YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मुंबईतून अटक, ईडीची कारवाई #5मोठ्याबातम्या

राणा कपूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

राणा कपूर

आजच्या वर्तमानपत्रातील राज्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच मोठ्या घडामोडींवर धावती नजर....

1) YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक

YES बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) नं आज (8 मार्च) पहाटे अटक केली. जवळपास दोन दिवसांपासून राणा कपूर यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

मुंबईतील वरळीत समुद्र महल या राणा कपूरांच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकत चौकशीही केली होती.

वारेमाप कर्जवाटप केल्याचा राणा कपूर यांच्यावर आरोप आहे.

फोटो स्रोत, Getty Images

5 मार्च 2020 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं YES बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळं पुढील एक महिना खातेदारांना आपापल्या खात्यातून केवळ 50 हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम काढता येणार आहे. त्याहून अधिकच्या रकमेसाठी RBI ची परवानगी बंधनकारक असेल.

2) भारतात कोरोना व्हायरसचे आणखी 3 रुग्ण आढळले, एकूण संख्या 34 वर

भारतात कोरोना व्हायरसचे आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील दोन लडाखमधील, तर एक तामिळनाडूमधील आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 34 वर पोहोचलीय. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

लडाखमध्ये जे रुग्ण आढळले, ते इराणमधून परतले होते, तर तामिळनाडूतील रुग्ण ओमानहून परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.

फोटो स्रोत, AFP

एकीकडे कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतात तयारी सुरू असताना, दुसरीकडे केरळमधील कोझीकोडे बर्ड फ्लूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर केरळमधील कोझीकोडेचे जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

3) आता कळलं, कोण खरा मित्र आहे - एस. जयशंकर

जगात असा कुठलाच देश नाही, जिथं सर्वांचं स्वागत केलं जातं, असं म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी CAA च्या टीकाकारांना उत्तर दिलंय. द प्रिंटनं ही बातमी दिलीय.

ग्लोबल बिझनेस समिटमध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

फोटो स्रोत, Getty Images

यावेळी एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेचाही निषेध नोंदवला. संयुक्त राष्ट्रानं जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी आधी काय केलंय, हेही पाहिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

जागतिक स्तरावर भारत आपले मित्र गमावतोय का, असा प्रश्न एस. जयशंकर यांना विचारला गेला, त्यावेळी ते म्हणाले, "कदाचित आता भारताला कळू लागलंय की, आपला खरा मित्र कोण आहे."

4) शाहीन बागमधील बंदूकधारी आरोपीला जामीन

'हिंदू राज करेगा' अशा घोषणा देत दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात बंदूक झळकावणाऱ्या आरोपीला दिल्ली कोर्टानं जामीन दिलाय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter

कपिल बैसाला असं या आरोपीचं नाव आहे. बैसाला याला जामीन देण्यास पोलिसांनी कोर्टात विरोध केला होता. मात्र, कोर्टानं 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बैसालाला जामीन दिला.

घोषणा देण्यासह कपिल बैसाला यानं फेसबुकवरही वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. 'शाहीन बाग खेल खत्म' अशा आशायची पोस्टही त्यानं फेसबुकवर लिहिली होती.

5) राम मंदिर उभारणीस महाविकास आघाडीचा पाठिंबाच - हसन मुश्रीफ

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचाही सहभाग आहे. तसंच, राम मंदिराच्या उभारणीसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे," असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

मुश्रीफ पुढं म्हणाले, "महाविकास आघाडीचे 100 दिवस निर्विघ्नपणे पार पडले, शिवसेनेच्या अजेंड्यावरील 2-3 योजना पूर्ण झाल्या, या सर्व पार्श्वभूमीवर ते अयोध्येला गेले."

राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 मार्चला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून एक कोटींची मदतही त्यांनी जाहीर केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)