येस बँक : 'आम्हाला वाटायचं की आमच्या बँका सर्वाधिक सुरक्षित आहेत, पण तसं अजिबात नाही'

येस बँक

फोटो स्रोत, Getty Images

खाजगी क्षेत्रातली पाचव्या क्रमांकाची बँक असलेल्या येस YES बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधामुळे YES बँकेतील खात्यातून खातेधारकाला एका वेळी केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम काढता येणार आहे.

मात्र, काही बाबतीत रोख रक्कमेच्या मर्यादेत सूट देण्यात आली आहे. खातेधारक किंवा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासाठी, खातेधारक किंवा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीच्या परदेश शिक्षणासाठी आणि लग्न या तीन कारणांसाठी 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम खात्यातून काढता येईल. मात्र, त्यासाठीही RBI ची परवानगी बंधनकारक असेल.

3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. तोवर म्हणजे 30 दिवसांसाठी YES बँकेचं संचालक मंडळही निलंबित करण्यात आलंय. SBI चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांची YES बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

आरबीआयने काल संध्याकाळी ही घोषणा करताच बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मुंबईत येस बँकेच्या ATM सेंटरबाहेर लोकांनी गर्दी केली होती.

अशाच एका ATM सेंटरबाहेर रांगेत उभ्या असलेल्या निता छाब्रिया यांनी बीबीसीला सांगितलं, "कसलीच सुरक्षितता नाही. हे सगळं काय सुरु आहे? एक भारतीय म्हणून आम्हाला वाटायचं की आमच्या बँका सर्वाधिक सुरक्षित आहेत. सर्वात जास्त त्रासदायक बाब म्हणजे बँकेचे डिजिटल प्लॅटफॉर्म बंद झाले आहेत. मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंग काहीच सुरू नाही. मला माझ्या वडिलांकडून पैसे घ्यावे लागले."

ज्येष्ठ नागरिक आणि बँकेचे खातेदार हरिष चावला म्हणाले, "मी सकाळी सव्वाआठ वाजल्यापासून रांगेत उभा आहे. त्यांनी आम्हाला टोकन दिले आणि दुपारी 3 वाजेपर्यंत थांबायला सांगितलं. बँकेतील कुठलेच मॅनेजर बाहेर येऊन आम्हाला माहिती देत नाहीयत."

मात्र, 30 दिवसांच्या या निर्बंधांचा बँकेच्या ठेवीदारांवर परिणाम होईल. खातेधारकांवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे त्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

एंजेल ब्रोकिंगमध्ये बँकिंग अॅनालिस्ट असलेले जयकिशन परमार म्हणाले, "बँकेचे एकूण रिटेल डिपॉझिट एक्सपोजर 1 लाख कोटी रुपये आहे. ही खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळू नये, याची नियामक काळजी घेतील."

फोटो स्रोत, YES BANK/facebook

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

येस बँकेने केलेल्या कर्जवाटपात गुंतवणूक केलेल्या म्युचअल फंडांना याचा सर्वात आधी फटका बसला. परिणामी या फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला तोटा सहन करावा लागेल, असं परमार यांनी सांगितलं.

या निर्णयाचे बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर काय परिणाम होतील, हे अद्याप स्पष्ट नाही.

चीफ जनरल मॅनेजर योगेश दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार येस बँकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. योगेश दयाल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार भांडवल जमवण्यात बँक अपयशी ठरली.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी मंडळाने रात्री उशिरा नोटिफिकेशन काढत YES बँकेत गुंतवणूक करण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे.

गुंतवणूकतज्ज्ञ हेमेंद्र हजारी सांगतात की इक्विटी शेअर विकून बँकेचं पुन्हा नोंदणीकरण किंवा विलिनीकरण यापैकी काहीही झालं तरी "बँकेची स्वतंत्र ओळख आता संपुष्टात येणार आहे." ते पुढे म्हणाले, "ज्या क्षणी निर्बंध लादले जातात आणि खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्या जातात तेव्हा खातेधारकांचा तुमच्यावरचा विश्वास उडतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांचा अधिकार गमावून बसता."

हजारी म्हणतात, "यामुळे इतर बँकांवरचा विश्वासही डळमळीत होतो."

फोटो स्रोत, YES BANK/facebook

रिझर्व बँकेच्या घोषणेमुळे येस बँकेचे कर्मचारीही गोंधळून गेले आहेत. नाव उघड न करण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने म्हटले, "या बातमीने आम्हा सर्वांनाच धक्का बसला. आमच्यापैकी ज्यांचे बँकेत ESOPs आहेत त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे."

गेल्या सहा महिन्यात रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादलेली ही दुसरी बँक आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये 60 कोटी डॉलर्सच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून रिझर्व्ह बँकेने PMC बँकेवर निर्बंध लादले होते.

येस बँक मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बँकिंग व्यवहार आणि परतफेड न केलेल्या कर्जाची माहिती लपविणे, या मुद्द्यांमुळे रिझर्व्ह बँकेच्या रडारवर होती.

येस बँकेने सध्या डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे डबघाईला आलेल्या रिअल इस्टेट आणि दूरसंचार क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप केलं आहे.

येस बँकेवर टाकण्यात आलेल्या निर्बंधांमुळे शुक्रवारी शेअर बाजार उघडताच मोठी घसरण बघायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सेंजचा निर्देशांक बाजार उघडताच जवळपास 1200 अंकांनी घसरला. येस बँकेचा शेअर जवळपास 50 टक्क्यांनी घसरला.

रिझर्व्ह बँकेने नेमलेले प्रशासक प्रशांत कुमार म्हणाले, "लोकांचा विश्वास अबाधित राहावा आणि त्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी रिझर्व्ह बँकेने या मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे काम सुरळीत होण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने घातलेल्या मर्यादांच्या 30 दिवसांच्या कार्यकाळामध्ये उपाययोजना काढण्याचा प्रयत्न आहे. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून ठेवीदारांनी घाबरण्याची गरज नाही. आम्ही ठेवीदारांच्या सहकार्याच्या प्रतीक्षेत आहोत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)