महिला दिन: मराठी तरुणीने तयार केलं सॅनेटरी पॅड नष्ट करणारं मशीन

  • राहुल रणसुभे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
केतकी कोकीळ
फोटो कॅप्शन,

केतकी कोकीळ

मासिक पाळी दरम्यान महिलांनी वापरलेले सॅनेटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची ही एक संपूर्ण जगासमोरील मोठी समस्या आहे. कारण साधारण एक सॅनेटरी पॅडचं नैसर्गिक विघटन व्हायला जवळपास ४००-५०० वर्ष लागतात. भारताची लोकसंख्या पाहता दरवर्षी लाखो टन सॅनेटरी पॅडचा करचा तयार होत आहे. याच समस्येला लक्षात घेऊन औरंगाबाद येथील केतकी कोकीळ या तरूणीने एक खास उपकरण बनवलं आहे, जे सॅनेटरी पॅड नष्ट करतं ते ही कसलंही प्रदूषण न करता.

केतकीने पुण्याच्या एमआयटी कॉलेजमधून इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट डिझाईनमध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर ती कामाचा अनुभव घेण्यासाठी हैदराबादला गेली. तिथून परत आल्यावर केतकीने तिच्या वडिलांच्या इकोसेन्स कंपनीत काम करायला सुरूवात केली. आपल्या कंपनीने महिलांसाठी काहीतरी करावं असं केतकीला वाटत असल्यामुळे तिने तिच्या कंपनीतल्या सहकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केली.

याबद्दल केतकी सांगते की, "इकोसेन्समध्ये काम करत असताना एक-दोन वर्षांनंतर आम्ही विचार करायला लागलो की, आपला पुढचा प्रोजेक्ट कोणता असावा याचा. तेव्हा चर्चेतून असं ठरलं की, आपण महिलांच्या अशा समस्यांबद्दलल काम करायचं की ज्याबद्दल समाजात बोलणंही कठीण आहे जे म्हणजे की, मासिक पाळी. मग आम्ही याच विषयावर काम करायचं ठरवलं. त्यानंतर आम्ही या विषयी भारतामध्ये याबद्दल लोकांचा अनुभव कसा आहे. काय बोललं जातं.

त्यावेळी आम्हाला असं आढळलं की, पॅडमॅन या चित्रपटानंतर सॅनेटरी पॅड वापरा असा एक चांगला संदेश लोकांपर्यंत गेला. मात्र हे वापरलेले सॅनेटरी पॅड किंवा नॅपकीनची कशी विल्हेवाट लावायची या विषयावर कोणीच बोलत नव्हतं आणि काम करत नव्हतं हे आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही मग याच क्षेत्रात काम करायचं हे ठरवलं."

पॅडमॅन चित्रपटामुळे एक चांगला संदेश गेला

केतकीने जेव्हा या विषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली तेव्हा तिला या समस्येबद्दल जाणीव झाली. ती म्हणते "भारतामध्ये या विषयाबद्दल लोकांचा अनुभव कसा आहे, काय बोललं जातं याचा अभ्यास करत होतो. त्यावेळी आम्हाला असं आढळलं की, पॅडमॅन या चित्रपटानंतर सॅनेटरी पॅड वापरा असा एक चांगला संदेश लोकांपर्यंत गेला. मात्र हे वापरलेले सॅनिटरी पॅड किंवा नॅपकिनची कशी विल्हेवाट लावायची या विषयावर कोणीच बोलत नव्हतं आणि काम करत नव्हतं, हे आमच्या लक्षात आलं. त्यानंतर आम्ही मग याच क्षेत्रात काम करायचं हे ठरवलं."

केतकीने या समस्येवरती अभ्यास करायला सुरूवात केली. औरंगाबादमधल्या अनेक सोसायटीमध्ये जाऊन सर्व्हे केले. प्रत्यक्ष जाऊन महिलांशी, मुलींशी संवाद साधला.

