उद्धव ठाकरे अयोध्या : 'भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही'

  • निलेश धोत्रे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

भाजप म्हणजे हिंदुत्व असा अर्थ नाही. आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणला. महाविकास आघाडीने शंभर दिवस पूर्ण केल्याच्या निमित्ताने उद्धव अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेच्या वतीने राम मंदिर निर्मितीसाठी एक कोटीच्या निधीची घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रातून रामभक्त येतील त्यांच्यासाठी जागी द्यावी. महाराष्ट्र भवन निर्माण करण्याचा मानस आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागेसाठी विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Nilesh Dhotre/BBC

फोटो कॅप्शन,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना

मंदिर व्हावं ही सेनेची वारंवार मागणी आहे. अयोध्येला नियमित येत राहणार. मुख्यमंत्री नसतानाही इथे आलो होतो, नंतरही येत राहीन. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शरयू तीरावर आरती करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर असून, ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आलेत.

उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून 'गार्ड ऑफ ऑनर'चा मान मिळणार आहे. त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.

फोटो स्रोत, BBC/Nilesh Dhotre

कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशात जाऊन योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात त्यांनी योग्य आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची नियोजित शरयू आरती रद्द करण्यात आल्याची माहितीही संजय राऊत यांनी कालच दिली.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर आलेत. त्याआधी गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे तीनवेळा अयोध्येत येऊन गेले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)