कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं टीव्हीवरच्या बातमीमुळे कळलं...

  • स्वामीनाथन नटराजन
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून भारत सरकारने प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. (प्रातिनिधिक फोटो)

"काय घडतंय, मला काहीच कळत नव्हतं. डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले, सगळं ठीक आहे."

केरळची 20 वर्षांची वैद्यकीय शिक्षण घेणारी राफिया (नाव बदललेलं आहे) सांगत होती. कोरोनाच्या कोव्हिड-19 झालेली ती भारतातली पहिली रुग्ण होती.

ती आणि तिच्यासोबत इतर चार लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इतर चौघांना डिस्चार्ज मिळाला. मात्र, ती हॉस्पिटलमध्येच होती.

ती सांगते, "माझे रिपोर्ट पेंडिंग होते. मला कुणी काहीच सांगत नव्हतं."

टीव्हीवरुन कळली बातमी

तिला एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आलं होतं. तिथेच तिच्यावर उपचार सुरू होते. आपल्याला काय झालंय आणि कधी सुट्टी होणार, याचा विचार करत ती अंथरुणात पडून होती. तेव्हा एक दिवस तिच्या मोबाईलवर मेसेज आला.

ती सांगते, "माझ्या एका मैत्रिणीने माझ्या व्हॉट्सअॅपवर टीव्हीवरच्या एका बातमीचा व्हीडिओ पाठवला."

फोटो स्रोत, Patient's photo

फोटो कॅप्शन,

राफिया यांची खोली

वुहानहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थिनीला कोरोनाची बाधा झाल्याची ती बातमी होती.

ही बातमी आपलीच असल्याचं राफियाच्या लगेच लक्षात आलं. ती म्हणते, "मला कोरोनाच्या विषाणूची बाधा झाल्याचं त्या बातमीवरुन कळलं."

30 जानेवारी रोजी राफिया भारतातली पहिली कोरोना रुग्ण असल्याचं जाहीर करण्यात आलं.

सकारात्मक दृष्टिकोन

यानंतर तासाभराच्या आत डॉक्टर आले आणि त्यांनी तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं आणि तिला आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागणार असल्याचं कळवलं.

मी अजिबात घाबरले नाही, असं ती सांगते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे.

ती म्हणते, "तोपर्यंत मला कळलं होतं की कोरोनाग्रस्त अनेक रुग्ण योग्य उपचार घेतल्यानंतर बरे झाले होते. त्यामुळे मी घाबरले नाही."

"कोरोनाची बाधा प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्यांना होत असल्याचं मला माहिती होतं. मी शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होते."

राफियाला कोव्हिड-19ची झाल्याचं कळताच प्रशासनानेही तात्काळ पावलं उचलली. 25 जानेवारी रोजी वुहानहून भारतात आल्यावर राफिया कुणा-कुणाला भेटली, याचा तपशील त्यांनी घेतला.

एकांतवास (आयसोलेशन-Isolation)

राफियाला कोरोनाची बाधा झाल्याचं कळताच याचा पहिला फटका बसला तो तिच्या कुटुंबाला.

तिच्या आईलाही थ्रिसूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधल्या एका स्वतंत्र वार्डमध्ये ठेवण्यात आलं. याच हॉस्पिटलमध्ये राफियावरही उपचार सुरू होते.

मात्र, त्या दोघींनाही एकमेकींशी भेटू देण्यात आलं नाही. राफियाचे वडील आणि भाऊ यांनाही घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोनावर उपचाराकरता वेगळे वॉर्ड्स असतात.

अशा या एकांतवासावर राफिया म्हणते, "विषाणूची वाहक (कॅरियर) होण्यापेक्षा एकांतवासात राहिलेलं बरं आहे."

हॉस्पिटलमध्ये राफियाला नेहमीचं जेवण देण्यात येत होतं. तिची खोलीसुद्धा दिवसातून दोन वेळा स्वच्छ आणि निर्जंतुक केली जायची.

राफिया सांगते, "स्वतः सर्व प्रकारची खबरदारी घेऊन (प्रोटेक्शन गेअर घालून) डॉक्टर माझी तपासणी करायला यायचे. ते खूप चांगले होते."

चीनमध्ये कोरोनाची साथ आल्याचं तिने प्रत्यक्ष अनुभवलं होतं. त्यामुळे त्यावरच्या वैद्यकीय उपचारांविषयी माहिती तिला होती.

