कोरोना व्हायरस: तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

कोरोना व्हायरसचे तुमचे काही प्रश्न आहेत? Image copyright ANI
प्रतिमा मथळा कोरोना व्हायरसचे तुमचे काही प्रश्न आहेत?

कोरोना व्हायरस आता अगदी तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. अर्थात, एकदम घाबरुन जाण्याचं कारण नाही, पण दक्षता घ्यायला हवी. कारण आता पुण्यानंतर मुंबईतही 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये मृतांचा आकडा सध्या 3,800 वर पोहोचला आहे. त्यामुळे आता आपण खरंच सतर्क राहण्याची गरज आहे.

पण काळजी घ्यायची म्हणजे काय? काय खायचं -प्यायचं? जिममध्ये जायचं की नाही असे अनेक महत्त्वाचे आणि प्रॅक्टिकल प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्या प्रश्नांची थेट उत्तरं देण्याचा हा प्रयत्न.

1. कोरोना पुण्यात कसा पोहोचला?

चीनमधल्या वुहानमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला. तिथून ज्या ज्या लोकांनी जगभरात प्रवास केला, त्यांच्याबरोबर तो त्या देशांमध्ये आधी आला. या विषाणू संसर्गाची लक्षणं ठळकपणे समोर येईपर्यंत लोकांचा जगभरात प्रवास सुरू होताच. त्यामुळे आता 100 देशांमध्ये ही साथ पसरलीये.

पुण्यात सर्वांत आधी जे दोन पेशंट पॉझिटिव्ह आढळले, ते एक जोडपं असून नुकतेच ते दुबईला एका ग्रुपसोबत फिरायला गेले होते. आता त्यांची मुलगीसुद्धा पॉझिटिव्ह आढळली आहे.

ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील एक सहप्रवासी, असे एकूण पाच पेशंट आतापर्यंत पुण्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मात्र हे ज्यांच्यासोबत दुबईला गेले होते तो 40 जणांचा ग्रुप होता. त्यामुळे त्या ग्रुपमधल्या इतरांचं काय, ते कुठे आहेत, हा प्रश्न कायम आहे. त्या सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

2. कोणत्या देशातील प्रवाशांची होणार कसून तपासणी

भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चीन, हाँगकाँग, साऊथ कोरिया, जपान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, इराण, इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून आलेल्या लोकांना 14 दिवसांसाठी अलिप्त ठेवून quarantine केलं जाणार आहे.

अनेक देशांमधून येणाऱ्या लोकांचे व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत.

पुण्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव झालेलं कुटुंब दुबईला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गेलं होतं. मात्र तोपर्यंत दुबई किंवा UAE मध्ये एकही पेशंट आढळला नव्हता. त्यामुळे 1 मार्चला ते भारतात परत आले तेव्हा एअरपोर्टवर तपासणी केल्यानंतर त्यांना वेगळं करण्यात आलं नाही, असं पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले.

3. प्रवास करणं धोकादायक आहे?

कोरोना विषाणू बाधित लोकांच्या खोकल्यातून-शिंकेतून हा व्हायरस हवेत पसरतो. तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात तर साहजिकच तुम्हाला त्याची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बस, मेट्रो किंवा लोकलच्या गर्दीतून प्रवास करणं टाळलेलंच बरं. घरून काम करण्याचा पर्याय असेल तर त्याचा नक्की विचार करा.

Image copyright Getty Images

अनेक जण असंही म्हणतात, की विमान प्रवासात या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कारण तीच हवा विमानात सतत फिरत असते.

पण या निष्कर्षात काहीही तथ्यं नाहीये. कारण विमानातील हवा सतत फिल्टर होत असते. त्यामुळे संसर्गाची शक्यता कमी असते. लोकल किंवा मेट्रोपेक्षा तर विमानप्रवासात नक्कीच कमी जोखीम असते.

