बातम्यांमधील प्रामाणिकपणाचा विजय झाल्यावरच लोकशाहीवरील विश्वास बळकट होईल – टोनी हॉल

टोनी हॉल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

टोनी हॉल

लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास बळकट होण्यासाठी माध्यमांची विश्वासार्हता महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन BBCचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी केलं आहे. ते Times Global Summit या कार्यक्रमात नवी दिल्लीत बोलत होते.

यावेळी त्यांनी आताच्या काळातील पत्रकारितेसमोरील आव्हानांना BBC कसं तोंड देत आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या भाषणाचा अनुवाद इथं देत आहोत.

प्रास्ताविक

आज इथे उपस्थित राहणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या आधी अगदी दोनच वर्षांपूर्वी मला दिल्लीत यायची संधी मिळाली होती. त्या वेळी आमच्या इथल्या वृत्त विभागाचा मोठा विस्तार केला जात होता आणि चार भारतीय भाषांमध्ये आमची सेवा नव्याने सुरू होणार होती, हे निमित्त साजरं करण्यासाठी मी दिल्लीत आलो होतो.

या देशातील अधिकाधिक, लाखो लोकांपर्यंत बीबीसीच्या माध्यमातून विश्वासार्ह बातम्या पोचाव्यात, हे आमचं ध्येय होतं आणि आहे.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या वर्षी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकल्यानंतर पुन्हा हा विचार माझ्या मनात आला...

कारण, इथे असताना मला त्यांच्याशी बोलायची संधी मिळाली होती; सत्तरीच्या दशकात आणीबाणीदरम्यानचे त्यांचे अनुभव, त्यांनी भोगलेला 18 महिन्यांहून जास्त कालावधीचा तुरुंगवास, याबद्दल त्यांच्याशी बोलायला मिळालं.

त्या काळात त्यांनी छुप्या मार्गाने एक छोटासा ट्रान्झिस्टर तुरुंगात आणला होता आणि सकाळी सहा वाजता, पहारेकऱ्यांना जाग यायच्या आधी त्यांना या ट्रान्झिस्टरवरून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या बातम्या ऐकता येत असत, असं त्यांनी मला सांगितलं.

जगात काय चाललंय, आपल्या स्वतःच्या देशात काय चाललंय, हे कळून घेण्यासाठी त्यांच्याकडे हा एकमेव मार्ग उपलब्ध होता, असं ते म्हणाले. तुरुंगवासामध्ये, भयग्रस्ततेमध्ये, किंवा अस्थिरतेमध्ये जगणाऱ्या इतरही अनेकांसाठी गेली जवळपास 90 वर्षं बीबीसीचं हेच स्थान राहिलं आहे.

तूर्तास बातम्यांवरील विश्वासाच्या विषयसूत्राकडे मी परत येतो. पण सुरुवातीला मला व्यापक अर्थाने विश्वासाबद्दल बोलायचं आहे. शासन, व्यवसाय, आणि माध्यमं या लोकशाही संस्थांवरचा विश्वास. खुद्द लोकशाहीवरचा विश्वास.

अव्यवस्थेच्या या नवीन युगामध्ये काय बदल घडलेत आणि त्याला आपण माध्यमकर्मी कशा प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो, याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे.

लोकशाहीवरील विश्वास

या वर्षारंभी मी लंडनमध्ये 'एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर'च्या उद्घाटन प्रसंगी बोललो. 28 देशांमधील व्यवसाय, शासन, माध्यमं आणि बिगरसरकारी संस्था (एनजीओ) यांच्यावरील विश्वासाचा मागोवा घेणारे हे वार्षिक सर्वेक्षण असतं, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच.

गेल्या वीस वर्षांमध्ये घडलेल्या बदलाची विलक्षण कहाणी या सर्वेक्षणातून आपल्या समोर उलगडते. युनायटेड किंग्डमच्या प्रवासाची कहाणी सुस्पष्ट आहे: तिथल्या लोकशाही संस्थांवरचा विश्वास ढासळला आहे.

राष्ट्रीय वादचर्चेमध्ये आपल्या मताची दखल घेतली जात नाही, असं अधिकाधिक लोकांना वाटतं. आपल्या हितसंबंधांचं रक्षण केलं जात नाही, असं अधिकाधिक समुदायांना वाटतं.

