मराठा आंदोलन: 'मीटिंगचा नुसता बाजार मांडलाय, आम्हीही आता कंटाळलोय'

मराठा आंदोलक
फोटो कॅप्शन,

मराठा आंदोलक

"मीटिंगचा नुसता बाजार मांडलाय. आम्हालाही आता मीटिंगचा कंटाळा आलाय. मीटिंगमध्ये काय होईल, हेही आधीच कळायला लागलंय. निर्णय घ्यायचा असता, तर एवढं ताणलंच नसतं."

आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनातील एका मराठा तरुणानं बीबीसी मराठीशी बोलताना अशी हतबलता व्यक्त केली.

गेल्या 35 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांचं आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार उमेदवारांना नियुक्ती मिळावी, अशी या आंदोलकांची मागणी आहे.

"राणे समितीच्या अहवालानंतर 9 जुलै 2014 ते 14 नोव्हेंबर 2014 या कालावधीत आरक्षण दिलं, त्यानंतरच्या जाहिरातीत 'मराठा' कॉलम होता. त्याप्रमाणं समाजातील मुलांनी भरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण केली. निवडीच्या याद्याही लागल्यात. त्यानुसार नियुक्त्या मिळणं अपेक्षित होतं. मात्र, अजूनही नियुक्ती झालेली नाही," असा आरोप या आंदोलकांचा आहे.

जवळपास 3,500 जणांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

आतापर्यंत चारवेळा सरकारसोबत बैठका झाल्या. मात्र, अद्यापही नियुक्त्यांबाबत कुठलाच निर्णय होत नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

फोटो कॅप्शन,

मराठा आंदोलक

नियुक्त्यांमुळं मराठा आरक्षणाला धक्का लागत असेल, तर तसं लिखित द्यावं. आम्ही आंदोलन मागे घेतो, असंही इथली एक महिला आंदोलक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली.

"अजित पवारांसोबत तिसरी बैठक झाली. प्रत्येकवेळी अधिकारी बैठकीत सांगतायत की, नियुक्त्या देता येऊ शकत नाही, असं सांगतायत. पण का देऊ शकत नाहीत, हे सांगत नाहीत," असंही आंदोलकांचं म्हणणं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ चालवतंय की सरकारी बाबू? असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजेंनी उपस्थित केलाय. तसंच, ते पुढे म्हणाले, "आरक्षण जाहीर केल्यावर 16 टक्के आरक्षणामधून ज्या 3 हजार 500 तरुणांना नोकरीसाठी कॉल आला, त्यांना काम मिळालं नाही. मला कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. पण आता या तरुणांना न्याय कुणी द्यायचा? हे सरकार कोण चालवतं, मुख्यमंत्री की अधिकारी? हा माझा प्रश्न आहे."

फोटो स्रोत, Twitter/@YuvrajSambhaji

मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार असून, त्यातून समाधानकारक मार्ग निघेल अशी अपेक्षा खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केली.

दरम्यान, आंदोलकांची अजित पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी ट्विटरवरून बैठकीसंदर्भातील माहिती दिली.

फोटो स्रोत, Twitter/@AjitPawarSpeaks

"मराठा आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांवर काही मार्ग निघतो का, याबाबत बैठकीत चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेला धक्का न पोहोचवता आंदोलनाबाबत तोडगा काढण्यावर एकमत झालं. हे सरकार मराठा समाज आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्व घटकांच्या आरक्षणासाठी बांधिल व दृढनिश्चयी आहे," असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)