T20 Worldcup: पूनम यादव आणि शिखा पांडेच्या मदतीनं अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

  • वंदना
  • बीबीसी टीव्ही एडिटर (भारतीय भाषा)
पूनम यादव आणि शिखा पांडे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पूनम यादव आणि शिखा पांडे

गेल्या काही दिवसांमध्ये आग्रा चर्चेत होतं ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्यामुळे. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या ट्रंप यांना आग्र्यातल्या ताजमहलची भुरळ नसती पडली तरच नवल होतं. आग्रा दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे ताजमहल, दुसरं पेठा पण आता यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातली पूनम यादव आग्र्याचीच आहे. भारताला फायनलपर्यंत पोहोचवण्यात पूनमचा सिंहाचा वाटा आहे.

रविवारी भारतीय महिला संघ टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना खेळणार आहे. यामध्ये भारतीय गोलंदाजांची मोठी भूमिका राहिली आहे.

9 खेळाडूंना बाद करत पूनम यादव ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगनसोबतच सर्वाधिक गडी बाद करणारी खेळाडू ठरली आहे. तिची क्रिकेट कारकीर्द समजून घेण्याकरता थोडं मागे जाऊया.

फोटो स्रोत, Twitter

आग्र्याचं एकलव्य स्टेडियम. खेळाडू जेव्हा मैदानात सरावासाठी येत तेव्हा लेग स्पिन टाकू शकणारी ती एकमेव महिला क्रिकेटर होती.

ऑफ स्पिनर्सची लाईन लागलेली असे, आर्म स्पिनरसुद्धा होते, पण लेग स्पिनर शोधूनही सापडत नसे.

आणि अशा वेळी एक खेळाडू गवसली. या खेळाडूचं नाव आहे पूनम यादव. पूनमनं महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट आणि बांगलादेशविरुद्ध 3 विकेट घेऊन भारताला विजय प्राप्त करून दिला आहे.

लेग स्पिनर्स महिला गोलंदाजांची संख्या पहिल्यापासून कमी आहे. पूनम यादची उंची फक्त 4.11 फूट आहे. पण तिच्या छोटाशा हातात जेव्हा चेंडू येतो, तेव्हा भल्याभल्यांना घाम फुटतो.

1991मध्ये जन्म झालेली पूनम गावापासून आग्र्याला शिफ्ट झाली तेव्हा तिच्यात क्रिकेटची आवड उत्पन्न झाली. पण, सुरुवातीला तिला घरातून विरोध होता.

पण, पूनमची जिद्द आणि मेहनतीमुळे ती उत्तर प्रदेशच्या टीमकडून खेळायला लागली. आणि 2013मध्ये तिनं भारतीय संघात पदार्पण केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पूनम यादव

मागील 2 वर्षं पूनम कमालीची फॉर्ममध्ये आहे. 2018-19साठी बीसीसीआयनं तिला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निवड केली. 2017च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पूनमच्या गुगलीची खूप चर्चा झाली होती.

रेल्वेकडून खेळणारी पूनम एके काळी तिथं क्लर्क पदावर काम करत होती. आता ती सुपरीटेंडेंट म्हणून काम करत आहे.

पूनमनं आपली उंची कमी असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही उलट तिने तिच्या कमजोरीलाच आपली ताकद बनवलं. फलंदाजाला चकवण्यात तर तिचा हात कुणीच धरू शकत नाही. बॅट्समनच्या अगदी जवळ ती चेंडू टाकते आणि वळवते. बॅट्समन थोडा जरी ख्रिज बाहेर आला तर त्याची काही धडगत नसते. जर त्या बॅट्समनकडून चेंडू सुटला आणि विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये गेला की स्टंपिंग झालीच म्हणून सांगा.

पूनमला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या कोणत्याही महिला खेळाडूला यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नाहीये. वनडे वर्ल्ड कपच्या क्रमवारीत पूनम सातव्या क्रमांकावर आहे. भारतासाठी टी-20 सामन्यांत सर्वाधिक 92 गडी बाद करण्याचा विक्रमही पूनमच्या नावावर आहे.

दीप्ती शर्मा

पूनमप्रमाणेच आग्र्याची दीप्ती शर्मा भारतीय संघातील उत्तम गोलंदाज आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात 3 मेडन ओव्हर टाकत अशी कामगिरी बजावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

टी-20 वर्ल्ड रँकिंगमध्ये ती चौथ्या क्रमांकावर आहे, तर वनडे ऑलराऊंडर क्रमवारीतही चौथ्या क्रमांकावर आहे. दीप्तीची 2017मधील कामगिरी आजही मला आठवते. आर्यलंडविरुद्धच्या सामन्यात तिनं 188 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दीप्तीनं 46 चेंडूंमध्ये 49 धावा ठोकल्या होत्या. यामुळेच भारताला 133 धावा करता आल्या. दीप्तीच्या या यशात तिच्या भावाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी स्वत:चं करिअर सोडून दीप्तीच्या करिअरसाठी मदत केली.

शिखा पांडे

पूनम यादवप्रमाणेच भारताची गोलंदाज आहे शिखा पांडे. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट घेत ती पाचव्या क्रमांकावर आहे. 30 वर्षांची शिखा पांडे खरंतर स्क्वाड्रन लीडर शिखा पांडे आहे, ती भारतीय वायूदलाशी निगडित आहे.

फोटो स्रोत, Twitter

गोव्यात त्यांचे वडील हिंदीचे प्राध्यापक होते. क्रिकेटची आवड पहिल्यापासून होती, पण लेदर बॉलनं खेळायची सवल कॉलेजपासून लागली. सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये यश मिळालं नाही म्हणून मग तिनं वायुदलात एयर ट्राफिक कंट्रोलरचं काम केलं.

2014मध्ये तिची भारतीय संघात निवड झाली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शिखानं पहिल्या सामन्यात 3 आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट घेतल्या. भारतीय संघाची गोलंदाजी मजबूत मानली जात आहे आणि या वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनी ते सिद्ध केलं आहे.

राधा यादव

19 वर्षांची स्पिनर राधा यादवनं टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरोधात 4 विकेट घेतल्या होत्या.

फोटो स्रोत, Twitter

राधा यांचं बालपण प्रचंड गरिबीत गेलं. मुंबईतल्या कांदिवलीच्या 200 ते 250 स्क्वेअर फूटचं तिचं घर बघितल्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तिन केलेला संघर्ष समजू शकतो.

2000मध्ये जन्म झालेल्या राधाचे वडील उत्तर प्रदेशातल्या जौनपूर मुंबईला आले आणि एका छोट्याशा बूथमध्ये दूध विकू लागले. पण, गरिबीला राधा आणि तिच्या वडिलांनीही मध्ये येऊ दिलं नाही.

वर्ल्ड कप

भारतानं ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 4 सामने खेळले आहेत आणि कोणत्या ना कोणत्या गोलंदाजानं सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

राजेश्वरी गायकवाड, 20 वर्षांची गोलंदाज पूजा वस्त्राकर आणि 22 वर्षांची अरुंधती रेड्डी यांच्यासहित जुन्या मुरलेल्या गोलंदाजांनी भारताला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचवलं आहे. फलंदाजांमध्ये फक्त शिफाली यादव चांगलं खेळू शकली आहे.

आता सगळ्यांच्या नजरा 8 मार्चला होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावर आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)