कोरोनाफोबियाः तुम्हालाही वाटतंय का आपल्याला इन्फेक्शन झालंय, मग हे वाचाच

कोरोना व्हायरस Image copyright Getty Images

अकराव्यांदा मला थर्मामीटरने 37.5 डिग्री सेल्सिअस तापमान दाखवलं आणि मी स्वतःला सांगितलं, याचा नक्कीच आपल्याला ताप नाहीये. 5 दिवसांपूर्वी आंतररराष्ट्रीय प्रवास करून आल्यानंतर मला हा नवा छंद लागलाय.

मी होम आयसोलेशनमध्ये आहे, माझ्या आसपास शब्दशः कोणी माणूस नाहीये, तसं माझं बरं चाललंय, पण रोज उठल्या-उठल्या मला कोव्हिड-19 चं एकतरी लक्षण माझ्यात आहे असं वाटतं. वाटतं यासाठी म्हणतेय की दिवस चालू होतो तसं ते लक्षणही गायब होतं.

तीन दिवस मला रोज वाटलं की मला ताप आलाय का? सुदैवाने ते तपासायची सोय होती,मी चेक केलं तर नॉर्मल. मग मला वाटलं आपल्याला खोकला येतोय, पण तो कदाचित धुळीमुळे आलेला ठसका होता.

अचानक वाटायचं आपलं डोक दुखतंय, मग वाटायचं विकनेस आलाय, पण यातलं काहीच दोन तासांच्या वर टिकायचं नाही. रात्री झोपताना पण तेच विचार यायचे. सततच्या कानावर पडणाऱ्या बातम्या आणि आपण केलेला आंतरराष्ट्रीय प्रवास यामुळे अस्वस्थता वाढली होती.

मी आले त्याच दरम्यान यूकेहून आलेल्या एका सहकाऱ्याशी बोलले, त्यालाही असंच होत होतं. त्याला रोज वाटायचं आपला घसा खवखवतो आहे. पण तसं नसायचं.

जसंजसं लोकांशी बोलायला लागले तसं तसं कळालं की मी एकटी नाहीये, आपल्यात कोरोना व्हायरसची लक्षणं नक्कीच दिसताहेत असं अनेकांना वाटत होतं. काही जणांना खात्री होती की त्यांना इन्फेक्शन झालंय.

एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की त्यांनी कोरोना व्हायरसची टेस्ट करून घेतली. त्यांना काही झालं नव्हतं. पण तरीदेखील त्यांना रोज बारीक ताप यायचा. पण टेस्टनंतर कळालं की त्यांच्या आरोग्यात काहीही बिघाड झालेला नाही, त्यांना साधा सर्दी खोकलाही नाही आणि गंमत म्हणजे एकदा टेस्टचा निकाल आल्यानंतर पुढे त्यांना ताप आला नाही.

हे असं का होतं?

आपल्याला नक्कीच एखादा रोग झालाय असं का वाटतं, जेव्हा प्रत्यक्षात तो झालेला नसतोच. यालाच मेडिकल टर्ममध्ये सायकोसमॅटिक सिम्प्टम असं म्हणतात.

लंडनच्या रॉयल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ सुझन ओ'सलिव्हन यांनी बीबीसीच्या डेव्हिड रॉबिसन यांच्याशी बोलताना सांगितलं, "अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती खोटं बोलत नसते. त्यांच्या शरीरात खरंच ती लक्षणं आढळून येत असतात, फक्त त्यांना कोणताही आजार झालेला नसतो."

Image copyright Getty Images

मग प्रश्न असा आहे की जर अशा लोकांना कोणाताही आजार झालेला नसतो तर त्यांच्या शरीरात ही लक्षणं कशी आढळून येतात?

"अनेकदा आपल्या सबकॉन्शस मनात काही गोष्टी घर करून असतात. त्यांचा प्रभाव इतका तीव्र असतो की, त्यामुळे आपल्या शरीराला काहीही आजार नसला तरी त्याची लक्षणं दिसतात.मनातली अस्वस्थता, अँग्झायटी, मानसिक दडपण किंवा फोबिया अशा गोष्टींमुळे हे घडू शकतं," सुझन सांगतात.

ही अगदी सहज मानसिक प्रक्रिया आहे. आपल्या भावना आपल्या शारिरीक अवस्थेवर खूप मोठा परिणाम करतात. याचं उदाहरण देताना सुझन म्हणतात, विचार करा तुम्हाला अतिशय संताप आलाय, त्यावर तुमच्या शरीराची काय प्रतिक्रिया असते? - तुम्ही थरथर कापायला लागता,तीच गोष्ट भीतीची. खूप दुःख झालं असेल तर शरीराला थकवा जाणवतो,आपल्यात पलंगावरून उठण्याची पण ताकद नसते, किंवा एखाद्याला फुड पॉयझनिंग झालं असं कळालं तर आपली अन्नावरून वासना उडते.

