कोरोना व्हायरसच्या भीतीने टेस्टसाठी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा...- ब्लॉग

  • गुलशनकुमार वनकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, AFP

मला आठवत नाही गेल्या दहा वर्षांत मला कधी डॉक्टरांकडे जायची गरज भासली असेल. मात्र मागच्या दोन आठवड्यातच मी दुसऱ्यांदा गेलो. कोरोना व्हायरसची भीती कुणाकडून काय करवून घेऊ शकते, याचा हा वृतान्त.

गेल्या दोन आठवड्यांपासून मला बरं नव्हतंच. दिल्लीतलं हवामान बदललं तसं सर्दी, खोकला, ताप आला. आता हे नॉर्मलच होतं, असं म्हणत मी एक-दोन दिवस दुखणं अंगावर काढलं. फार्मसीतून आपली साधारण पॅरासिटेमॉल घेतली आणि घशासाठी कफ सिरप, सोबत एक अँटिबायोटिक. आपल्याला आपली तब्येत जेवढी कळते, त्यानुसार प्रत्येकाचं हेच पहिलं पाऊल असतं, नाही?

त्यामुळे मी जरा निश्चिंत होतो. औषधं घेतली नि दोन-तीन दिवसांत ताप गेला, सर्दी गेली. पण खोकला काही जाईना. त्यातच भारतात कोरोना व्हायरस आलाय म्हणे, म्हणून मी जरा टेन्शनमध्ये आलो. कारण पहिल्यांदा कणकण जाणवली, त्याच्या आठवडाभरापूर्वी मी दिल्लीत झालेल्या ऑटो एक्सपो आणि नंतर सूरजकूंड मेला, अशा दोन मोठ्या मेळाव्यांमध्ये गेलो होतो. दोन्हीकडे बरीच आंतरराष्ट्रीय मंडळी होती, त्यामुळे "काही सांगता येत नाही" म्हणत मी एका अखेर एका डॉक्टरांकडे गेलो. त्यांनीसुद्धा नॉर्मल ताप-सर्दी-खोकल्याची औषधं दिली.

पण त्याने आठवडा उलटूनही खोकला काही गेला नाही. उलट ऑफिसमध्ये माझ्या टीममधले काही लोकही (कदाचित माझ्यामुळे?) आजारी पडू लागल्याने माझी काळजी जरा वाढली. म्हणून मी अखेर सिक लीव्ह टाकून स्वतःची तपासणी करायचं ठरवलं.

हेल्पलाईनच्या हेलपाटा

पूर्वी कुठल्याही कामाची सुरुवात गणेशापासून व्हायची, आजकाल ती गुगलपासून होते. कुठे जायचं चेकअपसाठी, याची शोधाशोध केल्यावर एक धड उत्तर मिळेना. ना कुठली बातमी, ना कुठला लेख, ना एखाद्या सरकारी पोस्टरवर हे सांगितलंय की जर एखाद्याला त्याची कोव्हिड-19साठी तपासणी करायची असेल तर त्याने काय करावं.

अखेर ट्विटरवर एक हेल्पलाईन नंबर दिसला. तो डायल केला. 'लाईन व्यस्त' होती. मी साधारण तासभर प्रयत्न करत राहिलो, पण सतत 'लाईन व्यस्तच' होती.

फोटो स्रोत, Twitter

नाईलाजाने मीच बाहेर पडलो आणि घराजवळचं म्हणजे पूर्व दिल्लीतलं एक खासगी रुग्णालय गाठलं. मात्र तिथेही कोरोना व्हायरसविषयी जरा संभ्रमच होता. हॉस्पिटलच्या रिसेप्शनवाल्यांनी कॅझ्युअल्टीमध्ये पाठवलं, तर तिथे सगळे डॉक्टर मास्क लावून बसलेले. एका डॉक्टरला सांगितलं तर ते म्हणाले, "बघा! आमच्याकडे तर सध्या तेवढी काही सुविधा नाही. ज्यांनाही संशय येतोय, त्यांना आम्ही एकतर व्हायरलसाठीची औषधं देतोय आणि सफदरजंग हॉस्पिटलला जायला सांगतोय."

