दिल्ली दंगलीत जेव्हा BSF जवानाचं घर जाळलं जातं...

मोहम्मद अनीस

ईशान्य दिल्लीच्या काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारात अनेकांचा जीव गेला तर काहींचं घर लुटण्यात आलं.

हिंसक जमावाने जी घरं पेटवून दिली त्यात हिंदूंची घरंही होती आणि मुसलमानांचीही.

25 फेब्रुवारीला हिंसक जमावाने पेटवून दिलेल्या घरांपैकी एक घर होतं बीएसएफचे जवान मोहम्मद अनीस यांचं.

मंगळवारी आम्ही करावल नगरजवळच्या खजूरी खासमधल्या मोहम्मद अनीस यांच्या घरी जायला निघालो. दंगलीच्या खुणा रस्त्याच्या बाजूला अजूनही दिसत होत्या. कुठे जळलेल्या गाड्या पडल्या होत्या तर कुठे गॅस सिलिंडर्स. बहुतांश दुकानं बंद होती.

दंगली दरम्यान गोळी लागल्याने एका कुत्र्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृतदेहाला येणारा वास सगळ्या परिसरात पसरलेला होता. दंगलींमध्ये झालेलं नुकसान आणि कचरा आपल्या गाड्यांमध्ये गोळा करण्याचा प्रयत्न करणारे काही सफाई कामगारही आम्हाला रस्त्यात दिसले.

या हिंसाचारात आतापर्यंत 40 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय तर शेकडो जण जखमी आहेत.

आता घर पुन्हा बांधण्यासाठी मोहम्मद अनीस यांना बीएसएफ मदत करतंय. या जवानाचं तीन महिन्यांनी लग्न असून त्याचं घर पुन्हा उभं करण्यासाठी त्यांना मदत करण्याची आपली इच्छा असल्याचं बीएसएफच्या डायरेक्टर जनरलचं म्हणणं आहे.

मोहम्मद अनीस हे बीएसएफच्या नवव्या बटालियनमध्ये नक्षलग्रस्त मलकानगिरी भागात तैनात होते आणि त्यांना मुख्यमंत्री मदत निधीतून 10 लाखांची मदत देणार असल्याचं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलंय.

खजूरी खासमधल्या मोहम्मद अनीस यांच्या घरी आम्ही मंगळवारी दुपारी गेलो तेव्हा बीएसएफचे जवान त्यांचं घर पुन्हा राहण्यालायक बनवण्याचा प्रयत्न करत होते.

मोहम्मद अनीस इथे त्यांचे वडील आणि कुटुंबासोबत राहतात. या भागात दंगल झाली तेव्हा फक्त त्यांचे वडील घरी होते.

सध्या आपलं कुटुंब गावी असून इथे फक्त वडील आणि आपण असल्याचं मोहम्मद अनीस यांनी सांगितलं. घर दुरुस्त झाल्यानंतर ते कुटुंबाला इथे घेऊन येणार आहेत.

मोहम्मद अनीस यांचे वडील मोहम्मद मुनीस सांगतात, "25 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजताच्या सुमारास हल्ला व्हायला सुरुवात झाली. किमान 40-50 जण आमच्या गल्लीत घुसले होते. त्यांनी हेल्मेटने चेहरा झाकलेला होता. त्यांनी गाड्या पेटवून दिल्या."

दंगलींच्यावेळी ते घरी होते. कधी गच्चीत जायचे तर कधी खाली यायचे. पण नेमकं काय करावं आणि स्वतःला कसं वाचवावं, हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं.

ते सांगतात, "तीन-चार तासांनी सुरक्षा यंत्रणा इथे आल्या आणि मग इथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. आम्ही घराला कुलुप लावून निघून गेलो. यानंतर त्या लोकांनी माझं घर पेटवून दिलं."

मोहम्मद अनीस सांगतात, "इथे दंगल झाल्याचं वडिलांनी फोनवर सांगितल्यावर मला खूप वाईट वाटलं. यापुढे असं कधीही होऊ नये असं मला वाटतं. कारण यातून कोणाचंही भलं होत नाही. याने देशाचं मोठं नुकसान होतं. बाहेरच्या देशात आपली नाचक्की होती. आपण सगळ्यांनी मिळून-मिसळून राहायला हवं."

आपलं घर पेटवून देणारा जमाव फारसा विचार न करणारा होता, असं ते म्हणतात.

ते सांगतात, "मला या देशाचा नागरिक असल्याचा गर्व आहे. माझं या देशावर प्रेम आहे आणि इथे राहण्याचा हक्क सर्वांना असावा असं मला वाटतं."

मोहम्मद मुनीस म्हणतात, "या घराला आम्ही एखाद्या नवरीसारखं नटवलं होतं, पण हे संकट आलं. जीव वाचला हेच खूप झालं. घर पुन्हा वसवता येईल."

"1985 पासून मी दिल्ली राहतो पण यापूर्वी मी कधीही हे पाहिलेलं नाही. आम्ही मिळूनमिसळून इथे राहात होतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)