दिल्ली दंगलः शाहरुखला नेमकी कुठे अटक करण्यात आली?

  • मोहम्मद शाहीद
  • बीबीसी प्रतिनिधी, शामली, उत्तर प्रदेशातून
शाहरूख

फोटो स्रोत, ANI

24 फेब्रुवारी रोजी दिल्लीत उसळलेल्या दंगलीत जाफ्राबाद-मौजपूर भागात एका पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुख खान याला दिल्ली क्राईम ब्रान्चने अटक केली आहे.

त्याच्यावर पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखणं आणि गोळीबार करण्याचा आरोप आहे.

दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचचे एसीपी अजित कुमार सिंगला यांनी 3 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की शाहरुखला उत्तर प्रदेशातील शामली शहरातील बस स्टँडवरुन अटक करण्यात आली.

जाफ्राबादमध्ये गोळीबार केल्यानंतर शाहरुख आपल्या कारने पंजाबला गेला. तिथून बरेलीमार्गे शामलीला गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

मात्र, पोलिसांच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

स्थानिक पोलिसांना विश्वासात न घेणं

पहिला प्रश्न उपस्थित करण्यात आला तो स्थानिक पोलिसांना विश्वासात न घेतल्याबद्दल. एखाद्या राज्यातले पोलीस परराज्यात जाऊन तपास करतात तेव्हा स्थानिक पोलिसांना याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, या प्रकरणात दिल्ली क्राईम ब्रँचने उत्तर प्रदेश पोलिसांना विश्वासात घेतलं नाही.

शामली जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक विनीत जयस्वाल यांनी बीबीसीला सांगितलं की दिल्ली क्राईम ब्रँचने या कारवाईबाबत त्यांना कुठलीच पूर्वसूचना दिली नव्हती. दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचने इथे येऊन कारवाई केली आणि ते निघून गेले. त्यांनी मदत मागितली असती तर आम्ही नक्कीच मदत केली असती. यापुढेही त्यांनी मदत मागितल्यास आम्ही त्यांना पूर्ण मदत करु.

बुधवारी संध्याकाळी दिल्ली क्राईम ब्रँचची एक टीम शामली जिल्ह्यातील कैराना पोलीस ठाण्यात गेल्याचंही वृत्त होतं.

फोटो स्रोत, PTI

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अशाही बातम्या होत्या की क्राईम ब्रँचची टीम शाहरुखला घेऊन शामलीमध्ये आली होती आणि जिथे जिथे शाहरुख थांबला आणि त्याने जिथे आपली कार सोडली त्या सर्व ठिकाणी त्यांना तपास करायचा होता.

मात्र, क्राईम ब्रान्चच्या टीम कैराना पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार न नोंदवता निघून गेली.

कैराना पोलीस ठाण्याचे प्रभारी यशपाल धामा बीबीसीशी बोलताना म्हणाले, "बुधवारी रात्री 9 वाजता दिल्ली पोलिसांच्या 3-4 लोकांची एक टिम इथे आली होती. आपण क्राईम ब्रँचकडून आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना येण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही आणि ओळखपत्रही दाखवलं नाही. कुठल्याही अधिकृत कागदपत्रांवर काहीही लिखापढी न करता एका कागदावर नाव लिहून ते निघून गेले."

शाहरुखला कुठून अटक करण्यात आली आणि त्यांचे लोकल इनपुट कोणते होते, याची कसलीच माहिती आपल्याला नसल्याचं यशपाल धामा यांचं म्हणणं आहे.

शाहरुखचे कुणीतरी नातेवाईक इथे राहत असल्याची बातमी आमच्या कानावर आली. मात्र, त्याबाबतची ठोस माहिती आमच्याकडे नाही आणि दिल्ली पोलिसांनी मदत मागितली तर आम्ही ती करु, असंही धामा म्हणाले.

