कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातली शहरं सज्ज आहेत का?

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी प्रतिनिधी
मास्क के साथ महिला

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईमध्येही दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतल्या दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणं सुरु होतं. या रुग्णांसोबतचे मुंबईतील दोन सहप्रवाशांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेनं या दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट केलं. या दोन रुग्णांमुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 वर गेला आहे.

अगदी दोन-अडीच महिन्यांपूर्वी 'कोरोना व्हायरस' हा शब्दही जगभरातल्या अनेकांनी ऐकला नव्हता. पण या विषाणूनं आज जगभरातल्या अनेकांची झोप उडवली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

कोरोना व्हायरस आणि त्याची लागण झाल्यानं होणारा कोव्हिड-19 हा आजार अंटार्क्टिकाचा अपवाद वगळला, तर जगातल्या प्रत्येक खंडात पोहोचला आहे. भारतातही केरळ पाठोपाठ दिल्ली आणि तेलंगणात त्याचे रुग्ण आढळून आले आहेत.

जागतिकीकरणामुळे जग एकत्र येत गेलं, तसं अशा साथी पसरण्याचा वेग वाढला आहे. शहरी भागांत, जिथे लोक मोठ्या संख्येनं एकत्रित येतात अशा ठिकाणी, या रोगाचा उद्रेक होण्याची भीती जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरांसमोर कोणती आव्हानं आहेत आणि त्याचा सामना करण्यासाठी आपण समर्थ आहोत का, असा प्रश्न पडतो.

मोठ्या शहरांसमोर मोठं आव्हान

महाराष्ट्राचा विचार केला, तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 45.23 टक्के लोक शहरांत राहतात. सरकारी आकडेवारीनुसार हे प्रमाण आता पन्नास टक्क्यांवर पोहोचलं आहे. दुसरीकडे 2.2 कोटी लोकसंख्या असलेलं मुंबई हे देशातलं सर्वात घनदाट लोकवस्तीचं शहर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 2013 सालच्या आकडेवारीनुसार इथे प्रत्येक चौरस किलोमीटरवर 31 हजारहून अधिक लोक राहतात. लोकसंख्येची ही घनता एखाद्या रोगावर नियंत्रणातला मोठा अडथळा ठरू शकते.

तसंच कुठल्याही फ्लूची साथ पसरली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून तिचा सहापट प्रसार होऊ शकतो, असं फ्लूच्या अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळं एखादी साथ पसरली, तर मुंबईसमोरचा धोका आणखी वाढतो. या शहरात केवळ लोकलनं दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ऐंशी लाखांवर गेली आहे.

शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, मॉल्स, सिनेमागृहं अशा सार्वजनिक जागांची संख्याही शहरात जास्त असते. तसंच गर्दीच्या जागी स्वच्छतेची कमतरताही मोठ्या प्रमाणात जाणवते. या सर्व गोष्टींमुळे मोठ्या शहरांत साथीच्या रोगांना आळा घालणं आव्हानात्मक बनतं.

देशांत प्रवेश करताना तपासणी

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे त्याची लागण झालेल्या लोकांना देशात शिरतानाच इतरांपासून वेगळं करणं, त्यांच्यावर वेळेत उपचार करणं. त्यामुळं जिथे कोरोनाव्हायरसचा प्रसार झालेला आहे, अशा देशांतून हवाई किंवा सागरी मार्गानं आलेल्या लोकांची तपासणी करून मगच त्यांना भारतात प्रवेश दिला जातो आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया थायलंड, सिंगापूर, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएतनाम तसंच इटली आणि इराणहून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याची माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

सरकारी आरोग्य यंत्रणेची तयारी कशी आहे?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतभरात सध्या संशयास्पद रुग्णांच्या रक्ताची कोरोना विषाणूसाठी तपासणी करणाऱ्या पंधरा प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसंच येत्या काही दिवसांत आणखी 19 प्रयोगशाळांमध्ये ही क्षमता उपलब्ध होईल.

महाराष्ट्राचा विचार केला, तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात NIV ही देशातली शिखर प्रयोगशाळा पुण्यात आहे. त्याशिवाय मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात राज्यातली मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात कोव्हिडच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "कोव्हिड-19 हा आजार अजून नवा आहे, पण तो पसरण्याआधीच अल्पकाळात राज्यात तीन सुसज्ज प्रयोगशाळा सुरू करू शकलो आहोत. कुठलाही आजार येतो, तेव्हा तुमच्या व्यवस्थेकडे निदानाची क्षमता असावी लागते. निदान झालं तरंच त्यावर उपचार किंवा प्रतिबंध करता येतात."

