कोरोना व्हायरसः कोव्हीड- 19 बद्दल भारतीयांना 'या' 9 गोष्टी माहिती असायलाच हव्यात

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता 5 वर गेली आहे.

चीनमधून सर्वत्र पसरलेला हा रोग सर्व जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे.

कोव्हीड-19 या आजाराची आता सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपवरही माहिती शेअर केली जात आहे. कोरोनाबाबत काही भ्रामक माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती भारतीयांना असली पाहिजे.

1) भारतात कोरोना व्हायरसची स्थिती काय आहे?

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 5 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. सोमवार 2 मार्च रोजी दोन रुग्ण आढळून आले. त्यापूर्वी केरळमधल्या 3 लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या सर्वांवर उपचार करुन घरी पाठवण्यात आले होते. हे तिघेही चीनमधून भारतात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

सोमवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण दिल्लीत व दुसरा तेलंगणमध्ये सापडला आहे. या दोघांनाही वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.

सोमवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत उच्चस्तरीय निरीक्षणाखाली या दोघांना ठेवण्यात आल्याचे सांगितले.

2) भारतात नव्या रुग्णांबाबत काय माहिती आहे?

दिल्लीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीय. फक्त एवढीच माहिती समोर आलीय की, ही व्यक्ती इटलीहून परतलीय. लागण झालेल्या व्यक्तीनंच स्वत:हून पुढे येत माहिती दिली. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले.

तेलंगणमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसग्रस्ताबाबत तिथले आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांनी माहिती दिली की, 17 फेब्रुवारीला या व्यक्तीनं दुबईचा प्रवास केला होता. तिथं हाँगकाँगमधील सहकाऱ्यांसोबत काम करत होता.

कोरोना व्हायरसची लक्षणं आढळल्यानंतर तेलंगणातील व्यक्ती जवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेली. तिथून त्या व्यक्तीला सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. या व्यक्तीला आता वेगळं ठेवण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

तेलंगणातील रुग्ण बंगळुरुहून हैदराबादला बसनं आला होता. त्यामुळं बसमध्ये सहप्रवासी असलेल्या सर्व 27 जणांची आणि त्यांच्या नातेवाईकांची वैद्यकीय चाचणी घेतली जातेय.

इटलीहून परतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नमुने राजस्थानहून पुण्याला तपासासाठी पाठवण्यात आलेत.

3) कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकार काय करतंय?

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी भारतानं पावलं उचलली आहेत. भारतातल्या मुख्य विमानतळांसह सर्व लहान विमातळांवर आणि बंदरांवर स्क्रीनिंग सिस्टम लावण्यात आलीय. म्हणजे, इथं तपासणी केली जाते. सीमांवर सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था उभारण्यात आलीय.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी सांगितलं की, कोरोना व्हायरसच रूग्ण आढळलेल्या 12 देशांमधून भारतात आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी होत आहे.

सुरुवातीला चीन, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या देशातून परतलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. मात्र, आता व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, इराण, इटली आणि नेपाळ या देशांमधून परतणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जातेय.

या देशांमधून परतणाऱ्या प्रवाशांना तपासणीसाठी स्वतंत्र मार्गानं नेण्यात येतंय. अशी स्वतंत्र मार्गांची व्यवस्था आतापर्यंत 21 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तयार करण्यात आलीय.

DGCA नं सर्व एअरलाईन्सना आदेश दिलेत की, कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या विमानांमध्ये सतर्कतेसाठीची माहिती द्या, तसंच सूचनांचं पालनही करा.

भारतातल्या 21 विमानतळांवर आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक लोकांची तपासणी केली गेलीय. तसंच 12 मुख्य आणि 65 छोट्या बंदरांवर आतापर्यंत 12,431 लोकांची तपासणी करण्यात आलीय.

भारताला जोडून असलेल्या देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी सीमेवर तपासणी केंद्र उभारण्यात आलेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये 10 लाख 24 हजार जणांची तपासणी करण्यात आलीय.

भारताच्या सीमांवरील 3,695 गावांवर लक्ष ठेवण्यात येतंय.

4) भारतीयांना प्रवासासाठी सूचना देण्यात आल्यात का?

होय, भारतीयांसाठी सरकारनं 'ट्रॅव्हल अॅडव्हायझरी' प्रसिद्ध केलीय. चीन आणि इराणसाठीचे व्हिसा रद्द करण्यात आलेत.

