'मुंबईची भाषा हिंदी' वाद मिटला; तारक मेहताकडून माफीनामा : #5मोठ्याबातम्या

तारक मेहता

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन,

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील दृश्य

आजची वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्चा घेतलेला आढावा

1. तारक मेहता निर्माते आणि कलाकाराकडून माफी

मुंबईची भाषा हिंदी असल्याचं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत दाखवल्यानं वाद निर्माण झाल्यानंतर मालिकेतील अभिनेता अमित भट्ट यानं जाहीर माफी मागितली आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

चंपकचाचाची भूमिका साकारत असलेला अभिनेता अमित भट्ट यानं जाहीर माफी मागितली आहे. एका पत्रकाद्वारे अमितनं माफी मागितली आहे.

"मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारत आहे. अभिनय करत असताना लेखकानं दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असं माझ्याकडून चुकून बोललं गेलं आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढं अशी चूक होणार नाही याची मी दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल की विनंती," असं अमितनं त्याच्या माफीनाम्यात लिहिलं आहे.

"तारक मेहता का उल्टा चश्मा' निर्माते असित मोदी यांनी देखील या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे यात काही वादच नाही…मी भारतीय आहे. महाराष्ट्रीयन आहे, गुजराती पण आहे... सर्व भाषांचा मी आदर करतो... जय हिंद', असं ट्विट करून असित मोदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच मोदी यांनी आणखी एक ट्विट करत सर्व भाषा आपल्या राष्ट्रभाषा आहेत, प्रत्येक भारतीय भाषेचा आदर आणि सन्मान व्हायला हवा. आपण सर्व भारतीय आहोत," असंही त्यांनी म्हटलं आहे.

मालिकेतील गोकुलधाम सोसायटीमधील प्रत्येक सदस्य हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार अशी शपथ घेतो. त्यानंतर विसंवादामध्ये बापूजी मध्यस्थी करतात आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतात. असा प्रसंग दाखवताना बापूजींच्या संवादामुळं वाद निर्माण झाला. 'हमारा गोकुलधाम मुंबई में हैं, और मुंबईकी आम भाषा क्या है? हिंदी... इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है, अगप हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो तामिळ मे लिखते,' अशा प्रकारचा संवाद मालिकेत दाखण्यात आला होता.

2. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या घरावर हल्ला

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेतील कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. अधीर रंजन निवासस्थानी गेले. काही वेळेतच त्यांच्या घरात हल्लेखोर घुसले. हल्लेखोरांनी चौधरी यांना मारहाण केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अधीर रंजन चौधरी

हल्लेखोरांनी चौधरी यांना धक्काबुक्की केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस नेत्यावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'बीबीसी हिंदी'ने ही बातमी दिली आहे.

3. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती - सचिन सावंत

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई आणि महाराष्ट्र शांत आहे. भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवणं हा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे असं ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

"देता येत नाही तरुणांच्या हातांना काम, देतात घोषणा जोरात जय श्रीराम जय श्रीराम! हाती हवे ज्यांच्या पेन, पेन्सिल आणि पाठीवर दप्त ते गल्लीबोळात फिरतात घेऊन मशाली आणि पत्थर. घरात नाही पैसा अडका संपले सर्व दाणा-पाणी माय पुसे लेकाला बेटा पाह्य काम देतं का कोनी?" असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

4. सुनेचेच विवाहबाह्य संबंध - विद्या चव्हाण

"सुनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलानं यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता," अशी माहिती विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 'दैनिक भास्कर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नवरा बायकोच्या वादात मला भोवण्यात आलं. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहील, असं चव्हाण यांनी सांगितलं.

5. जातीवरून हिणवणं ही हिंसाच - नागराज मंजुळे

आपण सर्व जात संपवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु ती संपत नाही. जातीवरून हिणवणं ही हिंसाच आहे. देशात जोपर्यंत जातिवाद संपत नाही, तोपर्यंत अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होणार नाही असं मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

नागराज मंजुळे

वाळवा इथं आयोजित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरवलेल्या 31व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात मंजुळे बोलत होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)