पुण्याच्या NIV मध्ये तर सार्क देशांतले नमुनेही तपासणीसाठी येत आहेत, तसंच NIVचे काही शास्त्रज्ञ इराणमधल्या तपासणीतही मदत करत आहेत, याकडे प्रदीप आवटे लक्ष वेधून घेतात.

पण राज्यात तीनच प्रयोगशाळा किंवा मुंबईत केवळ एकच रुग्णालय पुरेसं आहे का? असा प्रश्न पडतो.

नवीन रुग्णालयांची गरज

भारतात वाढत्या शहरांमध्ये आणि निमशहरी भागांत अनेकदा रुग्णालयं अपुरी पडत असल्याचं, सरकारी पाहणीत वारंवार समोर आलं आहे. त्यातही संसर्गजन्य आजारांचा सामना करण्याची क्षमता असलेली रुग्णालयं अगदी हाताच्या बोटावर मोजता यावीत एवढी कमी आहेत. मुंबईचं कस्तुरबा रुग्णालय, पुण्याचं नायडू रुग्णालय अशा मोजक्याच रुग्णालयांत सध्या संशयित रुग्णांच्या विलगीकरणाच्या (isolation) सुविधा उपलब्ध आहेत.

प्रदीप आवटे सांगतात, "शहरांची वाढती लोकसंख्या पाहता मोठ्या शहरात एखादंच विशेष रुग्णालय हे पुरेसं ठरत नाही. आपल्याकडे अशी संसर्गजन्य आजारांची विशेष संकल्पनात्मक रुग्णालयं आहेत, ती ब्रिटीश काळात उदयास आली. पण आता मुंबई, पुणे आणि नागपूरची लोकसंख्या वाढली आहे. त्या प्रमाणात नवी रुग्णालयं तयार करण्याची आवश्यकता आहे."

फोटो स्रोत, Reuters

रुग्णांची संख्या वाढली तर मुंबईत आणि इतर शहरांत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये व्यवस्था केली जाईल. तसंच गरज पडली, तर खासगी रुग्णालयांनाही या प्रयत्नांत सामील केलं जाईल, असं प्रदीप आवटे सांगतात.

"शहरातील आरोग्य यंत्रणा नगरविकास विभागाच्या अंतर्गत काम करतात तर आरोग्य विभाग स्वतंत्रपणे काम करत असतो. त्यात समन्वय साधणंही गरजेचं आहे."

'स्वाईन फ्लू'नं दिलेला धडा उपयोगी?

कोरोनाव्हायरसचा एकही रुग्ण अजून महाराष्ट्रात समोर आलेला नाही. पण याआधी आलेल्या साथीच्या रोगांमुळे अशा आजारांचा सामना करण्याची आपली क्षमता सुधारली आहे का? याआधी 2009 साली स्वाईन फ्लूची साथ पसरली, तेव्हा त्याला आळा घालताना आरोग्य यंत्रणांची कसोटी लागली होती.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अविनाश भोंडवे सांगतात, "त्यावेळी आजाराच्या तीव्रतेची फारशी माहिती नव्हती आणि आपण गाफिल होतो. पण आता तसं नाही. स्वाईन फ्लूच्या दरवर्षी येणाऱ्या साथीमुळे अशा प्रकारच्या तीव्र साथींच्या दरम्यान काळजी कशी घ्यायची, त्याचं निदान कसं करायचं, प्राथमिक उपचार कसे करायचे, कुणाला धोका जास्त आहे, याची माहिती खासगी डॉक्टर्सकडेही आहे."

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाव्हायरस संदर्भातली माहिती जशी समोर येते आहे, तसे त्याविषयीचे मेडिकल अपडेट्स, औषधं, जागितक आरोग्य संघटनेनं केलेल्या सूचना अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन त्यांच्या महाराष्ट्रातल्या चाळीस हजारांहून अधिक सदस्यांपर्यंत पोहोचवते आहे.

पण कोरोना व्हायरसवर अजून ठोस उपाय सापडलेला नसल्यानं, त्याची लागण होणार नाही याची लोकांनीही काळजी घेणं जास्त महत्वाचं ठरतं.

केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहता येणार नाही, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सवयी अंगी बाळगायला हव्यात. त्यामुळं कोरोनाव्हायरसच नाही, तर स्वाईन फ्लू आणि टीबीलाही आळा घालण्यासाठी मदत होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)