उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही - महंत राजू दास : #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही - अयोध्येतील महंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची तयारीही सुरू आहे. मात्र या दौऱ्याला अयोध्येतील साधू-संतांनी विरोध केला आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

हनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका महंत राजू दास यांनी घेतलीआहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटलंय, "मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अयोध्येला येऊ देणार नाही."

यापूर्वीही उद्धव ठाकरेंवर महंत राजू दास यांनी टीका केली होती.

ते म्हणाले होते, "अयोध्येला राजकारणापासून दूर ठेवा. या दर्शन घ्या, आरती करा, पण अयोध्येत राजकारण करू नका."

2. मनसे अजूनही बॅचलर, कोणत्याही युतीचा टच झालेला नाही- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) अजून कोणत्याही युतीचा स्पर्श (टच) झालेला नाही. मनसे अजूनही बॅचलरच आहे, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांना मनसेच्या भविष्यातील वाटचालीविषयी प्रश्न विचारण्यात आला. मनसे सध्या 'रेडी टू मिंगल' स्टेटसमध्ये आहे का, तुम्ही भाजपशी युती करणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हटले की, मनसेला अजून कोणत्याही युतीचा टच झालेला नाही. मनसे अजून बॅचलरच आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

राज ठाकरे

"सध्याचं राजकारण हे बटबटीत आहे म्हणण्यापेक्षा ते विचित्र आहे, असं म्हणावं लागेल. कारण सध्या एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची. आज सर्वांत मोठा पक्ष विरोधी विरोधी पक्षात बसला आहे, हे दुर्देवी आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

3. शहरी नक्षलवाद्यांकडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्तींकडून CAA आणि NRC सारख्या विषयांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

चंद्रकांत पाटील

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मुस्लीम आरक्षण हा देखील मुस्लीम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकासआघाडी सरकारचा डाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

"CAAमुळे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. उलट पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या इस्लामिक देशातील छळवादाला कंटाळून भारतात आश्रयाला आलेल्या हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदींना नागरिकत्व मिळणार आहे. पण यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्ती अपप्रचार करुन मुस्लीम समाजात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. CAA कायद्यावर मुस्लीम समाजातील ज्यांना आक्षेप आहेत. त्यांनी पुढे येऊन आपलं म्हणणे मांडावे, त्यांना कुणीही आडवलेलं नाही. मात्र शहरी नक्षलवादी आणि डाव्यांना हे होऊ द्यायचं नाही. त्यांना देशात अराजकता माजवायची आहे," असंही चंद्रकातं पाटील म्हटलं.

दुसरीकडे "शिवसेनेचं हिंदुत्व बेगडी आहे. घटनेत तरतूद नसतानाही सरकारनं मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता टिकवण्यासाठी राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हे मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. भाजप मात्र शहरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे," असं पाटील यांनी औरंगाबादमध्ये म्हटलंय. 

4. इंदुरीकर महाराजांचं सिधुताई सपकाळ यांनी केलं समर्थन

एका वक्तव्याचं किती भांडवल करणार, किती वाद घालणार? इंदुरीकरांनी काही खून केला नाही, अशी प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर महाराजांवर दिली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

त्या म्हणाल्या, "इंदुरीकर महाराजांचं मोठं योगदान असून अनेक व्यसनाधीन तरुण इंदुरीकरांच्या प्रबोधनानं चांगल्या मार्गाला लागले आहेत. माणसातला माणूस त्यांनी घडवला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफीही मागितलीय. त्यामुळे आता किती वाद वाढवणार? जगा आणि जगू द्या," असंही त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन,

इंदुरीकर महाराज

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर दिलगिरी व्यक्त केली. मात्र, अजूनही त्यांच्या वक्तव्यावरुन वाद सुरू आहे.

तृप्ती देसाई यांनी वकिलामार्फत इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे.

5. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष, टरबुज या पिकांचं नुकसान झालं आहे.

बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर, वाशिम, नाशिक, अकोला, जळगाव या 8 जिल्ह्यांत पाऊस झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)