्ही संयम बाळगा, इंशाअल्ला, सर्वकाही ठिक होईल. टेंशन घेऊ नका. आपण एकमेकांच्या अडचणी वाढवणार नाही तर सोडवूयात."

अजित डोभाल यांनी लोकांना भेटून सुरक्षेबाबत विश्वास दिला. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. डोभाल म्हणाले, "माझा संदेश सर्वांसाठी आहे. इथं कुणीच शत्रू नाही. जे आपल्या देशावर प्रेम करतात. आपल्या शेजाऱ्यांचं भलं व्हावं, असं वाटत असेल तर सर्वांनी सलोख्याने राहिलं पाहिजे. इथं सर्वजण एकत्र राहतात. कुणी कुणाचे शत्रू नाहीत. काही समाजकंटक आहेत. पण आपण त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेऊ. पोलीस त्यांचं काम करतील. इंशाअल्ला, इथं शांतता प्रस्थापित होईल."

यावेळी प्रेम भावना कायम ठेवण्याचं आवाहन अजित डोभाल यांनी लोकांना केलं. आपला एक देश आहे, आपण सर्वांनी मिळून राहिलं पाहिजे. देशाला पुढे घेऊन जायचं आहे, असं ते म्हणाले.

Image copyright TWITTER

ईशान्य दिल्लीतील परिस्थितीवर ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जात असल्याचंही डोभाल यांनी लोकांना सांगितलं.

डोभाल यांच्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल सर्वाधिक हिंसाचारग्रस्त अशा जाफराबाद परिसरातही गेले. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि लोक समाधानी आहेत, असं डोभाल म्हणाले.

बुधवारी सकाळी दिल्लीच्या भजनपुरा परिसरात एक दुकान जाळल्याचा प्रकार समोर आला होता. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. मंगळवारी संध्याकाळीसुद्धा अजित डोभाल सीलमपूर, जाफराबाद, मौजपूर आणि गोकुलपुरी भागात गेले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या