क्रिप्टो करन्सीवरील बंदी उठवल्याचे फायदे-तोटे काय?

क्रिप्टो करन्सी

फोटो स्रोत, Getty Images

क्रिप्टो करन्सी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल सुनावला आहे. न्यायालयाने क्रिप्टो करन्सीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेली बंदी उठवली आहे.

एप्रिल 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने या आभासी चलनाच्या वापरावर बंदी घातली होती. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने या बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

क्रिप्टोचा आर्थिक व्यवहारांवर वाईट परिणाम होऊ शकतो, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं होतं. रिझर्व्ह बँकेने 2013 सालापासूनच या चलनाविषयी सतर्कतेचा इशारा दिला होता. अखेर 2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली. या बंदीचा भारतातील क्रिप्टो करन्सीद्वारे खरेदी-विक्रीची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला होता.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, आरबीआयने क्रिप्टोवर बंदी लावावी, असा कायदा भारतात नाही. शिवाय क्रिप्टो ही चलन नाही तर वस्तू आहे, असा युक्तिवाद क्रिप्टोच्या बाजूने सादर करण्यात आला. त्यानंतर न्या. आर. नरिमन, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने बंदी उठवण्याचा निकाल दिला. बंदी उठवल्यामुळे आता भारतात क्रिप्टोने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना गती मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या बंदीचा फटका

बिटकॉईनमुळे भारतीयांना खऱ्या अर्थाने क्रिप्टोकरन्सीची ओळख झाली होती. बिटकॉईन असणारे काही दिवसातच कोट्यधीश झाले होते आणि या बातमीने सामान्य भारतीयांना क्रिप्टो या आभासी चलनाविषयी माहिती मिळाली.

मात्र, रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्याने क्रिप्टो कंपन्यांचे बँकांसोबतचे संबंध तुटले. कंपन्यांना स्वतःचे व्यवहार स्वतः करण्याची मुभा होती. तरीदेखील या बंदीचा क्रिप्टो व्यवहारांवर मोठा परिणाम झाला होता. भारतात क्रिप्टो व्यवहार करणाऱ्या Koinex, Zebpay आणि Unocoin यासारख्या मोठ्या क्रिप्टो कंपन्यांनी आपले ऑपरेशन्स कमी केले होते. काही कंपन्यांना तर पूर्णपणे बंद झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा परिणाम

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्याने क्रिप्टो कंपन्यांचे व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे. मात्र, या खटल्याच्या निमित्ताने भारतीय कायदेमंडळाला क्रिप्टो इन्डस्ट्री, क्रिप्टो तंत्रज्ञानाची वैधता आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम याविषयीची माहिती मिळाली आणि हा या खटल्याचा सर्वात मोठा फायदा असल्याचं मत कॉईन डीसीएक्स या भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ सुमित गुप्ता यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

2018 साली सुमित गुप्ता आणि नीरज खंडेलवाल या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी सिंगापूरमध्ये DCX कंपनीची स्थापना केली होती. याची भारतीय शाखा म्हणजे कॉईन डीसीएक्स.

बीबीसीशी बोलताना सुमित गुप्ता म्हणाले, "आमची बाजू ऐकून घेतल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो आणि भारताच्या भविष्यातील भक्कम वाढीसाठी तसंच अर्थव्यवस्थेत नवीन क्षेत्र उभारण्याच्या दृष्टीने क्रिप्टोने बजावलेली भूमिका या खटल्याने यशस्वीरित्या अधोरेखित केली, याचाही आम्हाला आनंद आहे."

सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यामुळे गुंतवणूक, आर्थिक विकास, वित्तीय समावेश आणि बाजाराची परिपक्वता यादिशेने भारतासाठी नव्या संधी खुल्या होणार असल्याचं मतही सुमित गुप्ता यांनी व्यक्त केलं.

ते म्हणाले, "जेव्हा एखादं नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा त्यातून नवे उद्योजक निर्माण होतात. नवीन स्टार्ट अप सुरू होतात. नवे उद्योग उभे राहतात. नवीन सेवा आणि उत्पादनं बाजारात येतात. नवीन ग्राहकवर्ग तयार होतो आणि एकूणच एक नवं मार्केट उभं राहतं. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या बाबतीत हेच घडलं. कृत्रिम प्रज्ञा (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) बाबतही तेच घडतंय. सिंगापूर, माल्टा, स्वित्झरलँडसारख्या काही देशांमध्ये क्रिप्टोबाबतही तेच घडतंय. इथून पुढे आता भारताचा विकास वेगाने होणार आहे. आम्ही कायमच क्रिप्टोकडे 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचं भारताचं स्वप्न साकार करण्याची क्षमता असणारं क्षेत्र म्हणून बघत आलो आहोत आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला आम्ही तयार आहोत."