मात्र तरीही तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी बेत आखत असाल तर थोडं थांबा. कोरोना पुढे काय रूप घेईल अजून स्पष्ट नाहीये. त्यामुळे कोरोनाग्रस्त भागात जाणं टाळा, म्हणजे इटली किंवा युरोपातील अन्य देशातत किंवा बँगकॉक, थायलंड, इराण या देशांत पुढचे काही महिने न गेलेलंच बरं.

4. कोरोना व्हायरसचा धोका कोणाला सर्वाधिक?

कोरोना व्हायरसचा हा स्ट्रँड अगदी नवीन असल्याने सुरुवातीला याला 'नॉवेल कोरोना' व्हायरस म्हणण्यात आलं. आता सुरू असलेल्या संशोधनातून या व्हायरसविषयीचं गूढ थोडं थोडं उकलू लागलंय.

चीनमधल्या पहिल्या 44,000 पेशंट्सचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा लक्षात आलं, की कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 2.8% पुरुष आणि 1.7% महिलांचा मृत्यू झालाय. एकूण मृतांपैकी लहान मुलं आणि तरुणांचं प्रमाण साधारण 0.2 टक्के, तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 15% लोकांचा मृत्यू झाला आहे.

काही जण म्हणत आहेत, की महिलांपेक्षा पुरुषांना याचा जास्त धोका आहे. तसं खरंही आहे, कारण दोघांच्या प्रतिकार शक्तींमध्ये फरक आहे. आणि सारं काही immunity वरच असतं ना.

चीनमधल्या एका आकडेवारीनुसार स्मोकिंगचं प्रमाण पुरुषांमध्ये 52% तर महिलांमध्ये 3% आहे. आता हा व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो म्हटल्यावर ज्याची प्रतिकारशक्ती जास्त चांगली असेल, त्याला तो हल्ला परतावून लावता येईल.

5. कोरोना व्हायरसचा गरोदर महिलांना जास्त धोका?

गर्भावस्थेत शरीरात भरपूर बदल घडत असतात. यादरम्यान रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळेच आपण संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत असतो.

Image copyright ANI

UK मधल्या अँगलिया विद्यापीठाचे प्रोफेसर पॉल हंटर सांगतात, "फक्त 9 गर्भवती महिलांच्या आकडेवारीवरून सगळं काही ठीक आहे, असं सांगणं योग्य नाही. जर माझ्या पत्नीबाबत बोलायचं झालं तर मी तिला खबरदारी घ्यायचा, हात धुवायचा आणि काळजी घ्यायचा सल्ला देईन."

आता हा कोरोना व्हायरस जरी नवीन असला तरी गर्भवती महिलांना त्यांच्याच वयाच्या इतर महिलांच्या तुलनेत फ्लूचा धोका जास्त असतो.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत आढळलेल्या केसेसपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण फक्त एक दिवसाचं बाळ होतं.

6. पाळीव प्राण्यांमुळे कोरोना होतो का?

हा रोग वुहानमधल्या एका जंगली प्राण्याचं मांस खाल्ल्यामुळे माणसांमध्ये पसरल्याचं सांगितलं जातं. पण आतापर्यंत कुठलाही पेशंट असा आढळला नाही किंवा कुठल्याही प्राण्यात असे गुण आढळले नाहीत.

त्यामुळे सध्यातरी तुम्ही किंवा तुमचे पेट्स सेफ आहेत, असं म्हणता येईल. 2003 च्या सार्सच्या साथीवेळी काही कुत्र्यामांजरांना त्या व्हायरसची लागण झाली होती, त्यामुळे ही भीती कायम आहे. मात्र तेव्हाही कोणत्याच प्राण्यातून हा रोग माणसांमध्ये आल्याचे पुरावे नाहीत.

Image copyright Getty Images

प्राण्यातून कोरोना पसरतो या भीतीमुळे कोल्हापुरात, नागपुरात चिकनचे भाव अगदी 50-60 रुपये किलोपर्यंत आले आहेत. पण व्यवस्थित शिजवून खाललेल्या चिकनपासून धोका नाही, असं डॉक्टरांनी सांगितलंय.