इटली, कोरिया आणि सिंगापूरला जाणाऱ्यांसाठीही सरकारनं सूचना दिल्यात. आगामी परिस्थिती पाहून सरकारनं इतर देशांसाठीही अशीच पावलं उचलू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

प्रवासासंदर्भातील नियमांबाबत भारतीय दूतावास सातत्यानं इतर देशांच्या संपर्कात आहेत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

तसंच, इराण आणि इटली या देशात जे भारतीय आहेत, त्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय.

आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केलंय की, ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळलेत, त्या देशांमध्ये लोकांनी जाणं टाळावं.

5) कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे का?

भारतात कोरोना व्हायरसच्या संशयितांची तपासणी करण्यासाठी 15 प्रयोगशाळा आहेत. मात्र, येत्या काही दिवसात आणखी 19 प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आवश्यकता भासल्यास भारतात आणखी 50 प्रयोगशाळा सुरु करण्यात येतील.

फोटो स्रोत, EPA

दिल्लीजवळील छावलामध्ये ITBP च्या परिसरात क्वारंटाइन सेंटर म्हणजे रुग्णांना किंवा संशयित रुग्णांना वेगळं ठेवण्यासाठी केंद्र उभारण्यात आलंय. इथं चीनमधील वुहानहून आलेले 112 लोक, तर जपानहून आलेले 124 लोकांना ठेवण्यात आलंय.

सोमवारी दिल्लीत झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत फार्मा विभागानं सांगितलं की, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा आहे. ज्या संशयित रुग्णांना घरात वेगळं राहण्यास सांगण्यात आलंय, त्यांच्याशी डॉक्टरांची टीम संपर्कात आहे.

आतापर्यंत 25 हजार 738 लोकांना घरातच वेगळं राहण्यास सांगण्यात आलंय. 011-23978046 हा हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध करण्यात आलाय.

6) कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला भारतात कसं ओळखतात?

भारतात विमानतळ, बंदर आणि सीमेवर तपासणी केली जात आहे. इथं आरोग्य विभागाचे अधिकारी तैनात आहेत. 12 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना सेल्फ-डिक्लरेशन फॉर्म दिलं जातं, ज्यात त्यांना माहिती भरावी लागते.

त्यानंतर थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून तपासणी केली जाते. ताप आलेल्यांना डॉक्टरांकडे नेलं जातं. त्यानंतर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्रीची नोंद घेतली जाते आणि रक्ताचे नमुने घेतले जातात.

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमधील स्वतंत्र खोलीत ठेवलं जातं. ज्यांना ताप नसतो, अशा लोकांना पुढच्या 14 दिवसात कोरोना व्हायरसशी संबंधित कुठलंही लक्षण आढळल्यास हॉस्पिटलशी संपर्क करण्यास सांगितलं जातं.

7) कोरोनाची सुरुवातीची लक्षणं काय आहेत?

ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं यापैकी कोणत्याही प्रकारचं लक्षण रुग्णामध्ये दिसू शकतं.

गंभीर स्थितीत न्यूमोनिया आणि श्वास घ्यायला जास्तच त्रास होऊ शकतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये मृत्यूही ओढावू शकतो.

याची सामान्य लक्षणं सर्दीसारखी असतात. त्याची चाचणी करण्याची गरज आहे तरच कोव्हीड-19 झालाय की नाही ते समजतात.

8) स्वतःची काळजी कशी घ्याल?

सतत हात धुवा, जर आवश्यक वाटल्यास लोकांचा संपर्क टाळा.

स्वच्छता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, तुम्ही मास्कही वापरु शकता. खोकताना, शिंकताना चेहरा झाका. आपल्यामध्ये कोणतंही आजाराचं लक्षण दिसलं तर जवळच्या दवाखान्यात जा.

9) तुम्ही मास्क वापरला पाहिजे का?

जर तुम्हाला श्वास घेण्यात काही अडथळा येत असेल, तुम्हाला शिंका येत असतील, खोकला असेल तर मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे इतर लोक सुरक्षित राहातील.

जर अशी लक्षणं नसतील तर मास्क वापरण्याची गरज नाही.

जर तुम्ही मास्क वापरत असाल तर तो योग्य पद्धतीने वापरला तरच विषाणू प्रसार रोखला जाई शकतो. केवळ मास्क वापरल्यामुळे प्रसार थांबत नाही तर तुम्ही सतत हात धुणं, खोकताना- शिंकताना तोंडावर रुमाल धरणं, सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाण टाळणं या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)