वुहानपासून मायदेशापर्यंतचा प्रवास

राफिया गेल्या तीन वर्षांपासून वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

ती सांगते, "9 जानेवारीपर्यंत आमचे क्लासेस होते. सेमिस्टर परिक्षा सुरु होत्या. आम्हाला येणाऱ्या चार आठवड्यांच्या सुट्ट्यांचे वेध लागले होते."

जानेवारीच्या मध्यापर्यंत मृतांची संख्या वाढू लागली आणि अफवांना ऊत येऊ लागला.

फोटो स्रोत, Patient's photo

फोटो कॅप्शन,

डॉक्टर आणि नर्स यांनी चांगली ट्रिटमेंट दिल्याचं राफिया यांनी सांगितलं.

राफिया सांगते, "20 जानेवारीला आमच्या लक्षात आलं की हा आजार वेगाने पसरतोय. त्यामुळे मी त्याच दिवशी माझं परतीचं तिकीट बुक केलं."

वुहान पूर्णपणे बंद होण्याआधी आणि भारताने चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी रेस्क्यू फ्लाईट पाठवण्यापूर्वीच राफियाने तिथून स्वतःची सुटका करून घेतली होती.

वुहानहून ती कोलकाता विमानतळावर पोचली. तिथून तिने कोच्चीसाठी दुसरी फ्लाईट घेतली.

कुठलीच लक्षणं नव्हती

ती सांगते, "कोलकाता विमानतळ आणि कोच्ची विमानतळ अशा दोन्ही ठिकाणी माझी थर्मल चाचणी झाली होती. तिथे माझ्यात कुठलीच लक्षणं दिसली नाही."

दुसऱ्या दिवशी तिच्या मोबाईलवर भारतीय दुतावासाकडून मेसेज आला. चीनमधून परतलेल्या तिच्यासारख्या सर्वांनीच इतर वैद्यकीय चाचण्या करण्याची सूचना त्यात केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णांसाठी मुस्लीमधर्मीय प्रार्थना करताना

मेसेज मिळाल्यावर ती जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटली. तिच्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्यातही काहीच आढळलं नाही.

मात्र, दुसऱ्या दिवशी 27 जानेवारीला सकाळी उठल्यावर तिचा घसा दुखत होता. तिला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे.

त्यानंतर ती लगेच हॉस्पिटलला गेली. तिथे तिला दाखल करुन घेण्यात आलं. तिच्या पुन्हा नव्याने चाचण्या करण्यात आल्या आणि या चाचण्यांमध्ये तिला कोरोनाच्या कोव्हीड-19 झाल्याचं स्पष्ट झालं.

स्वतःच्या रोगप्रतिकार क्षमतेवर विश्वास

पुढचे 20 दिवस राफिया एका छोट्याशा खोलीत एकटी होती. बाहेरचं जग ती फक्त खिडकीतून बघायची.

ती सांगते, "माझी रोगप्रतिकार यंत्रणा विषाणूंचा सामना करेल, यावर माझा पूर्ण विश्वास होता."

राफिया आणि तिचं कुटुंब अजूनही घरी क्वारंटाईनमध्ये आहेत. म्हणजे ते घराबाहेर पडत नाहीत किंवा कुणी त्यांच्या घरीही जात नाही. पुढच्या काही दिवसात त्यांची या सक्तीच्या एकांतवासातून सुटका होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोना

ती म्हणते, "माझ्या आयुष्यातला हा नवीन अनुभव आहे. मला माझी काळजी नाही. मला माझ्या कुटुंबाची आणि मित्र-मैत्रिणींची काळजी आहे."

आतापर्यंत जगातल्या जवळपास 50 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर जगभरात कोरोनाने 3 हजारांपेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यातले सर्वात जास्त मृत्यू चीनमध्ये झाले आहेत.

राफिया म्हणते, "जेव्हा परिस्थिती निवळेल तेव्हा मी पुन्हा वुहानला जाऊन माझा 6 वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे."

एक वैद्यकीय विद्यार्थिनी म्हणून या सर्व प्रसंगातून आपण बरंच काही शिकल्याचं ती सांगते.

ती म्हणते, "शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा मी स्वतः प्रॅक्टिस सुरु करेन तेव्हा मी सर्वात आधी रुग्णाला त्याच्या आजाराची माहिती देईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)