सफदरजंग हॉस्पिटल हे दिल्लीतलं मोठ्या शासकीय दवाखान्यांपैकी एक. तिथे डायल केल्यावर त्यांनी सांगितलं, "आमच्याकडे येऊ नका. RMLला जा. तिथेच सगळं होत आहे."

हे RML म्हणजे सेंट्रल दिल्लीतलं भलंमोठं असं डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल. शासकीय असल्यामुळे तिथेतरी इलाज होणारच, असं वाटलं.

नोटाबंदीची आठवण झाली

दुपारी 3.30 वाजता RMLला पोहोचलो, तेव्हा तिथे जवळपास 40 जण एका रांगेत उभे होते. सर्वांनी मास्क लावलेले. पार्किंगमध्येच एका तात्पुरत्या शेडमध्ये "CoronaVirus Facilitation Cente / कोरोना व्हायरस सुविधा केंद्र" उभारण्यात आलं होतं. मात्र तिथे काय सुरू आहे, हे सांगणारं तिथे कुणीच नव्हतं. चपराशालाही काही कल्पना नव्हती.

अखेर रांगेत उभ्या चार-सहा लोकांकडून खात्री करून मीही रांगेत लागलो. रांग अतिशय कूर्मगतीने चालत होती, म्हणजे साधारण पाच मीटर पुढे सरकायला 50 मिनिटं लागली. त्यामुळे इथेच दिवस जातो की काय, जरा टेन्शन आलं. कारण किती वेळ लागेल, याचा काहीच अंदाज नसल्यामुळे मी नक्कीच कोणत्याही बंदोबस्ताशिवाय आलो होतो - ना पाण्याची बॉटल, ना स्वेटर, ना खायला काही. पण आता सुट्टी घेऊन आलोच आहे, म्हटल्यावर मी तिथेच थांबून एकदाचं काय ते निदान करूनच घरी जायचं ठरवलं.

फोटो स्रोत, Twitter

माझ्यासोबत रांगेत उभे असलेल्यांपैकी एक हनिमूनहून परतलेलं जोडपं होतं, एक बेल्जियम दूतावासातील परदेशी अधिकारी होता आणि आणखी एक तरुण होता, जो कुठल्यातरी चायनीज कंपनीसोबत काम करत होता. आणखी एक अख्खा तरुणांचा जत्था होता, जो कदाचित आखातात कामासाठी जात होता आणि त्यांना आजारी नसल्याचं प्रमाणपत्र सक्तीने आणायचं होतं.

आता एवढा वेळ काढायचा म्हटल्यावर रांगेत उभे लोक आपल्या मोबाईलवर टिकटॉक, युट्यूबवर जोरजोरात गाणी ऐकू लागले. यावेळी मला नोटाबंदीची आठवण नक्कीच झाली, कारण त्याही वेळी अनोळखी लोक तासन् तास रांगांमध्ये उभे होते. तेव्हा पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नव्हती, आता आपल्याला कोरोना झालाय याचं टेन्शन होतं. मात्र आज जीवाचा प्रश्न होता म्हणून कुणीच रांग सोडून जात नव्हतं. ना रांग पुढे लवकर सरकत होती, ना ती लहान होत होती.

तितक्यात एका मुलाने बाजूच्या शेडमध्ये उलटी केली. तो जोरजोराने खोकू लागल्याने सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. माझ्यासमोरचा बेल्जियमचा भाऊ चांगलाच घाबरला आणि त्याने चपराशापाशी जाऊन तक्रार केली. त्या ओकणाऱ्या मुलाला ताबडतोब आत नेण्यात आलं.

तेव्हा कळलं की ही रांग फक्त प्री-स्क्रीनिंगची आहे. म्हणजे इथे दोन डॉक्टर फक्त काही प्राथमिक प्रश्न विचारून, रक्तदाब तपासून तुम्हाला कोव्हिड-19साठी उपाचाराची गरज आहे की नाही, याची माहिती मिळणार होती.

