भारतीय महिला खेळांडूबाबत या 8 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - बीबीसी रिसर्च

  • दिव्या आर्य
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी
पी.व्ही. सिंधू

फोटो स्रोत, Getty Images

क्रीडा आणि क्रीडाक्षेत्रात स्त्रियांचं योगदान किती आहे या विषयावर बीबीसीने 14 राज्यांत 10,181 लोकांचं सर्वेक्षण केलं. त्यात पुढील गोष्टी आढळल्या.

1. किती भारतीयांना खेळण्यात रस आहे?

एखादा खेळ खेळणं हे भारतीय लोकांच्या आयुष्यातला अगदी अविभाज्य म्हणावा असा घटक नाही. बीबीसीच्या सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं आहे की त्यांनी कोणत्या ना कोणता खेळ खेळलेला आहे. जागतिक पातळीवर फिनलँड, डेन्मार्क, स्वीडन या देशात दोन तृतियांश लोक विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात. एकूण युरोपात ही सरासरी अर्ध्यापेक्षा जास्त आहे.

2. भारतीय लोक खेळात का भाग घेत नाही?

शाळा आणि महाविद्यालयाच्या पातळीवर सोयीसुविधेच्या अभावामुळे खेळात भाग घेत नाही असं या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितलं. तसंच आई वडील कायम अभ्यासाला जास्त महत्त्व देतात त्यामुळे एखादा खेळ खेळणं म्हणजे वेळेचा सदुपयोग नाही असं पालकांना वाटतंय.

मात्र ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये जेव्हा भारताची कामगिरी चांगली होऊ लागली तेव्हा खेळाडूंना हिरो म्हणून पाहण्याची संस्कृती विकसित होऊ लागली. तरी क्रीडा क्षेत्राबाबत भारतीयांची विचारसरणी फारशी बदललेली दिसत नाही.

3. ऑलिम्पिक सारख्या खेळात किती भारतीय महिलांनी भाग घेतला आहे?

भारतीयांनी ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 28 पदकं जिंकली आहेत. त्यातील 14 पदकं गेल्या 25 वर्षांत जिंकली आहेत.

अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे एकमेव भारतीय आहेत. त्यांनी 2008 मध्ये नेमबाजीत हे पदक मिळवलं होतं.

महिलांनी ऑलिम्पिकमध्ये पाच पदकं जिंकली आहेत. हा विजय गेल्या दोन दशकांत नोंदवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मागच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने दोन पदकं जिंकली होती. दोन्ही पदकं महिलांनी मिळवली होती. पी.व्ही.सिंधू ने बॅडमिंटन तर साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक मिळवलं होतं.

अनेक लोकांच्या मते ऑलिम्पिकच्या प्रदर्शनाच्या आधारावर भारतात खेळाची स्थिती समजू शकत नाही कारण भारतातला लोकप्रिय खेळ ऑलिम्पिकमध्ये येतच नाही.

4. भारतीयांचे लोकप्रिय खेळ कोणते?

बीबीसी च्या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या 15 टक्के लोकांचा लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. आश्चर्यकारकरीत्या क्रिकेटपाठोपाठ 13 टक्के लोकांचा लोकप्रिय खेळ कबड्डी आहे. त्यानंतर सहा टक्के लोकांना योगात जास्त रस आहे. बुद्दिबळ तीन टक्के लोकांमध्ये लोकप्रिय आहे. हॉकीचं प्रमाण दोन टक्के आहे.

5. मुलींचं क्रिकेटमधील योगदान किती आहे?

क्रिकेट खेळणाऱ्या मुलींचं प्रमाण अगदीच कमी आहे. पुरुषांशी तुलना करायची झाल्यास त्यांच्या तुलनेत फक्त पाच टक्के महिला क्रिकेट खेळतात. असं असलं तरी क्रिकेटमध्ये महिला प्रगती करत आहेत. पुरुषांनी क्रिकेट वर्ल्ड कप दोनदा जिंकला आहे तर टी-20 वर्ल्ड कप एकदा जिंकला आहे.

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये एकदा अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. यावेळी टी-20 प्रकारात त्यांचा सामना ऑस्ट्रेलियात आहे. हा सामना रविवारी मेलबर्नमध्ये होणार आहे.

6. कबड्डी किती टक्के महिला खेळतात?

क्रिकेटच्या तुलनेत कबड्डीत लिंगभेद कमी आहे. 15 टक्के पुरुषांच्या तुलनेत 11 टक्के महिला कबड्डी खेळतात. त्यामुळे क्रिकेटपेक्षा इथे चांगली परिस्थिती आहे. कबड्डी आशियाई खेळाचा भाग आहे. कबड्डीतही वर्ल्डकप आहे आणि प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचंही आयोजन करण्यात येतं.

फोटो स्रोत, Getty Images

7. महिलांचे खेळ कोण पाहतं?

जितके लोक महिलांना खेळताना पाहतात त्यापेक्षा दुप्पट रस ते पुरुषांच्या स्पर्धात घेतात असं या सर्वेक्षणात सहभाग घेणाऱ्या लोकांनी सांगितलं. त्याचवेळी टी-20 स्पर्धेचे वार्तांकन पाहिल्यावर या प्रकारात रस निर्माण झाल्याचं अनेकांनी सांगितलं.

यावरून हे समजतं की महिलांच्या खेळात लोकांचा रस वाढवण्यासाठी त्यांच्या स्पर्धा टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे.

असं केलं तरच महिलांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये रुची वाढेल असं नाही कारण आजही महिलांच्या खेळात मनोरंजन शोधलं जातं.

8. महिला खेळाडूंबद्दल लोक काय विचार करतात?

पुरुषांच्या क्रीडा स्पर्धा जितक्या रंजक असतात, तितक्या मनोरंजक स्त्रियांचे क्रीडा प्रकार नसतात असं या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या लोकांनी सांगितलं.

महिलांच्या खेळाबाबत आणखी काही समज आहेत. महिला खेळाडूंचं शरीर कमी आकर्षक दिसतं. त्यामुळे महिलांच्या बाबतीत कॅज्युअल सेक्सिझम वाढतं.

या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या लोकांनी सांगितलं की ते पुरुष आणि स्त्रियांना सारखंच प्रोत्साहन देतील. त्याशिवाय एक तृतीयांश लोकांनी सांगितलं की खेळामुळे महिलांच्या मातृत्वावर परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images

महिला खेळाडूंच्या बाबतीत असा विचार फक्त भारतापर्यंत सीमित नाही. ब्रिटनमध्ये मागच्या फुटबॉल वर्ल्डकप च्या आधी केलेल्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की सौंदर्य हेच महिला खेळाडूंना तोलण्याचं माध्यम आहे.

महिलांना खेळात समान संधी मिळावी असं वाटत असेल तर आधी लैंगिक समानता आणावी लागेल.

जेव्हा महिलांसाठी शिक्षण, करिअर आणि स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घेण्यात सक्षम होतील तेव्हा क्रीडा क्षेत्रातही त्यांची कामगिरी सुधारेल.

हेही वाचलंत का?