फोटो स्रोत, Tweet

कमी-अधिक प्रमाणात जगामध्ये सर्वत्रच हा कल दिसतोय, हे मला माहीत आहे. या संदर्भात एक आकडेवारी अतिशय वेधक आहे.

ऑटोमेशन किंवा आर्थिक मंदी, स्पर्धा वा स्थलांतर, या कारणांनी आपल्याला नोकरी गमवावी लागेल, अशी चिंता सध्या दर 10 लोकांपैकी 8 जणांना भेडसावत असते.

भयग्रस्ततेमुळे आशा कोलमडून पडत असल्याचं दिसतं. अनेकांचा सामाजिक प्रगतीवरचा विश्वास उडाला आहे. कष्ट केले तर आपली परिस्थिती सुधारेल, या संकल्पनेवरचा विश्वास उडतो आहे.

याचा परिणाम म्हणून लोकशाहीवरचा- लोकशाहीला आधारभूत असलेल्या संस्थांवरचा- विश्वासही कमी झाला.

व्यवसायांवरचा विश्वास

अनेक देशांमध्ये माध्यमं आणि शासन यांच्यापेक्षा व्यवसाय ही सर्वाधिक विश्वासार्ह संस्था मानली जाते, असाही नवीन कल सध्या दिसतो.

आपल्या समाजांसमोरच्या सर्वांत कळीच्या समस्यांवर उतारा शोधण्यासाठी पूर्वी लोक राजकीय नेत्यांकडे जात असत, पण आता अनेक जण अशा परिस्थितीत व्यवसाय क्षेत्रातील नेत्यांकडे आशेने पाहतात.

'सीईओ' मंडळींनी बदलाची धुरा वाहावी, अशी तीन चतुर्थांश लोकांची धारणा आहे. शासन पहिल्यांदा कृती करेल, याची वाट पाहू नये. न्याय्य वेतनापासून ते ऑटोमेशनपर्यंत आणि कार्बन उत्सर्जनापासून ते इंटरनेटच्या नियमनापर्यंत सर्व मुद्द्यांवर सीईओंनी पुढाकार घ्यावा, अशी ही धारणा आहे.

अलीकडेच, एका मोठ्या जागतिक तंत्रज्ञान कंपनीच्या प्रमुखाशी मी बोलत होतो. 2030 सालापर्यंत केवळ नैतिक कंपन्याच टिकाव धरतील, असं त्याला वाटत असल्याचं तो म्हणाला.

व्यवसायातील यश केवळ तुम्ही काय करता यावर अवलंबून नाही, तर तुम्ही ते कसं करता यावर यश अधिकाधिक अवलंबून आहे, असं निश्चितपणे म्हणता येतं.

म्हणजे सर्वोच्च आदर्श पाळणारे सर्वांत मोठे विजेते असतील.

माध्यमांवरील विश्वास

माध्यमांच्या क्षेत्रालाही हेच लागू होतं, अशी माझी अतिशय ठाम धारणा आहे. गेलं दशक जगभरातील माध्यमांसाठी अतिशय अव्यवस्थितपणाचं होतं.

अगदी थोड्याच वर्षांमध्ये बनावट बातम्यांचं विष आपल्या समाजांच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरलं आहे- त्यातून विश्वासात घट होते आणि लोकशाही अस्थिर होते.

जगभरामध्ये आपल्या संभाषिताला विपरित रूप देण्याची, फूट पाडण्याची, आणि मतदारांच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याची बनावट बातम्यांची ताकद किती आहे, हे आपण पाहतोच आहोत. एवढंच नव्हे, तर हिंसाचाराची ठिणगी पाडण्याची आणि जीवितहानी करण्याचीही ताकद या घटकामध्ये आहे.

लोकशाही दुबळी असलेल्या आणि डिजीटल साक्षरता कमी असलेल्या देशांमध्ये गैरमाहितीचा प्रादुर्भाव ही तातडीची समस्या झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

गैरमाहितीच्या युद्धातील अस्त्रं अधिकाधिक प्रगत होत असल्यामुळे ही परिस्थिती आणखी खालावणार आहे.

