पुण्यातील पाच कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर, प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय

कोरोना व्हायरस, आरोग्य, पुणे, दुबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्यासह महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर गेली होती. या रुग्णांना पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुण्यामध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त सी व्यंकटेशम, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी (11 मार्च) संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

पुण्यातील पाचही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना व्हायरसचा प्रसार इतर विषाणूंच्या् तुलनेत अधिक होत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

नागरिकांनी घाबरुन न जाता वैयक्तिकपणे स्वच्छता राखण्यावर भर द्यावा, असं विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं, "कोरोनाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता बाळगणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे."

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी मास्कचा पुरेसा पुरवठा करण्यात आला असल्याचंही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितलं.

"कोरोनाबाबत सर्व खाजगी रुग्णालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसंच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. आवश्यकता असेल तरच प्रवास करा," अशी सूचना पण त्यांनी आवर्जून केली.

कोरोना व्हायरसग्रस्त विलगीकरण कक्षात

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांना तातडीने रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे, असंही डॉ. म्हैसेकरांनी सांगितलं.

डॉ. म्हैसेकर यांनी पुढे सांगितलं, "कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती मिळविण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल."

फोटो स्रोत, Maharashtra DGIPR

फोटो कॅप्शन,

सुविधेबाबत माहिती घेताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

"कोरोनाबाबतच्या जाणीव जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे व बसस्थानक या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे," अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी राम यांनी विलगीकरणा कक्षातील व्यवस्थेबाबत सांगितलं.

"नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण २१ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. सर्व मिळून २०७ बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

"विविध विलगीकरण कक्षांमध्ये 200 बेडस् उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, याबाबत शासनस्तरावरून आवश्यकता भासल्यास निर्णय घेण्यात येणार आहे," असं राम म्हणाले.

पुण्यातील दोन प्रवासी काल कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली होती.

दुबई प्रवासानंतर लागण

हे दोन्ही रुग्ण दुबईला एका ग्रुपसोबत फिरायला गेले होते. त्यांना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर या ग्रुपमधील महाराष्ट्रातल्या इतर नागरिकांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

काही वेळापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांची मुलगी आणि त्यांना घेऊन आलेला वाहनचालक यांची चाचणी घेण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे.

डॉ.म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पुण्याच्या नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मेट्रो शहरांमध्ये अनेक ठिकाणी अशी चाचणी घेण्यात येत आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

महत्वाचं म्हणजे रुग्णाच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे नमुनेही आता तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. शिवाय, दोन्ही कोरोना बाधित रुग्णांनी मुंबई विमानतळाहून पुण्याला टॅक्सीने प्रवास केला होता. त्या टॅक्सी चालकालाही तपासणीसाठी दाखल करुन घेण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. तसंच हे दोन्ही रुग्ण ज्यांच्या संपर्कात आले अशा सर्व व्यक्तींची माहिती आयुक्तालय कार्यालयाने प्राप्त केली असून त्यांच्यावर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे.'

दोन्ही रुग्ण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 40 जणांच्या समूहासोबत दुबईत फिरण्यासाठी गेले होते. 1 मार्चला दुबईहून परतल्यानंतर लक्षणे आढळल्याने त्यापैकी एकाने 8 मार्चला तपासणी करुन घेतली ज्यात त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं निदर्शनास आलं. दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आलं नसल्याचे डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिलं आहे.

ते 35 जणही महाराष्ट्राचे

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, 'एकूण 40 जण दुबई येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी पुण्यातील दोघांना कोरोनोची लागण झाल्याचे स्पष्ट झालंय. तर उर्वरित 38 जणांपैकी 35 जण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील असून तीन कर्नाटक येथील रहिवासी आहेत. संबंधित जिल्ह्यातील प्रशासनलाही याची माहिती दिली असून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे".

पुणे प्रशासन सज्ज

पुणे प्रशासनाकडून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सॅनिटायझर

या पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात एकूण २१ ठिकाणी २०७ बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसंच विलगीकरण कक्षा सहित तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत.

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)