"ही सगळी कुठल्या ना कुठल्या रोगाची लक्षणं आहेत पण ते आजार तुम्हाला झालेले नसतात. आपल्या फॅमिली डॉक्टरकडे साध्या आजाराची तक्रार घेऊन जाणाऱ्या 30 टक्के लोकांना कुठलेही आजार झालेले नसतात, पण काही कारणावश त्यांना त्याची लक्षण जाणवू शकतात. डॉक्टरांना त्या लक्षणांचं निदान करता येत नाही,"त्या विशद करतात.

एरवी अशा गोष्टी डॉक्टरांकडे एखादी चक्कर मारल्यावर किंवा मानसिक परिस्थिती सुधारल्यावर बऱ्या होतात. काही केसेस जास्त गुंतागुंतीच्या आणि जटील असतात तेव्हा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेता येते. पण या अशा केसेस व्यक्ती केंद्रित असतात.

पण संपूर्ण समाजालाच एखादा आजार भेडसावत असेल आणि त्याची भीती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मनात घर करून बसली असेल तर अशा केसेस प्रमाण नक्कीच वाढू शकतं.

कोरोना व्हायरसच्या बाबतीत हे शक्य आहे ?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नसला तरी लोकांना आपल्या शरीरात त्याची लक्षणं दिसू शकतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत टेस्ट करण्यासाठी लोकांचा रेटा वाढेल, त्याला हाताळायला आपली आरोग्य व्यवस्था सक्षम आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ञांशी बोललो.

डॉ अविनाश भोंडवे इंडियन मेडिकल असोसिएशन,महाराष्ट्रचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात, "लोकांना आता कोरोनाफोबिया झालाय हे दिसून येतंय. म्हणजे काय तर एखाद्या आजाराची भीती बसणं आणि आपल्याला तोच झालाय असं सतत वाटतं राहणं.

उदाहरणार्थ कार्डिएक फोबिया. यात एखाद्या व्यक्तीला सतत वाटतं की आपल्या छातीत दुखतंय म्हणजे आपल्याला हार्टअॅटक आलाय. आणि असं त्यांना एकदा नाही,दोनदा नाही, सतत वाटतं. अशीच काहीशी परिस्थिती आता कोरोना व्हायरसमुळे उद्भवली आहे."

अशा पेशंटना वाटतं की त्यांना त्रास होतोय, पण प्रत्यक्षात त्यांना काहीही झालेलं नसतं. "आता सर्दी झाले म्हणून आमच्याकडे धावत येणारे अनेक लोक आहेत. एरवी सर्दी, किंवा जराशी डोकेदुखी झाली तर त्याकडे कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. आजकाल किरकोळ ताप आला,किंवा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय असं वाटलं तरी लोक धास्ती घेतात. प्रत्यक्षात त्यांना विशेष काही झालेलं नसतं."

अनेक पेशंटला समजावून सांगणंही अवघड असल्याचं डॉ भोंडवे मान्य करतात. एका डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नाहीये, तरी ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात आणि दुसऱ्याने सांगितलं तर तिसऱ्याकडे. अशा लोकांचं सतत काऊन्सिलिंग करणं सध्यातरी हा एकमेव उपाय असल्याचं ते मान्य करतात.

"कोणाच्या टेस्ट करण्यात याव्या आणि कोणाच्या नाही याबद्दल अजूनही सरकारच्या कडक गाईडलाईन्स आहेत. तुम्ही त्या गाईडलाईनमध्ये बसत नसाल आणि कोरोना व्हायरसची टेस्ट करायला गेलात तर ती होणार नाही, कारण आपल्याकडे सध्या लिमिटेड किट्स आहेत.

यावर उपाय म्हणजे ज्या पेशंटला काही झालेलं नाही त्यांचं काऊन्सिलिंग करणं, त्यांना समजावून सांगणं आणि दुसरं म्हणजे टेस्ट किट्सची संख्या वाढवणं. म्हणजे लोकांच्या मनातली भीती कमी होईल. पण दुसरीकडे हेही लक्षात घ्यायला हवं की कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच संक्रमण झालेल्या पेशंटची संख्या वाढत जाईल,त्यामुळे टेस्ट किट्स जरी वाढले तरी त्यांचा वापर विचारपूर्वकच करावा लागेल."

खरंतर याचा एक सोपा उपाय आपल्या हातात आहे. आयसोलेशन,आणि घराबाहेर न पडणं. त्याबरोबर आपल्या शरीराकडे लक्ष देणं. मी अगदी सोपा उपाय करणार आहे,मला भीती वाटते की मला सर्दी होईल किंवा घसा खवखवेल, तर ते होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेणार. हात स्वच्छ धुण्यापासून, गरम पाण्याने गुळण्या करणं, थंड पाणी न पिणं किंवा अगदी अजून 21 वेळा ताप आलाय का ते पाहाणं. नुकसान काहीच नाही यात. उलट फोबिया झाला असेल तर तोच बरा होईल. बाकी कोरोना व्हायरसची लक्षणं एव्हाना तुम्हालाही पाठ झालीच असतील!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)