पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण आढळले : #5मोठ्याबातम्या

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पुण्यात आढळले कोरोना व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण

कोरोना व्हायरसची लागण झालेले 2 रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. दुबईहून पुण्यात आलेल्या 2 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

या रुग्णांवर नायडू हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे.

होळी, धुळवड, यात्रा यांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, होळीचा सण कुटुंबासोबतच साजरा करा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केलं आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

2. जम्मू काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची सूटका करा

काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची सूटका करा अशी मागणी काही ज्येष्ठ नेत्यांनी सरकारकडे केली आहे.

या मागणीचे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, जनता दल सेक्युलरचे एच. डी. देवेगौडा, सीताराम येचुरी, डी. राजा, यशवंत सिन्हा यांनी काढलं आहे.

काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. 'हे नेते सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचवतील असा त्यांचा कोणताही इतिहास नाही, विशेष म्हणजे या तिन्ही नेत्यांबरोबर भाजपने आघाडी केली होती,' असं या पत्रकात म्हटलं आहे. पुणे मिररने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे सोमवारी पुण्यामध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, कन्या असा परिवार आहे.

अनंत दीक्षित गेली चार दशके पत्रकारितेमध्ये कार्यरत होते. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीचे ते संपादक होते. दीक्षित यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झालं.

पत्रकारितेची सुरुवात त्यांनी पुण्यातून केली. एखाद्या विषयाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण तसंच शैलीदार वक्तृत्व हे त्यांचे विशेष गुण होते. कोल्हापूर आणि कोल्हापुरातील माणसांशी त्यांची जुळलेली नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहे. सकाळने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

4. महाविकास आघाडीला राज्यपालांचा आदेश

राज्यातील सिंचन प्रकल्पांना लागणारा भरमसाठ निधी, साधनांची कमतरता आणि राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार लक्षात घेता आता चालू प्रकल्प निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी पुरेसा निधी मिळेपर्यंत कोणत्याही नव्या प्रकल्पांचे काम हाती घेऊ नये, असा स्पष्ट आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्यात सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारने भर द्यावा, ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरेसा अतिरिक्त निधी मिळत नाही तोपर्यंत नवाप्रकल्प हाती घेऊ नये, असं राज्यपालांनी सांगितलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

5. अजितदादा मुख्यमंत्रीच वाटतात- चंद्रकांत पाटील

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रेमळ आहेत. ते डायनॅमिक लिडर आहेत. ते उपमुख्यमंत्री आहेत पण मुख्यमंत्रीच वाटतात. अशा शब्दांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांची स्तुती केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यात बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अजित पवार चेहऱ्याने रागीट वाटतात, पण ते प्रेमळ आहेत. दादा तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची गरज पडत नसेल, कारण तुम्हीच मुख्यमंत्री वाटता, असं ते म्हणाले. पोलीसनामाने ही बातमी प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)