पी. टी. उषा: आंतराष्ट्रीय पदकांचं शतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूला बीबीसीचा जीवनगौरव सन्मान

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
पी टी उषा

फोटो स्रोत, Piyush Nagpal

जिंकणारा सर्वांच्या लक्षात राहतो, हरणाऱ्यांना कुणीही लक्षात ठेवत नाही. खेळाच्या मैदानात मोठ्या यशाचा पाठलाग करणाऱ्या बहुतेकांच्या बाबतीत हेच होतं. पण पी. टी. उषा यांनी हा समज तर खोटा ठरवलाच, शिवाय भारतीय महिलांविषयीचे गैरसमजही पुसून टाकले.

उषा यांना 1984 सालच्या ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण आजही भारतात अॅथलेटिक्स म्हटलं, की त्यांचंच नाव घेतलं जातं.

भारताच्या महानतम खेळाडूंपैकी एक असलेल्या उषा यांनी केवळ खेळाडूंच्या पिढ्यां-पिढ्यांना प्रेरणाच दिली नाही, तर अनेक युवा खेळाडूंची कारकीर्द घडवण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला आहे.

त्यांचा प्रवास, ऑलिम्पिकमध्ये त्या ज्या अडथळ्यांच्या शर्यतीत धावल्या, तसाच अडचणींनी भरलेला होता. "1980च्या दशकातली परिस्थिती वेगळी होती. मी खेळण्यास सुरुवात केली तेव्हा ऑलिंपिक गाठेन असं वाटलंही नव्हतं." उषा त्यावेळेच्या आठवणींमध्ये घेऊन जातात.

पय्योळीमध्ये उषा यांच्या कारकीर्दीची सुरूवात

पिलावुळकंडी तेक्केपारांबिळ उषा यांचा जन्म त्यांच्या पूर्वजांच्या गावी, पय्योळीमध्ये झाला. केरळात कोळिकोड (कोझिकोड) जवळ समुद्रकिनारी हे गाव वसलं आहे. त्यामुळंच पुढे उषा यांना 'पय्योळी एक्सप्रेस' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Getty Images

उषा चौथीत होत्या, तेव्हा त्यांनी धावण्यास सुरूवात केली. शाळेतल्या क्रीडा शिक्षकांनी छोट्या उषाला जिल्हास्तरावरच्या विजेतीसोबत धावण्यास सांगितलं, जी त्याच शाळेत शिकत होती. उषा ती शर्यत जिंकली आणि मग धावण्याच्या स्पर्धांत भाग घेऊ लागली. पुढच्या काही वर्षांत जिल्हास्तरावर शाळेसाठी पदकं जिंकत राहिली.

पण उषा यांच्या कारकीर्दीची खरी सुरूवात त्या तेरा वर्षांची असताना झाली, जेव्हा त्यांना केरळ सरकारनं सुरू केलेल्या मुलींसाठीच्या क्रीडा विभागात प्रवेश मिळाला.

"माझे एक काका त्या शाळेत शिक्षक होते आणि त्यामुळे आई-वडिलांकडून खेळण्याची परवानगी मिळवणं थोडं सोपं गेलं."

उषा यांच्या कुटुंबियांनी त्यांना फक्त पाठिंबाच दिला नाही, तर सरावासाठी प्रोत्साहनही दिलं. "माझे वडील माझ्यासोबत मैदानात यायचे. ते एक काठी हातात घेऊन मैदानाच्या मधोमध बसायचे. कारण सकाळी सकाळी मी जेव्हा जॉगिंग करायचे, तेव्हा तिथे कुत्रे भटकत असायचे."

छोटी उषा कधी कधी रेल्वे रूळांशेजारच्या एका पायवाटेवरून धावायची आणि तिथून जाणाऱ्या ट्रेनसोबत स्पर्धा करायची. तिला समुद्रकिनारी वाळूतही धावायला आवडायचं.

फोटो स्रोत, P T Usha

"मला समुद्रकिनारी सराव करणं आवडायचं. तिथे बरेच प्रयोगही करता यायचे आणि कसलं बंधन नसायचं. तुम्ही उतारावर धावू शकता, टेकडीवर धावू शकता."

