पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला सन्मान नाकारणारी लिसिप्रिया कंगुजम आहे तरी कोण?

लिसिप्रिया कंगुजम

फोटो स्रोत, LICYPRIYA KANGUJAM/TWITTER

फोटो कॅप्शन,

लिसिप्रिया कंगुजम

"प्रिय नरेंद्र मोदी, तुम्ही माझं म्हणणं ऐकणार नसाल तर कृपया मला सन्मानित करु नका. प्रेरक महिलांबाबतच्या तुमच्या उपक्रमात माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद. अत्यंत विचारपूर्वक मी माझं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे."

या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्ताव नाकारणाऱ्या मुलीचं नाव लिसिप्रिया कंगुजम आहे. ती फक्त 8 वर्षांची आहे.

लिसिप्रिया ईशान्य भारतातल्या मणिपूर या राज्यातील आहे. पर्यावरणाच्या विषयावर ती खूप सक्रिय असते. गेल्या वर्षी तिला आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने विविध विषयांवर काम करणाऱ्या महिलांबाबत एक उपक्रम ट्विटरवर सुरु केला आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने आपल्या @mygovindia या अकाऊंटवरुन एक ट्विट केलं.

लिसिप्रिया एक पर्यावरण कार्यकर्ता आहे. तिला 2019 मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार आणि भारत शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तुम्ही तिला ओळखता का? #SheInspiresUs वापरुन आम्हाला कळवा. असा उल्लेख ट्वीटमध्ये करण्यात आला होता.

लिसिप्रियाचा नकार

भारत सरकारच्या या ट्वीटला प्रतिक्रिया देताना लिसिप्रियाने आभार मानले. पण हा सन्मान स्वीकारण्यास तिने नकार दिला.

इतकंच नव्हे तर यानंतर तिने एकामागून एक ट्विट केले.

तिने लिहिलं, "प्रिय नेत्यांनो आणि राजकीय पक्षांनो, मला यासाठी कौतुक नको आहे. माझा आवाज संसदेत उठवा, असं तुम्ही खासदारांना सांगा. आपल्या राजकीय उद्देशासाठी आणि प्रपोगंडा म्हणून वापर माझा वापर कधीच करु नका. मी तुमच्या बाजूने नाही.

फोटो स्रोत, LICYPRIYA KANGUJAM/TWITTER

लिसिप्रियाने #ClimateCrisis हा हॅशटॅग वापरुन आणखी एक ट्विट केलं.

तुमच्या संसदेत मूकबधीरच नव्हे तर आंधळेसुद्धा आहेत. हे अपयश आहे. ताबडतोब कारवाई करा."

लिसिप्रियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांकडे जलवायू परिवर्तन कायदा बनवण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

लिसिप्रियाच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. काही जण तिच्या कठोर भूमिकेचं कौतुक करताना दिसत आहेत. तर काहींनी तिची दिशाभूल करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

हे ट्विट तिनेच केलेत का, तिच्या वयाचा विचार करता हे तिनेच लिहिलं का, असा प्रश्न लोक विचारत आहेत. लिसिप्रियाच्या ट्विटर हँडलवर तिचं अकाऊंट तिच्या पालकांकडून चालवलं जातं, हे स्पष्ट लिहिलं आहे.

फोटो स्रोत, LICYPRIYA KANGUJAM/TWITTER

अनेक जण तिला ट्रोल करताना तिने भारत सरकारचा अपमान केल्याचं म्हणत आहे. या सर्वांना उत्तर देताना काही वेळानंतर लिसिप्रियाने पुन्हा ट्विट केलं.

ती म्हणाली, प्रिय भाऊ/बहीण/सर/मॅडम, मला धमकी देणं आणि आपला प्रपोगंडा चालवणं बंद करा. मी कुणाच्याही विरुद्ध नाही. मला हवामान बदल नको तर यंत्रणेत बदल हवा आहे. माझी कुणाकडूनही काही अपेक्षा नाही. आपल्या नेत्यांनी माझा आवाज ऐकावा, असं मला वाटतं. माझा नकारच माझा आवाज ऐकला जाण्यासाठी मदतशीर ठरेल, असा मला विश्वास आहे.

लिसिप्रियाची तुलना नेहमीच स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थुनबर्गशी केली जाते. पण लिसिप्रियाला ही तुलना आवडत नाही. तिची स्वतःची एक ओळख असल्याचं ती सांगते. लिसिप्रियाने ट्विटरवर स्वतःची ओळख "एक बेघर बाल पर्यावरण कार्यकर्ता" अशी लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून म्हटलं होतं की, आंतरराष्ट्रीय महिला दिनी सोशल मीडिया अकाऊंट्स प्रेरणादायी महिलांना समर्पित करेन. ज्यांच्या कामाने लाखो लोकांना प्रेरणा मिळते अशा सगळ्या महिलांसाठी अकाऊंट समर्पित असेल'.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)