"या सर्व्हेमुळे आम्हाला कळालं की ही खरंच खूप मोठी समस्या आहे. अजूनही स्त्रियांना त्यांनी वापरलेल्या नॅपकिनची कशी विल्हेवाट लावायची हे माहित नाहीये. त्या जे डस्टबिनमध्ये पॅक करून टाकतात ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हे सुध्दा त्यांनासुध्दा कळत नाहीये. जर मग ही योग्य पध्दत नाहीये तर योग्य पध्दत काय आहे? अशा प्रश्नाला अजूनही आपल्या सोसायटीमध्ये उत्तर नाहीये. तेव्हा आम्ही ठरवलं की, या प्रश्नाचं उत्तर आपण सोसायटीला द्यायचं." हे केतकीने ठरवलं.

बाजारातील इतर उपकरणांपेक्षा हे उपकरण वेगळं कसं?

बाजारात अनेक सॅनेटरी पॅड डिस्पोजल मशीन्स उपलब्ध होत्या. त्यामुळे त्यांच्यापेक्षा आपलं उपकरण वेगळं ठेवायचं हे आव्हान केतकी आणि तिच्या टीम समोर होतं. केतकीच्याच टीममध्ये असणारा अक्षांश कटारीया हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम पाहतात.

निर्मिती प्रक्रियेबद्दल अक्षांश सांगतात, "या उपकरणावर आमच्या कंपनीने एक वर्षं संशोधन करून त्याचं डिझाईन केलंय. झिरोपॅड बनवण्यापूर्वी आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक सॅनेटरी नॅपकीन डिस्पोजरचा अभ्यास केला. त्यावेळी लक्षात आलं की, हे प्रॉडक्ट बनवताना यात नीट शास्त्रीय दृष्टिकोन झालेला नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण शास्त्रोक्तदृष्ट्या या प्रॉडक्टला सर्वात बेस्ट बनवूयात.त्यासाठी आम्ही सॅनेटरी नॅपकिनमध्ये कोणता कंटेंट वापरला जातो याचा अभ्यास केला. तसेच ते जळण्यासाठी किती उर्जा लागते, वेळ लागतो याचाही अभ्यास केला.त्यानंतर आम्ही हे उपकरण बनवलं."

उपकरणाच्या आकाराबद्दल घेतली विशेष काळजी

डिझायनर असलेल्या केतकीने या उपकरणाच्या आकाराबद्दल विशेष काळजी घेतली असल्याचं ती सांगते. ती म्हणते,"मी डिझायनर आहे त्यामुळे आम्ही या डिव्हाईसच्या निर्मितीमध्ये एक डिझाईनिंग अप्रोच लावला आहे, जो की एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला तिचं वापरलेलं नॅपकिन डिस्पोज करताना तिला अभिमान वाटायला हवं हे लक्षात ठेवून आम्ही या डिव्हाईसचा बाह्य आकार ठरवला.

फ्रेश रंग वापरले आहेत. सिलेंड्रीकल आकार ठेवला आहे जेणे करून त्याला आपण भिंतीला अडकवू शकतो. तसंच हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये असलेल्या सर्व प्रॉडक्टपेक्षा हे वेगळं दिसून येईल अशा प्रकारे त्याला आम्ही बनवलं आहे."

पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची घेतली काळजी

आपलं उपकरण हे पर्यावरण पूरक असावं अशी केतकीच्या टीमची कल्पना होती आणि ती सत्यात उतरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. "कोणतीही गोष्ट जाळली की त्यातून धूर निर्माण होतो आणि हा धूर आपल्या वातावरणाला प्रदूषित करतो. त्यामुळे आम्ही याचीही काळजी घेतली आहे की, जेव्हा आमच्या डिव्हाईसमध्ये सॅनेटरी नॅपकीन जाळलं जातं तेव्हा त्यातून जो निघणारा धूर आहे तो पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. शिवाय या उपकरणासाठी पर्यावरण नियंत्रण मंडळाने मान्यताही मिळवण्यात आली आहे." असं केतकी अभिमानानं सांगते.

