सजायी शिंदेः कात्रज बोगद्याजवळ डोंगराला लागलेली आग स्वतः विझवली #5मोठ्या बातम्या

सयाजी शिंदे

फोटो स्रोत, SOCIAL VIRAL IMAGE

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. सयाजी शिंदे यांनी विझवली डोंगराला लागलेली आग

कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरालगत गवत आणि झाडांना लागलेली आग पाहून अभिनेते सयाजी शिंदे यांनी गाडी थांबवून ची विझवली. सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र रविवारी पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात होते.

यावेळेस त्यांना कात्रज बोगद्याजवळ आग लागल्याचे दिसले. सयाजी शिंदे यांनी या आगीची माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनलाही दिली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2 . रक्तात गद्दारी असणारे फडणवीसांची प्रामाणिक राहातील?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ट्वीटरवर एकापाठोपाठ ट्वीट करत त्यांनी गणेश नाईक यांच्यावर थेट टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

2009 साली काढण्यात आलेल्या खासदार संजीव नाईक यांच्या विजयाची मिरवणुकीत जितेंद्र आव्हाड आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते

"गणेश नाईक यांना 1990 साली समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिला. 1999 साली गणेश नाईकांनी गद्दारी केली. त्यानंतर 2014 पर्यंत साहेबांनी त्यांना सांभाळून धरलं.

2014 लाच त्यांच्या मनामध्ये गद्दारीचा विचार आला आणि 2019 साली तो जुळून आला." असे ट्वीट त्यांनी केले आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

याच ट्वीटमध्ये ते म्हणतात, "मोदी आणि शहा हे लुटारु आहेत. ते देशातून पळून जाणारे, असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहातील. " अशा थेट हल्ला त्यांनी केला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात पुढे आणखी बऱ्याच घडामोडी घडतील याचे संकेतच त्यांनी दिले आहेत.

3 . राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यामध्ये सध्या 15 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून 258 लोकांना घरी सोडण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई आणि पुणे विमानतळावर 1 लाख 9 हजार 188 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांपैकी 13 जण मुंबईत तर 2 पुण्यात भरती आहेत. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4 . 'नारीशक्तीने कुपोषण निर्मूलन आणि जलसंवर्धनासाठी काम करावे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती पुरस्काराच्या मानकरी महिलांनी देशातील कुपोषण निर्मूलन आणि जलसंवर्धनासाठी काम करावे असे आवाहन केले आहे. नारीशक्ती पुरस्कार विजेत्या महिलांशी त्यांनी आपल्या निवासस्थानी संवाद साधला.

स्वच्छ भारत अभियान हे सरकारने एकट्याने यशस्वी केलेले नाही, तर त्यात महिलांची मोठी भूमिका आहे. महिलांनी कुपोषण दूर करण्यातही असाच पुढाकार घेण्याची गरज आहे. महिला या जलजीवन योजनाही मोठ्या प्रभावीपणे यशस्वी करू शकतात असा मला विश्वास आहे. लोक पाणी वाया घालवतात, ते रोखले पाहिजे, ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना ते उपलब्ध झाले पाहिजे, असे मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5. नऊ लाख अंडी, दीड लाख कोंबड्या नष्ट

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर मोठे संकट उद्भवले आहे. पालघर जिल्ह्यात एका व्यावसायिकाने नऊ लाख अंडी तसेच कोंबडीच्या दीड लाख नवजात पिलांना नष्ट करण्यात केलं आहे.

कोंबडीच्या पिलांपासून 40 दिवसांत सुमारे दोन किलोची कोंबडी तयार होते त्यासाठी 75 रुपयांचा खर्च होतो. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीपोटी मांसाहार करण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच होळीच्या निमित्ताने होणारी खरेदी अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने या कुक्कुटपालन व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)