कोरोना व्हायरस : पुण्याच्या मायलॅबने शोधलं कोव्हिड-19चं निदान करणारं किट

कोरोना Image copyright ANI

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर अख्ख्या भारतावरही लॉकडाऊनची वेळ आणली आहे.

आता देशात उपलब्ध असलेल्या आरोग्यसुविधा, डॉक्टरांची संख्या अशा अनेक गोष्टींवर चर्चा घडत आहे. त्यातच असेही आरोप होत आहेत की भारतात सध्या कोव्हिड-19च्या पुरेशा चाचण्या होत नाही आहेत.

या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, पुण्याच्या एका कंपनीने कोव्हिड-19 रोगाची चाचणी करणारं किट भारतात तयार केलं आहे.

शैलेंद्र कवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी Mylab या त्यांच्या कंपनीत तयार केलेल्या या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता मिळाली आहे. यामुळे कोव्हिड-19ची चाचणी वेगवान पद्धतीने होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.

या किटच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने शैलेंद्र कवाडे यांच्याशी संवाद साधला.

अनुभवाचा फायदा

या किटच्या निर्मितीबदद्ल बोलताना कवाडे म्हणतात, "जेव्हा कोरोनाची साथ पसरणार याचा आम्हाला अंदाज आला तेव्हा आम्ही खरं सांगायचं तर सुरुवातीला फारसं लक्ष दिलं नाही. कारण प्रत्येक देशात स्थानिक पातळीवर काही साथी असतात. पण जेव्हा युरोपमध्ये ही साथ पसरली तेव्हा मात्र आम्ही सतर्क झालो, तेव्हा मात्र आम्हाला वाटलं की किट तयार करण्याची हीच खरी वेळ आहे.

Image copyright Mylab

MyLabने यापूर्वीही विविध विषाणूंपासून होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी काही किट तयार केले होते. तो अनुभव गाठीशी होता, असं ते सांगतात.

"सध्या भारतात अनेक संशोधन केंद्रात असे किट तयार केले जातात, ज्यात फक्त सत्तर टक्के चाचण्या यशस्वी होतात. ICMR कधीही अशा किटला परवानगी देत नाही. त्यामुळे 100 टक्के यशस्वी किट तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं," ते सांगतात.

Image copyright Shailendra Kawade

कवाडेंच्या टीमने अवघ्या सहा आठवड्यांमध्ये हे किट तयार केलं. "आम्ही कोरोना विषाणूच्या सिंथेटिक डीएनएचा वापर केला, कारण रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची आम्हाला परवानगी नव्हती.

"सिंथेटिक डीएनएची चाचणी आम्ही NIV (National Institute of Virology, Pune) आणि मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात केली. तिथे 100 नमुने तपासून पाहिले. तिथे त्या चाचण्या 100 टक्के यशस्वी झाल्या. त्यानंतर त्यांनी आणखी किट मागवले. त्या कसोटीत आम्ही कमालीचे यशस्वी झालो," असं ते सांगतात. या किटमुळे अडीच तासात निदान होतं.

सध्या लॉकडाऊनमुळे भारताच्या बाहेरून येणाऱ्या किटला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे MyLabच्या या किटला मोठी मागणी आहे, असंही कवाडेंनी सांगितलं.

सध्या हे किट पूर्ण भारतात पोहोचवण्याचा MyLabचा प्रयत्न आहे. पण मंगळवारीच्या मध्यरात्रीपासून देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीला अडचणी येत आहेत. मात्र शासनाने त्यांना वाहतुकीसाठी विशेष परवाना दिला आहे.

या किटची किंमत किती, हे कवाडे यांनी सांगितलं नाही, मात्र एखाद्या परदेशी किटपेक्षा ती 60-70 टक्क्यांनी स्वस्त असेल, असा त्यांचा दावा आहे.

MyLabचा प्रवास

पुण्याजवळच्या लोणावळ्यात MyLab ही कंपनी आहे. इथे काम करणारे 55 लोकही कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पुरेशी काळजी घेत असल्याचं कवाडे सांगतात.

कंपनीविषयी माहिती देताना शैलेंद्र कवाडे सांगतात, "आमचा प्रवास सहा ते सात वर्षांपूर्वी सुरू झाला. आम्ही सहा ते सात जण फार्मा कंपनीत होतो. नंतर आम्ही निर्णय घेतला एखादी अशी निर्मिती करायची जी स्वत:साठी आणि समाजासाठीही उपयुक्त असेल.

Image copyright ANI

"पहिल्यांदा आम्ही MyLab Discovery Solutions ही कंपनी सुरू केली. त्यात आम्ही बायलॉजिकल किट्सचं संशोधन करायचो. त्यात आम्ही NAC हे पहिलं आमचं उत्पादन आणलं. विषाणूंद्वारे जे रोग पसरतात त्याची चाचणी करणारे हे किट आम्ही तयार केले."

शैलेंद्र सांगतात की रक्तदानादरम्यान पसरणाऱ्या रोगांची संख्या भारतात मोठी आहे. त्यावर त्यांनी एक किट तयार केलं होतं, त्यामुळे अशा प्रकारच्या किट तयार करण्याचा अनुभव त्यांच्या कंपनीला होता.

सध्या MyLabची टीम या किटचं उत्पादन वाढवण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे कोव्हिडच्या साथीशी लढण्यात मदत होईल, अशी आशा सर्वांना आहे.

हे नक्की वाचा

हे आवर्जून पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)