7. मास्क घातल्याने मी सुरक्षित राहीन?

कोणता मास्क वापरत आहात, यावर बरंच अवलंबून आहे. N95 मास्क वापरणं सर्वांत सुरक्षित आहे.

पण मास्क घातल्याने आणखी एक गोष्ट होते - सतत चेहऱ्याला हात लावण कमी होतं. ते चांगलं आहे, कारण हाताला लागलेले विषाणू नाकातोंडाजवळ जाणं धोक्याचं आहे.

N95 सोडून इतर मास्क फारसे फायद्याचे ठरत नाहीत.

8. लसूण खालल्याने बरं वाटतं का?

'लसूण आरोग्याला पोषक पदार्थ असतो. त्यामध्ये सूक्ष्म विषाणूंचा प्रतिकार करण्याचे गुण काही प्रमाणात असतात. त्यामुळे तो कोरोना व्हायरसचा हल्ला परतावून लावू शकतो,' अशा आशयाचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

Image copyright ANI

पण लसूण खाल्ल्याने कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळत असल्याचा कोणताही पुरावा नाही. लवंग खाल्ल्यानं, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं किंवा नाकाखाली तीळ ठेवल्यानं कोरोनापासून बचाव होऊ शकतो याचा पुरावा मिळत नाही.

कुठल्याही घरगुती उपायांमुळे कोरोना व्हायरस बरा होतो, असं काहीही कुठेही वाचलं, ऐकलं तर कृपया विश्वास ठेवू नका. कारण तसं शक्य असतं तर दररोज शेकडो लोकांचे जीव वाचले असते.

9. विमा कंपन्या इलाजाचा खर्च देणार?

तुम्हाला या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, असा संशय तुमच्या डॉक्टरांना आला तर ते थेट तुम्हाला सरकारी दवाखान्यात पाठवतील. तिथे राहण्याचा आणि उपचाराचा खर्च सरकार करतं.

सध्या कोरोनावर रामबाण इलाज नसला तरी मृत्यूचं प्रमाण 1 ते 3 टक्क्यांपर्यंत आहे, म्हणजे शंभरातले 97-98 लोक बरे होऊन घरी परततात. त्यांचाही सर्व खर्च सरकार करतं.

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचे CEO मयांक बथवाल यांनी सांगितलं, की आमचे सध्या सर्व इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आणि हेल्थ इन्डेम्निटी रिइंबर्समेंट प्रॉडक्ट्स कोरोना व्हायरस कव्हर करतात. त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जरी भरती करावं लागलं तरी ते कव्हर होतं.

पण जर भरती केलं नाही तर मात्र तुम्ही केलेला खर्च कव्हर होणार नाही.

IRDAI ही विमा कंपन्यांची नियंत्रक संस्था आहे. त्यांनी सर्व विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत, की या आजाराला कव्हर करण्यात यावं.

10. नोटांना हात लावल्यामुळे संसर्ग?

आपल्याकडे नोटा किती मळक्या असतात आणि आपण त्या कशा हाताळतो, हे आपल्यालाही माहितीये. त्यांच्याद्वारे आजार सहज पसरू शकतात.

चीन सरकारने सध्या त्यांच्या बँकांना सर्व नोटा sterilise करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हीही शक्यतो कॅशलेस व्यवहार करा आणि कार्ड्स किंवा नोटा वापरल्यानंतर लगेच हात स्वच्छ करा.

11. काळजी कशी घ्यायची ?

सध्या तरी डॉक्टर सांगत असल्याप्रमाणे हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि खोकताना-शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा. महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळा.

तुम्हाला सर्दी-खोकला-ताप असेल तर काळजी घ्या, त्वरीत डॉक्टरांना दाखवा आणि आवश्यक ती औषधं घ्या.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड–19 रोगाविषयी सारंकाही?

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)