'डीपफेक' व्हिडिओ तंत्रज्ञान आता आलं आहे, म्हणजे कोणीही काहीतरी बोलल्याचं किंवा काहीतरी केल्याचं दाखवता येईल, अशा युगात आपण प्रवेश करतोय.

तथ्यं आणि खोटेपणा, अटळ गोष्टी आणि ठाम विधानं, सत्य आणि धडधडीत असत्य, यांमध्ये भेद करणं आजच्याइतकं अवघड कधीच नव्हतं. समाजमाध्यमांच्या उदयामुळे या प्रवाहाची गती प्रचंड वाढली आहे.

आपल्या जीवनदृष्टीला आव्हान देणाऱ्या वृत्त-स्त्रोतांऐवजी या दृष्टीचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या वृत्त-स्त्रोतांचीच निवड अधिकाधिक माणसं करू लागले आहेत.

समाजमाध्यमांमुळे आपल्याला स्वतःचाच प्रतिध्वनी ऐकवणारे कप्पे तयार झाले, त्यातून समाजातील चिरफळ्या आणखी रुंदावत आहेत आणि कोणत्याही युक्तिवादाची एकच- म्हणजे आपलीच बाजू- आपल्याला पाहावीशी वाटावी, यासाठी ही माध्यमं प्रोत्साहन देतात.

फोटो स्रोत, Getty Images

इतरांना ऐकायची इच्छा नसलेल्या मतांबाबतचं साधं वार्तांकन करायचं असेल, तरीही पत्रकारांना ऑनलाइन विश्वामध्ये सातत्याने निनावी धोक्यांना सामोरं जावं लागतं, हा याचा सर्वांत चिंताजनक परिणाम आहे, असं मला वाटतं.

पारंपरिक पत्रकारिता या यावरचा उतारा मानला जात नसून, समस्येचा एक भागच मानला जातो आहे.

पत्रकारांना लक्ष्य करण्याचे, 'ट्रोल' करण्याचे, किंवा धमकावण्याचे आणि अखेरीस त्यांना त्यांचं काम करण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न रोजच्यारोज होत असल्याचं आपण पाहतो आहोत.

पत्रकारांना शारीरिक धोका व हिंसाचारही वाढत्या प्रमाणात सहन करावा लागतो आहे- अगदी अलीकडे दिल्लीत झालेल्या दंगलीतही हे घडलं.

शेवटी, हे सगळं अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरचं आक्रमण आहे. भीती अथवा पक्षपात न बाळगता तथ्यं शोधणं, कितीही गैरसोयीचं असलं, तरी सत्तेला सत्य सुनावणं, या आपल्या कर्तव्यांविरोधातलं हे आक्रमण आहे.

याचे आपल्यावर, लोकशाही म्हणून आणि समाज म्हणूनसुद्धा गंभीर परिणाम होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

सत्याच्या उपलब्धतेवर भरवसा नसलेली लोकशाही म्हणजे अधःपतित लोकशाही असते. आणि ज्या समाजामध्ये वाद घालणारे दोन पक्ष आजूबाजूच्या घडामोडींची प्रामाणिक दखल घेऊन त्या आधारे संवाद साधू इच्छित नसतील, तो समाज मूलभूतरित्या कमकुवत झालेला असतो.

जगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाने यातील हितसंबंध स्पष्ट केले आहेत.

शांत, संयमी व अचूक पद्धतीने केल्या जाणाऱ्या वार्तांकनावर, त्यातून मिळणाऱ्या आवश्यक माहितीवर लोकांनी भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं असतं, हे या संकटकाळात अधोरेखित झालं आहे.

अव्यवस्थेच्या युगामध्ये विश्वासार्ह बातमी

त्यामुळेच आपल्यासारख्या पारंपरिक माध्यमकर्मींवर अभूतपूर्व मौलिक भूमिका निभावण्याची जबाबदारी आली आहे, असं मला वाटतं.

आपल्यासाठी आधारभूत असलेली मूल्यं- आणि आपल्या कामाची चौकट निश्चित करणारी चांगल्या पत्रकारितेची तत्त्वं- आज, कधी नव्हे इतकी गरजेची ठरली आहेत.

