'उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या ऐवजी मक्केला जावं'- महंत परमहंस दास

महंत परमहंस दास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची तयारीही सुरु आहे. तर अयोध्येत बीबीसी मराठीशी बोलताना महंत परमहंस दास यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला येण्याऐवजी मक्केला जावं असं विधान आपण का केलं याचं स्पष्टीकरणही त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिलं. मुख्यमंत्र्यांना आपण काळे झेंडे दाखवू असा निर्धार त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मूळ विचारापासून फारकत घेतल्यास आपण विरोध करणार असेही त्यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला येतील आणि आणि त्यांची भूमिका तेथे मांडतील. शरयू आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता, तो सध्या रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आरोग्य मंत्रालयानं एक आदेशपत्र जारी केलं आहे, त्यानुसार गर्दीचे कार्यक्रम टाळण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हे ठरवलं आहे."

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी प्रश्नावर ते म्हणाले, "सामनाचं संपादकपद निर्णयावरुन मी नाराज नाहीये. मी जिथं आहे तिथं खूश आहे."

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

फोटो स्रोत, Twitter

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला अयोध्येतील साधू-संतांनी विरोध केला आहे.

हनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका महंत राजू दास यांनी घेतली आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हटलंय, "मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अयोध्येला येऊ देणार नाही."

फोटो स्रोत, Twitter

यापूर्वीही उद्धव ठाकरेंवर महंत राजू दास यांनी टीका केली होती.

ते म्हणाले होते, "अयोध्येला राजकारणापासून दूर ठेवा. या दर्शन घ्या, आरती करा, पण अयोध्येत राजकारण करु नका."

रामजन्मभूमी अयोध्येत उभ्या राहणार्‍या राम मंदिराच्या ट्रस्टच्या सदस्यांमध्ये शिवसैनिकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासंदर्भातलं पत्र सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय.

पंतप्रधानांनी या ट्रस्टमध्ये 15 सदस्यांची नेमणूक केली आहे. पण त्यात एकही शिवसैनिक नाही अशी खंत सरनाईक यांनी पत्रात लिहिलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)