महिलांना समजावून सांगणं कठीण होतं

झिरोपॅडची निर्मिती तर सुरू झाली. मात्र अशा ते महिलांपर्यंत पोहोचवायचं कसं. कारण भारतात अनेक ठिकाणी मासिक पाळी हे नाव घेणं ही लज्जास्पद मानलं जातं. तेव्हा पाळीत वापरलेले पॅड उचलून एखाद्या उपकरणामध्ये टाकायला सांगणे हे फारच कठीण काम होतं असं केतकी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images

सुरुवातीच्या प्रवासाबद्दल केतकी सांगते, "आमचा सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. जेव्हा आम्ही लोकांकडे जाऊन त्यांना आमचं हे उपकरण तुमच्या ऑफिसमध्ये, शाळेत ट्रायलसाठी बसवा असं सांगायचो तेव्हा आम्हाला बऱ्याच ठिकाणांवरून नकार आले. आमच्या मुली हे वापरणार नाहीत. त्याची गरज नाही. तुम्ही नकाच बसवू अशा अनेक प्रतिक्रिया आल्या. मात्र आम्ही जिद्द सोडली नाही. अखेर काही लोकांना आमचं म्हणणं पटलं आणि त्यांनी आम्हाला होकार दिला. त्यानंतर या उपकरणाचे फायदे त्यांना दिसू लागले. आणि एक वेळ अशी आली की, ज्यांनी आम्हाला सुरुवातीला नकार दिला होता ते सुध्दा आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये हे उपकरण लावण्यासाठी सांगू लागले."

हे उपकरण काम कसं करत?

या उपकरणामध्ये वरच्या बाजूने आत नॅपकिन टाकायची सोय आहे. उपकरणामध्ये एक नॅपकिन टाकून जर हे उपकरण सुरू केलं की उपकरण डिव्हाईसमध्ये एक नॅपकिन आलं हे रजिस्टर करतं. ५ नॅपकिनची या उपकरणची कॅपॅसिटी आहे. म्हणजेच जेव्हा या उपकरणामध्ये ५ नॅपकीन जमा होतील तेव्हा हे उपकरण आपोआप नॅपकिन जाळण्यास सुरूवात करेल आणि ३० मिनिटांमध्ये हे या सर्व नॅपकिनची केवळ १० ते २० ग्रॅम एवढी राख आपल्याला पाहायला मिळते.

महिलांचा आत्मविश्वास वाढला

केतकीचं हे झिरोपॅड डिस्पोजर औरंगाबादचा एस.एस. कंट्रोल्स या कंपनीत बसवण्यात आलंय. हे उपकरण लावल्यापासून तिथल्या महिलांची मासिक पाळीमध्ये होणारा मानसिक त्रास कमी झाल्याचं तिथल्या महिला सांगतात.

फोटो कॅप्शन,

माया घाडगे

माया घाडगे याच कंपनीत काम करतात. त्या सांगतात, "पूर्वी ही उपकरणं नव्हती तेव्हा आम्ही आमचे वापरलेले पॅड कचऱ्यात, डस्टबिनमध्ये टाकायचो. ते आम्हाला घाण वाटायचं. आम्हाला इथं काम करावं लागतं. त्यामुळे आम्हाला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. प्रश्न पडायचा की आता काय करायचं? मात्र जेव्हापासून ती उपकरणं आली तेव्हापासून आम्ही कम्फर्टेबल राहतो. आणि वापरलेलं पॅड त्या उपकरणामध्ये टाकतो."

सफाई कर्मचाऱ्यांचा त्रास कमी झाला

या उपकरणामुळे महिलांचा मानसिक त्रास तर कमी झालाच शिवाय जे ऑफिसमधले सफाई कर्मचारी आहेत त्यांनाही खूप आनंद होतोय. याबद्दल केतकी अभिमानानं सांगते की, "आम्हाला बरेच जण येऊन सांगतात की, आमची खूप सोय झाली हे डिव्हाईस बसवल्यापासून. आणि एक जो एन्ड युजर जो आम्ही लक्षातच घेतला नव्हता ते म्हणजे ऑफिसमध्ये किंवा शाळांमध्ये ज्या क्लिनिंग करणाऱ्या बायका असतात ज्या स्वतः डस्टबिनला रिकामं करतात, तर त्या आम्हाला येऊन म्हणाल्या की, थॅंक्यू तुम्ही हे डिव्हाईस बसवल्याबद्दल…"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)