ही स्थिती मोठी संधी घेऊन आली आहे. माध्यमांवरील विश्वासाबद्दलची आपली बांधिलकी दृढ करण्याची आणि बातम्यांच्या सचोटीमागे ठामपणे उभं राहण्याची हीच वेळ आहे.

हे सर्व बीबीसी कशा प्रकारे करू पाहते, यासंबंधीचे 5 मुद्दे मी इथे मांडणार आहे:

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

1. आम्ही आमची जागतिक पोहोच विस्तारतो आहोत.

आजघडीला, जगातील सर्वांत विश्वासार्ह, राजकीय प्रभावापासून मुक्त, आणि अचूकता व निःपक्षपातीपणाच्या अत्युच्च प्रमाणकांशी बांधील वृत्त-स्त्रोतांमध्ये बीबीसीची गणना होते.

दर आठवड्याला जगभरातील 43 कोटी लोकांपर्यंत आम्ही पोचतो. वर्ल्ड सर्व्हिस रेडिओ आणि बीबीसी रोडिओ न्यूज या आमच्या दोन सेवांचं ग्रहण करणाऱ्या लोकांची संख्या सध्या विक्रमी ठरली आहे.

पण जगभरातील आमच्या श्रोत्यांसाठी-प्रेक्षकांसाठी आम्ही याहून बरंच काही करू शकतो, याची जाणीव आम्हाला आहे.

त्यामुळेच बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचा 1940च्या दशकापासूनचा सर्वांत मोठा विस्तार आम्ही अलीकडेच पूर्णत्वास नेला.

सध्या आम्ही 42 भाषांमध्ये कार्यरत आहोत, आणि नैरोबी ते बँकॉक ते बेलग्रेडपर्यंत विविध ठिकाणी आम्ही नवीन आणि विस्तारित ब्यूरो उघडले आहेत.

भारतामध्ये हिंदी आणि तामीळ यांसारख्या भाषांमध्ये आमची वृत्तसेवा आधीपासूनच होती, त्यात गुजराती, मराठी, पंजाबी व तेलुगू या चार भाषांमधील वृत्तसेवांची भर पडली, त्यामुळे आता एकूण नऊ भारतीय भाषांमधून बीबीसी कार्यरत आहे.

फोटो स्रोत, Twitter

याचा अर्थ, या देशातील आणखी लाखो लोकांना आपल्या भाषांमध्ये बीबीसीच्या बातम्या ग्रहण करता येतात.

दिल्लीतील आमचा ब्यूरो आता संपूर्ण दक्षिण आशियामधील व्हीडिओ, टीव्ही व डिजिटल आशयाचं उत्पादन केंद्र झाला आहे.

अधिक तरुण असलेल्या, स्त्रियांची अधिक संख्या असलेल्या संपूर्णतः नवीन श्रोत्यापर्यंत-प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पारंपरिक वृत्तसेवांद्वारे या वर्गापर्यंत पोचणं अवघड होतं.

जगभरात सर्वत्र आम्ही हे करतो आहोत.

2. बनावट बातम्यांशी आम्ही लढा देतो आहोत.

गेल्या वर्षी बीबीसीने 'बियाँड फेक न्यूज' प्रकल्प राबवला. त्या अंतर्गत आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय केंद्रांवरून माहितीपट, विशेष वार्तांकन आणि लेख प्रसिद्ध करण्यात आले.

आपल्या समोरच्या प्रश्नांविषयीचं आकलन वाढवणं आणि माध्यमसाक्षरता सुधारणं, असं या प्रकल्पाचं दुहेरी उद्दिष्ट होतं.

खाजगी जाळ्यांद्वारे बनावट बातम्या कशा प्रकारे पसरतात, याबाबत बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने- भारत, नायजेरिया व केनिया या देशांच्या संदर्भात- केलेल्या संशोधनाला पुरस्कारही लाभले आहेत.

महत्त्वाच्या निवडणुकांवेळी लोकशाहीला पाठबळ पुरवणं, यावरही आम्ही बरंच लक्ष केंद्रित केलं आहे. वर्ल्ड सर्व्हिसच्या विस्तारामुळे आम्ही आता मूळ स्त्रोतापाशीच गैरमाहितीच्या निपटाऱ्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो.