सुरुवातीला लोकांना कुतूहल वाटायचं. "1978-79चा काळ आणि मी शॉर्ट्स घालून धावायचे. खूप सारे लोक समुद्रकिनारी जमा व्हायचे मला धावताना पाहायला..."

पुढे पुढे बघ्यांची ती गर्दीही तिला मदत करू लागली आणि प्रोत्साहन देऊ लागली.

"मला पोहता येत नसे, त्यामुळे मी आधी पाण्यात जायलाही घाबरायचे. आसपासचे लोक आणि लहान मुलांना पोहता यायचं. ते माझ्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर थांबू लागले."

दिशा देणारा प्रशिक्षक

उषा यांना राज्याच्या क्रीडा उपक्रमात प्रवेश मिळाला, पण तिथं फारशा सुविधा नव्हत्या. "तिथं सुमारे चाळीस खेळाडू राहायचे. आम्हा सर्वांना मिळून दोन-तीनच बाथरूम होते. अनेक अडचणी असतानाही आम्हाला कडक शिस्त पाळावी लागायची. माझा दिवस पहाटे पाचला सुरू व्हायचा आणि सरावासोबतच आम्ही शाळेतलं नेहमीचं शिक्षणही घेत होतो."

त्याच क्रीडा विभागाच्या शाळेत उषा नावाजलेले प्रशिक्षक ओ. एम. नांबियार यांना पहिल्यांदा भेटल्या. हा त्यांच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा क्षण ठरला. नांबियार यांनी उषामधली गुणवत्ता हेरली, तिला आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मुख्य म्हणजे तिच्यातल्या धावपटूला अधिक आक्रमक बनवलं.

फोटो स्रोत, P T Usha

फोटो कॅप्शन,

प्रशिक्षक ओ. एम. नांबियार यांच्यासोबत पी टी उषा

"नांबियार सर सगळ्या खेळाडूंना वर्तुळाकारात उभं करायचे आणि व्यायामप्रकार करायला लावायचे. ज्यांना ते चांगलं जमायचं, त्यांना ते टॉफी खायला द्यायचे." आणि छोटी उषा तिथेही जिंकायची.

जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर आणि पुढे राष्ट्रीय स्तरावर तिची कामगिरी उंचावत गेली. 1980 साली, सोळा वर्षांच्या वयात उषानं मॉस्को इथे ऑलिंपिक पदार्पण केलं. चार वर्षांनंतर ती ऑलिंपिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला अॅथलीट बनली.

पण पदक जिंकण्याचं तिचं स्वप्न, सेकंदापेक्षाही कमी वेळानं हुकलं.

सर्वोत्तमही जेव्हा कमी पडतं...

1984 सालच्या लॉस अँजेलस ऑलिंपिकमधल्या 400 मीटर हर्डल्स शर्यतीच्या अंतिम फेरीचा व्हीडिओ आजही भारतीय क्रीडा प्रेमींच्या अंगावर काटा आणतो, आणि त्यांना चुटपूट लावून जातो.

व्हीडिओच्या सुरूवातीला एक उंच आणि सडपातळ भारतीय मुलगी स्टार्टिंग लाईनवर तयारी करताना दिसते. समालोचक तिच्याविषयीच बोलतायत, "ती लॉस अँजेलसला आली, तेव्हा फारशी कुणाला माहिती नव्हती. 20 वर्षांच्या या मुलीच्या नावावर आशियाई विक्रम जमा आहे. पण ऑलिंपिकआधी तिला फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. आणि आता, तिला इथे कदाचित सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे."

फोटो स्रोत, P T Usha

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सुवर्णपदक जिंकण्याची संधी. पात्रता आणि उपांत्य फेरीतल्या कामगिरीमुळं पी. टी. उषाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या.

स्टार्टिंग गनचा आवाज होतो. उषाला वाटतं, की तिनं चांगली सुरूवात केली आहे. पण काही सेकंदांतच शर्यत थांबवली जाते. ऑस्ट्रेलियाची डेबी फ्लिंटॉफ पहिल्या पावलावरच अडखळल्यानं शर्यत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो. तो क्षण उषा यांना आजही आठवतो. "त्यानंतर मात्र मी नर्व्हस झाले. माझी एकाग्रता ढासळली. मला भीती वाटत होती आणि माझे हात कापत होते. शर्यत अखेर सुरू झाली, तेव्हा मी खूपच सावकाश, उपांत्य फेरीपेक्षाही कमी वेगानं सुरूवात केली."