शामलीमध्ये आहेत चार बस स्टँड

शाहरुखला शामलीमधून अटक करण्यासंबंधीची जेवढी माहिती शामलीच्या बाहेरच्या लोकांना माहिती आहे जवळपास तेवढीच माहिती शामलीमध्ये राहणाऱ्यांना आहे.

दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचचे एसीपी अजित कुमार सिंगला यांनी 3 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की शाहरुखला शामलीच्या बस स्टँडवर अटक करण्यात आली.

फोटो कॅप्शन,

अरविंद कुमार, कैराना बस स्टेशन, शामलीचे संचालक

बीबीसीची टीम शामलीला पोचली तेव्हा कळलं की शहरात चार बस स्टँड आहेत. यातलं एक सरकारी तर तीन खाजगी आहेत.

एसीपी अजित कुमार सिंगला यांनी हे स्पष्ट केलं नव्हतं की शाहरुखला शामलीतल्या नेमक्या कोणत्या बस स्टँडवर अटक करण्यात आली. तेव्हा आम्ही चारही बस स्टँडवर जाऊन चौकशी केली.

1. कैराना बस स्टेशन, शामली

शामली शहराच्या मध्यवर्ती भागात कैराना बस स्टेशन आहे. इथून दिल्ली-कैराना आणि आसपासच्या ठिकाणांसाठी खाजगी बसेस सुटतात.

हे बस स्टेशन सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असतं.

या बसस्टँड चे संचालक अरविंद कुमार सांगतात की इथून कुठलीच अटक झालेली नाही. इथे अशी काही कारवाई झाली असती तर नक्कीच कळलं असतं, असं अरविंद कुमार यांचं म्हणणं आहे.

2. रोडवेज बस स्टेशन, शामली

कैराना बस स्टेशनपासून 100 पावलांच्या अंतरावर उत्तर प्रदेश पथ परिवहन महामंडळाचं बस स्टँड आहे. स्थानिक याला रोडवेज बस स्टेशन किंवा शामली बस स्टेशन म्हणतात.

या बस स्टँडहून दिल्ली, करनाल, पानीपत, मेरठ, लखनौ, सहारनपूर या आणि आसपासच्या इतर काही राज्यांच्या राज्य परिवहन बसेस सुटतात. या बसस्टँडवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची वर्दळ असते.

बस स्टँडवरुन कुठलीच अटक झालेली नाही आणि अशी कुठलीच माहितीही मिळालेली नाही, असं या बसस्टँडचे असिस्टंट मॅनेजर मनोज कुमार वाजपेयी यांचं म्हणणं आहे.

याच बसस्टँडवर पाणीपुरीची गाडी लावणारे सचिन यांनीही सांगितलं की या बस स्टँडवरुन अशी कुठलीच कारवाई झालेली नाही. मात्र, बाहेरुन कुठूनतरी शाहरुखला अटक झाल्याची चर्चा आहे.

बसस्टँडजवळ चणे विकणारे तालीब खान म्हणाले की हे छोटं शहर आहे आणि बातमी लगेच पसरते. त्यामुळे इथून कुठून अटक झाली असती तर त्याची चर्चा नक्कीच झाली असती.

फोटो कॅप्शन,

मनोज कुमार वाजपेयी

3. मुजफ्फरनगर बस स्टेशन, शामली

रोडवेज बस स्टेशनपासून 1 किमी अंतरावर मुजफ्फरनगर बस स्टँड आहे. इथून मुजफ्फरनगरसाठी बस सुटतात. हेदेखील एक खाजगी बस स्टँड आहे.

या बसस्टँडच्या बाजूलाच एक मिठाईचं दुकान आहे. या दुकानाचे मालक हर्षित यांनी सांगितलं की शाहरुखला कुठून अटक झाली, याबाबत स्पष्टता नाही.

शाहरुखला शामलीमधून अटक झाल्याची बातमी आपल्याला टीव्हीवरुन कळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बसस्टँडजवळच फर्निचरचं दुकान असणारे श्रवण कुमार सांगतात की या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनाच काही कळालं नाही तर आम्हाला कुठून कळणार.