क्रिप्टोकरन्सीबाबत भारताचं स्थान

भारताची 1 अब्ज 30 कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या आहे. मात्र, क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत जगाच्या तुलनेत आपण बरंच मागे आहोत. सुमित गुप्ता म्हणतात, "अनिश्चितता आणि साशंकता यामुळे भारतातली बहुतांश जनता नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करायला घाबरते. शर्यतीत आपण मागे असलो तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने नवीन ऊर्जा मिळाली आहे. क्रिप्टोवरील बंदी उठवल्याने आणि वाढत्या जागरुकतेमुळे भारत जागतिक क्रिप्टो क्षेत्रात मोठा हातभार लावेल."

'क्रिप्टोच्या वाढीसाठी सुधारणेची गरज'

भारतात क्रिप्टो करन्सी क्षेत्राच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचं मत सुमित गुप्ता व्यक्त करतात. गुप्ता यांच्या कॉईन डीसीएक्स कंपनीतर्फे भारतातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिप्टो विषयावर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मात्र, क्रिप्टोवर घातलेल्या बंदीनंतर क्रिप्टो चलनाविषयी बरेच गैरसमज पसरल्याचं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीशी बोलताना सुमित गुप्ता म्हणाले, "देशाच्या समृद्धीसाठी पोषक असे क्रिप्टो कायदे बनवता यावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहण्याची आमची इच्छा आहे. शिवाय, योग्य नियम आणि कुठलेही अनुचित प्रकार न घडता या क्षेत्राचा विकास व्हावा, अशी आमची इच्छा आहे."

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?

प्रत्येक देशाचं चलन असतं. उदा. भारताचा रुपया, अमेरिकेचा डॉलर, ब्रिटनचा पाऊंड. तसंच क्रिप्टो हे सुद्धा एक चलन आहे. फरक एवढाच की ते इतर चलनासारखं फिजिकल नाही. तर ते डिजिटल आहे.

फिजिकल चलन तुम्ही बघू शकता, हाताळू शकता. मात्र, क्रिप्टो करन्सीला हातात घेता येत नाही. ते एक व्हर्च्युअल म्हणजेच आभासी चलन आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी विक्री करताना हे चलन वापरलं जातं.

हे चलन कुठलाच देश किंवा त्या सरकारी बँक छापत नाही. पारंपरिक चलनाला पर्याय म्हणून या क्रिप्टो करन्सीकडे बघितलं जातं.

एक्सपिडिया आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या काही मोठ्या कंपन्या बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून व्यवहार करतात. बिटक्वॉईनचा सर्वाधिक उपयोग गुंतवणुकीसाठी केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, याद्वारे आपण विमानाचं तिकीट बुक करू शकतो, हॉटेल बुक करू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स, कार, कॉफी असं बरंच काही आपण बिटक्वॉईन करन्सीने खरेदी करू शकतो. हजारो वेबसाईट कंपन्या बिटक्वॉईन स्वीकारतात.

बिटक्वाईन प्रमाणेच आणखीही काही क्रिप्टो चलन बाजारात उपलब्ध आहेत. उदा. रेड क्वॉईन, सिया क्वॉईन, सिस्क्वॉईन, व्हॉईस क्वॉईन आणि मोनरो.

क्रिप्टो करन्सीचे फायदे-तोटे

हे डिजिटल चलन असल्याने त्यात घोटाळा होण्याची शक्यता नगण्य आहे. यात रिटर्न म्हणजेच लाभ जास्त मिळतो. ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवहार सुलभ होतो. यासाठी नियामक संस्था नसल्याने नोटबंदी किंवा अवमूल्यनाचा त्यावर परिणाम होत नाही.

मात्र, या आभासी चलनात मोठे चढ-उतार होत असतात. गेल्या पाच वर्षात अनेकदा बिटकॉईन कुठलीही पूर्वसूचना न देता 40 ते 50 टक्क्यांपर्यंत घसरला. 2013 साली तर बिटक्वॉईनमध्ये एका रात्रीत 70 टक्क्यांची घसरण झाली आणि त्याचा दर 233 डॉलरवरून घसरून थेट 67 डॉलर झाला होता.

दुसरं म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदा शस्त्र तस्करीसारख्या अवैध कामांसाठीही क्रिप्टोचा वापर होण्याची शक्यता असते.

अमेरिकेतील वॉल स्ट्रीट या भांडवली बाजारानेही क्रिप्टो करन्सीवर चिंता व्यक्त केली आहे. मात्र, तरीही तिथे बिटक्वॉईनद्वारे व्यवहार करण्यावर बंदी नाही आणि आता भारतातही सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टो करन्सीवरची बंदी उठवली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)