सुरवात चांगली न करताही उषा पहिल्या तिघींमध्ये स्थान मिळवतील असं दिसत होतं. पण अखेर अगदी थोडक्यात त्यांचं पदक हुकलं. "माझा पाय पुढ्यात होता, पण मी माझी छाती पुढे झुकवलेली नव्हती. मी पुढे झुकले असते, तर पदक जिंकू शकले असते."

त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. "मला खूप वाईट वाटत होतं, माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. नांबियार सरही रडत होते." अख्ख्या भारतालाच जणू ते दुःख जाणवत होतं. पण चौथ्या स्थानावर येऊनही उषा भारतासाठी, एका अशा देशासाठी नायिका बनली, जिथे ऑलिंपिक पदकं अजूनही दुर्मीळ आहेत.

अपयश आणि सुवर्णयुग

पुढच्या काही शर्यतींमध्ये उषा यांची कामगिरी ढासळली. लोक टीका करू लागले. पण उषा यांचा स्वतःवर विश्वास होता. यशाची संधी पुन्हा मिळेल याची त्यांना खात्री होती.

आणि ती संधी आली, तेव्हा उषा यांनी सुवर्णलूटच केली. 1986 साली दक्षिण कोरियाच्या सोल इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उषा यांनी चार सुवर्णपदकं मिळवली. 400 मीटर हर्डल्स (अडथळ्यांची शर्यत), 400 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यती त्यांनी सहज जिंकल्या आणि 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवलं.

फोटो स्रोत, Getty Images

"भारतानं तोवर त्या स्पर्धेत पाच सुवर्णपदकं मिळवली होती, आणि मी त्यातली चार जिंकली होती. चौदाव्या क्रमांकावरून भारत चौथ्या क्रमांकावर आला. माझ्यासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी तो अभिमानाचा क्षण होता. मी देशासाठी मला जे शक्य होतं ते करू शकले. प्रत्येक वेळी मी पदक घ्यायला गेले, तेव्हा राष्ट्रगीत वाजलं. तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च क्षण होता."

उषा यांना 1983 साली भारत सरकारनं अर्जुन पुरस्कार प्रदान केला. 1985 साली त्यांना भारतातला चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान, पद्मश्रीनं गौरवण्यात आलं.

लग्न, मातृत्त्व आणि पुनरागमन

उषा आजही पय्योळीमध्ये राहतात. तिथं दिसतात रंगीबेरंगी टुमदार घरं आणि त्यांच्या सभोवती नारळाच्या झाडांची दाटी. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कुठल्याही गावात असतं तसं शांत, सुस्त वातावरण पय्योळीतून जाणाऱ्या महामार्गावरही जाणवत राहतं.

उषा यांचंच नाव दिलेला एक रस्ता तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत घेऊन जातो. हे पी. टी. उषा यांचं घरंच नाही, तर त्यांचं यश आणि आठवणींचं माहेरघरही आहे. तिथला कलात्मक साधेपणा उषा यांच्या विनम्र स्वभावाशी मिळता-जुळता असाच आहे.

उषा यांचे पती व्ही श्रीनिवासन आम्हाला घर दाखवतात. मुख्य दरवाज्यातून मोठ्या दिवाणखान्यात आलं, की एका बाजूला उषा यांनी मिळवलेली पदकं आणि ट्रॉफी ठेवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला जिन्याच्या भिंतीवर जुने फोटोग्राफ्स लावले आहेत. त्यात उषासोबत दिसतात पंतप्रधान, नोबेल विजेते, इतर खेळांतले महानतम खेळाडू. दोन्ही भिंतींच्या मधे, समोरच्या भिंतीवर आहे उषा यांना ऑलिंपिक समितीकडून 1984 साली चौथ्या स्थानासाठी मिळालेलं प्रशस्तीपत्रक, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री. आणि ज्या दरवाजातून तुम्ही आत येता, त्याच दरवाज्या बरोबर वरती उषा यांचा नांबियार सरांसोबतचा फोटो लावला आहे.