त्यासाठी आमच्या हाती फॉर्म देण्यात आले, यात तुमचं नाव, वय, संपर्क, पत्ता तसंच इतक्यात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि श्वास घ्यायला त्रास होतोय का असे प्रश्न विचारले होते. तसंच तुम्ही नुकतेच परदेशवारीहून परतला आहात का किंवा एखाद्या कन्फर्म्ड कोव्हिड-19 रुग्णाच्या संपर्कात आले आहात का, याची माहिती द्यायची होती.

फोटो स्रोत, TWITTER

कमाल म्हणजे हे फॉर्म भरण्यासाठी पेन कुणाकडेच नव्हता. एकाने पेन काढला तर त्याच्या पेनाने सगळेच आपापले फॉर्म भरू लागले. कोरोना व्हायरस यातून पसरतोच असं नाही, पण आजारी व्हायला काही लागत नाही, हेही तितकंच खरं.

सुमारे पाच तास असेच वाट बघत गेले. मध्येच पाऊस सुरू झाला आणि त्या शेडच्या खाली उभ्या लोकांची तारांबळ उडाली. कारण सगळेच आजारी, खोकत असलेले, शिंका देत असलेले. त्यामुळे पावसाने आता आणखी विषाणू पसरतील, म्हणून सगळ्यांचीच धाकधूक वाढली.

फोटो स्रोत, Twitter

रात्रीचे सुमारे 8.30 वाजता मी प्री-स्क्रीनिंग सेंटरच्या दारापाशी पोहोचलो. तितक्यात दोन्ही डॉक्टरांनी ब्रेक घ्यायचं ठरवलं. तेही दमले असतील मान्य, कारण हे सेंटर 24 तास सुरू राहणार, असं कळलं.

फोटो स्रोत, Twitter

मग ते सुमारे 45 मिनिटं उलटूनही नाही आल्याने, त्यातच धोधो पावसाने हैराण झालेले लोक आता आरडाओरड करू लागले. मग साधारण रात्री 9.30 वाजता दोघे डॉक्टर अवतरले आणि चिडलेल्या लोकांना शांत करत म्हणाले, "तुम्ही समजायला हवं की इथे प्रत्येकाला तपासणं शक्य नाही. जर तुम्ही एवढ्यात परदेशात जाऊन आला असाल, किंवा तुम्हाला खात्री माहिती असलेल्या कोरोनाच्या पेशंटच्या संपर्कात तुम्ही आला असाल, तरच इथे थांबा. तुम्ही स्वतःचाच वेळ वाया घालवत आहात."

हे साधारण पाच तासांनी कळल्यामुळे लोक आणखी बिथरले. अख्ख्या दिल्लीत एकच टेस्ट सेंटर सक्रिय असताना, लोक तिथे जीवासाठीच जीव मुठीत घेऊन उभे असताना हे उत्तर अनाकलनीय होतं. कारण ज्याला भीती नाहीच तो उगाच कशाला या रांगेत एवढा वेळ वाया घालवेल.

अखेर आम्हाला तिथून जाण्यास सांगण्यात आलं. मात्र अनेक प्रश्नांनी माझ्या मनात विषाणूंसारखा शिरकाव केला -

  • आज देशात 30हून अधिक पॉझिटिव्ह केसेस आढळल्या आहेत. दिल्लीतल्या प्रमुख (बहुदा एकमेव) टेस्ट सेंटरची अशी अवस्था असेल तर उर्वरित देशात काय होईल?
  • आपण देशात नोटाबंदीच्या वेळी एवढे लोक रांगेत चक्कर येऊन पडताना, मरताना पाहिले. आता तर लोक स्वतःच्या आरोग्यासाठी रांगेत उभे राहतील. ज्यांना जमतंय त्यांचं ठीक, पण ज्यांच्यात शक्ती नसेल त्यांचं काय?
  • कोरोनाव्हायरससाठी चीनसारख्या कार्यक्षम देशालाही सज्ज व्हायला जरा वेळच लागला. सध्या सरकारपुढील सामाजिक आणि आर्थिक आव्हानं पाहता, कोव्हिड-19चा प्रकोप उफाळला तर आपली आरोग्य व्यवस्था सज्ज आहे का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)