शिवाय, 'बीबीसी रिअॅलिटी चेक' या आमच्या जागतिक तथ्यशोधन सेवेमध्येही आम्ही गुंतवणूक केली आहे. दावे आणि प्रतिदावे समोर येतील तसतसं त्यांच्याबाबतचा तपास करणारी आणि बनावट बातम्यांना तातडीने आव्हान देणारी ही सेवा आहे.

उदाहरणार्थ, भारतातील निवडणुकांवेळी समाजमाध्यमांवरून पसरणाऱ्या अनेक खोट्या बातम्यांचा आमच्या 'रिअॅलिटी चेक'च्या चमूने थेट सामना केला- यांमध्ये बीबीसीच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या बनावट सर्वेक्षणांचाही समावेश होता!

3. आम्ही आघाडीवर लक्ष केंद्रित केलं आहे.

म्हणजे आम्ही 'प्रत्यक्ष जमिनीवर उतरून सज्ज आहोत': घटना घडत असेल तिथून थेट, प्रत्यक्षदर्शी वार्तांकन करण्यावर आम्ही भर दिला आहे आणि त्याहून अधिक लक्ष आम्ही विशेषज्ज्ञ पत्रकारितेवर केंद्रित केलं आहे.

आपल्या विषयामध्ये गढून गेलेले वार्ताहर. तथ्यांचं अर्थनिर्णयन करून विश्वसनीय निवाडा देऊ शकतील असे त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ.

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीच्या जागतिक वृत्तसेवेच्या दृष्टीने यामध्ये स्थानिक पत्रकारांचा समावेश होतो- ज्या समुदायासाठी काम करतोय त्या समुदायांचा भाग असलेले हे पत्रकार असतात.

त्यामुळेच बीबीसीचा भारतातील विस्तार होत असताना आम्ही देशभरात 150हून अधिक पत्रकारांची भरती केली.

याच कारणामुळे- अलीकडे दिल्लीतील दंगलींदरम्यान आम्ही केलेल्या वार्तांकनामध्ये आमची भारतीय प्रतिनिधी योगिता लिमये ताज्या बातम्या जगाला सांगत होती आणि फैझल मोहम्मद अलीसारखे इतर भाषांमधले वार्ताहरही त्यात सहभागी होते.

4. आम्ही आपल्या काळाला सामोरे जात आहोत.

सध्याच्या काळात बातम्या तात्कालिकतेमध्ये अडकणं अगदी सहज सोपं झालेलं आहे. अशा परिस्थितीत प्रकाश कमी पडतो आणि वातावरण मात्र तापतं.

मथळ्यांच्या आड राहिलेल्या विषयांबाबतच्या पत्रकारितेमध्ये बीबीसी अधिक गुंतवणूक करते आहे. याद्वारे आमच्या श्रोत्यांना-प्रेक्षकांना अधिक संदर्भबहुलता आणि अधिक स्पष्टीकरण पुरवलं जातं.

याचा अर्थ शोधपत्रकारितेवर आणखी लक्ष केंद्रित केलं जातं आहे.

आमचा आफ्रिका आय हा चमू याचा उत्तम दाखला आहे: जागतिक दर्जाची शोधपत्रकारिता करणारा हा चमू आफ्रिका खंडामध्ये सत्तेला उत्तरादायी ठरवण्याचं काम करतो आहे.

या चमूने कॅमेरूनमधल्या व्हिडिओ फूटेजचं कष्टपूर्वक विश्लेषण केलं, त्यामुळे तिथल्या सैन्याने नागरी स्त्रिया व मुलांचं भयंकर हत्याकांड घडवल्याचं निर्णायकरित्या सिद्ध झालं.

खराखुरा बदल घडवण्याला अशा प्रकारची पत्रकारिता सहायक ठरेल.

नायजेरियामध्ये कोडाइन कफ सिरपच्या गैरवापरातून पसरलेल्या साथीचा- आणि त्यामागच्या प्रचंड गुन्हेगारी जाळ्याचा- शोध आफ्रिका आयने घेतला, त्यामुळे तिथल्या कायद्यात लगेचच बदल करावा लागला.