फोटो स्रोत, P T Usha

फोटो कॅप्शन,

पी टी उषा आणि त्यांचे पती व्ही श्रीनिवासन

"तुम्ही आता येता, तेव्हा हे सगळं यश पाहायला मिळतं. आणि बाहेर पडता, तेव्हा दिसतं की हे सगळ या माणसामुळं शक्य झालं," श्रीनिवासन आम्हाला सांगतात.

पण नांबियार सरांइतकाच श्रीनिवासन यांचाही उषा यांच्या कारकीर्दीला नवं वळण देण्यात महत्त्वाचा वाटा आहे. 1991 साली दोघांचं लग्न झालं, तेव्हा उषा यांनी अॅथलेटिक्समधून विश्रांती घेतली आणि लवकरच त्यांच्या मुलाचाही जन्म झाला.

"श्रीनिवासन यांना खेळात रस आहे, आणि ते स्वतः एक खेळाडूही होते. ते आधी कबड्डी खेळायचे. मी जे काही करते, त्यात त्यांचा मला पाठिंबा असतो. मी चांगली कामगिरी करावी असं त्यांना वाटायचं, त्यांच्यामुळेच मी पुनरागमन करू शकले."

उषा अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवर परतल्या. 1997 साली निवृत्ती स्वीकारेपर्यंत त्यांच्या खात्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर 103 पदकं जमा झाली होती.

आता उषा आपल्या अॅकॅडमीत युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्यातून ऑलिम्पिक पदक विजेती घडवण्याचा प्रयत्न करतायत.

ऑलिंपिक पदकाचं अधुरं स्वप्न

कोझीकोडमधल्या किनालूर गावात, टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेलं 'उषा स्कूल ऑफ अॅथलेटिक्स' हे युवा अॅथलीट्ससाठीचं एक अद्ययावत प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आलं आहे.

ही शाळा सुरू करणं हे उषा यांचं स्वप्न होतं. एकप्रकारे ज्या खेळानं त्यांना सर्वस्व दिलं, त्याचे पांग फेडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. लंडनमध्ये त्या सरावासाठी जायच्या, तिथल्या सुविधा पाहून त्यांना भारतातही असं प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कल्पना सुचली.

फोटो स्रोत, P T Usha

फोटो कॅप्शन,

पी टी उषा आणि त्यांचे पती व्ही श्रीनिवासन

उषा आणि त्यांचे पती श्रीनिवासन इथे खेळाडूंच्या प्रगतीवर बारकाईनं लक्ष ठेवतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात. इथले खेळाडू निसर्गाच्या सान्निध्यात सिंथेटिक ट्रॅकवर आणि कधीकधी समुद्रकिनारीही सराव करतात.

"आमचं लक्ष्य आहे ऑलिम्पिक पदकाचं. आम्ही इथे सराव करू लागलो आणि काही खेळाडूंनी आशियाई स्तरावर यश मिळवलं, टिंटू लुका ऑलिंपिकमध्ये अकरावी आली," आपल्या अॅकॅडमीतील खेळाडूंविषयी उषा सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Piyush Nagpal/Kashif Siddiqui

भारतातल्या बाकीच्या महिलांसाठी त्या हाच संदेश देतात:

"1980च्या दशकात जर मी ऑलिम्पिक पदकाच्या एवढी जवळ पोहोचले आणि 103 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकू शकले, तेही कुठल्या सुविधांशिवाय, तर प्रत्येकात ती क्षमता आहे. कदाचित त्यांना खूप अडथळे पार करावे लागतील. खेळात असो, वा अभ्यासात वा आणखी कुठे. त्यांनी सुविधांचाही वाट पाहता काम नये. जिंकला नाहीत तरी काही हरकत नाही, निराश होऊ नये. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावे. शंभर टक्के त्या यशस्वी होतील."

"मंत्र एकच आहे, कठोर मेहनत. महिलांसाठी काहीही अशक्य नाही, यात शंका नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)