स्थानिक पोलिसांना या कारवाईची पूर्वकल्पना नव्हती, हे आपल्याला वृत्तपत्र आणि टिव्हीवरच्या बातम्यांवरून कळाल्याचं श्रवण कुमार यांचं म्हणणं आहे.

फोटो कॅप्शन,

श्रवण कुमार आणि हर्षित

4. शामली बस स्टेशन, कैराना

शामली जिल्ह्यात येणारी कैराना वस्ती एक मुस्लीमबहुल भाग आहे. एका अंदाजानुसार या भागातली मुस्लीम लोकसंख्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

शाहरुखच्या नातेवाईकाचं इथेच कुठेतरी घर असणार आणि पोलिसांनी त्याला इथूनच अटक केली असावी, असा अंदाज बांधण्यात येत होता.

शामली बसस्टँडच्या बाजूलाच फळांचं दुकान असणारे मोहम्मद हसीन यांनी सांगितलं की इथे काल संध्याकाळीसुद्धा मीडिया कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, त्यांनाही शाहरुख कुठला आहे आणि त्याला नेमकी कुठून अटक झाली, याचे पुरावे सापडले नाही.

कैराना धार्मिक सलोख्याची फॅक्टरी?

बोलताबोलता हसीन.. शामली आणि कैराना यांच्यात कसा धार्मिक सलोखा आहे, हे सांगू लागले. ते म्हणाले की दिल्लीत दंगली झाल्या. मात्र, त्याचा किंचितही परिणाम इथे झाला नाही.

ते म्हणाले, "कैराना मुस्लीमबहुल भाग आहे. मात्र, इथे दोन्ही समाजांमध्ये कुठलाच तणाव नाही."

फोटो कॅप्शन,

हसीन

कैराना लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार खासदार आहेत.

याच जिल्ह्यातल्या थानाभवन मतदारसंघातून सुरेश राणा आमदार आहेत. सुरेश राणा राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. एका विशेष समाजाविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली होती.

कैरानामध्ये किराणा मालाचा व्यापार करणारे रोहित (नाव बदललेलं आहे) म्हणतात की त्यांना शाहरुखच्या अटकेविषयी माहिती नाही. मात्र, यामुळे धार्मिक सलोख्याला धक्का बसेल, असा अंदाज ते व्यक्त करतात आणि म्हणूनच कैरानाला धार्मिक सलोख्याचं प्रतीक किंवा फॅक्टरी म्हणणं घाईचं होईल.

रोहित म्हणाले, "या भागात बहुसंख्य मुस्लीम आहेत आणि इथून व्यापाऱ्यांनी पलायन केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या आहेत. इथे असुरक्षितता जाणवते. मात्र, भाजप सरकार आलं तेव्हापासून फार भीती वाटत नाही."

एका स्थानिक पत्रकाराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इथे येऊन म्हणाले होते की आता इथून कुठलाच व्यापारी पलायन करत नाहीय. त्यामुळे शामली आणि कैरानाच्या मुद्द्याला हवा देण्यासाठीच शाहरुखला इथून अटक केली, असं दाखवलं जात असावं.

फोटो स्रोत, Getty Images

15 डिसेंबरनंतर संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं झाली. कैरानामध्येही काही निदर्शनं झाली. मात्र, पोलिसांनी निदर्शकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निदर्शनं झाली नाही.

हसीन म्हणतात की नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात कैराना आणि शामलीमध्ये निदर्शनं झाली नाहीत. कारण 'मोठ्या लोकांनी' समजावलं की हे सगळं करण्याऐवजी आता शांत राहण्याची गरज आहे.

हसीन सारखी माणसं निदर्शनं न करण्याला धार्मिक सलोखा म्हणू शकतात. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांवर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने जी कारवाई केली ती जगजाहीर आहे. राहता राहिला प्रश्न शाहरुखच्या अटकेचा तर त्याला नेमकी कुठून अटक करण्यात आली, हे अजूनही स्पष्ट नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)