आफ्रिका आयने केलेल्या या यशस्वी कामगिरीच्या धर्तीवर जगात इतरत्रही अशी शोधपत्रकारिता करण्याची आमची इच्छा आहे- उदाहरणार्थ, बगदादमध्ये शिया धर्मगुरू लहान मुलींवरील अत्याचाराबाबत पुरुषांना सल्ला देत असल्याचं आमच्या शोधपत्रकारांनी अलीकडेच उघडकीस आणलं.

भारतासह इतर प्रदेशांमध्येही आम्ही नवीन शोधपत्रकारांचे चमू तयार करणार आहोत.

बातम्यांच्या बाबतीत थोडा दमसास घेणं, म्हणजे आणखी काही खऱ्याखुऱ्या महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देणंही असतं.

आपल्या जागतिक भवितव्याला आकार देणाऱ्या मोठ्या विषयसूत्रांवर लक्ष देणं, असाही याचा अर्थ होतो.

हवामानबदल, वाढती आणि वृद्ध होत चाललेली लोकसंख्या, शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या, कृत्रिम प्रज्ञा आपल्या जीवनाला कसा आकार देईल, येत्या वर्षांमध्ये या सर्वांत मोठ्या प्रश्नांबाबत आपल्याला स्वतःची समजूत वाढवावी लागणार आहे.

5. खराखुरा बदल घडवण्यासाठी आम्ही इतरांसोबत काम करत आहोत.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात एका विशेष परिषदेसाठी मी जगभरातील माध्यमसंस्थांना बीबीसीसोबत येण्यासाठी निमंत्रित केलं होतं.

विभिन्न गटांना सामायिक ध्येयांच्या संदर्भात एकत्र आणण्यासाठी बीबीसीने ही सार्वजनिक सेवेची ताकद वापरायचं ठरवलं.

यासाठी फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ट्विटर, वॉल स्ट्रीट जर्नल, द हिंदू, आणि अशा अनेक संस्थांमध्ये आघाडी उभारावी लागेल.

गैरमाहिती, पक्षपातीपणा आणि बनावट बातम्या यांच्या जागतिक उदयावर तोडगा काढण्यासाठी आपण एकत्र येऊन काय करू शकतो, ठोस कृती कशी अंमलात आणता येईल, हे शोधण्याचा यामागचा उद्देश आहे.

याला आम्ही 'ट्रस्टेट न्यूज इनिशिएटिव्ह' असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

आणखी एक योजना आम्ही सुरू केली आहे- मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका असलेली आणि निवडणुकांच्या प्रामाणिक प्रक्रियेला बाधा आणू शकेल अशी चुकीची माहिती आधीच हेरून, त्यासंबंधी आमच्या साथीदारांना इशारा देण्याचं काम या योजनेमध्ये केलं जाईल.

आत्तापर्यंत दोन निवडणुकांमध्ये आम्ही यासंबंधीची चाचणी घेतली आणि ती यशस्वी होत असल्याचं आमच्या लक्षात आलं.

आपल्या सर्वांच्या आस्थेच्या प्रश्नावर वास्तवात कृती करण्याचा हा एक खरोखरच चांगला दाखला आहे- खराखुरा बदल घडू शकेल, अशा व्याप्तीची ही कृती आहे.

निष्कर्ष

ही संधी देणारी स्थिती आहे, असं मी म्हटलं...

लोकांना विश्वास ठेवता येईल अशा बातम्या आणि त्यांना भरवसा ठेवता येईल अशी माहिती, यांबद्दलची श्रद्धा पुनर्स्थापित करण्याची ही संधी आहे.

बातम्यांच्या भवितव्यासंदर्भात, 'फेक' (बनावट) विरुद्ध 'फेअर अँड फ्री' (निःपक्षपाती व स्वतंत्र) यांपैकी कोणती दृष्टी यशस्वी होईल, हे या नवीन दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये निश्चित होईल.

शेवटी बातम्यांमधील सचोटीचा विजय होईल, अशी खातरजमा करूनच आपल्याला लोकशाहीवरील व आपल्या सर्व लोकशाही संस्थांवरील विश्वास बळकट करणं शक्य आहे, आणि यातूनच समाजावरील श्रद्धा अधिक व्यापकरित्या दृढ करता येईल, असं मला वाटतं.

धन्यवाद.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)