कोरोना व्हायरसः राजेश टोपे यांचा आमदार ते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हा प्रवास

राजेश टोपे Image copyright Getty Images

आपल्यापासून अजून हे संकट दूरच आहे, असं वाटत असताना महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. दिवसागणिक राज्यातल्या प्रत्येक शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारनं तातडीच्या उपाययोजना करायला सुरुवात केली.

टप्प्याटप्यानं महाराष्ट्रात बंद होत होता…अर्थात, सरकारच्या या निर्णयांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू नये, कोणताही चुकीचा संदेश पोहोचणार नाही, हे पाहणंही गरजेचं होतं… ही पुरेपूर खबरदारी घेतली राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी.

गेले पंधरा दिवस दिवसातून किमान एकदा तरी माध्यमांसमोर येत राजेश टोपे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, याची माहिती देत आहेत. काळजी घेण्याची गरज आहे, पण घाबरून जाऊ नका…आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे वारंवार सांगून जनतेला आश्वस्त करणाऱ्या राजेश टोपेंच्या आई मात्र सध्या रुग्णालयामध्ये आहेत.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजेश टोपेंनी विधान परिषदेत जेव्हा कोरोनाबाबत पहिल्यांदा निवेदन दिलं होतं, तेव्हाच विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांचं कौतुक करताना म्हटलं होतं, की घरातली अडचण विसरून तुम्ही राज्यासाठी झटत आहात.

आरोग्य विभागाच्या बैठका, मंत्रिमंडळाच्या बैठका, विमानतळं, टेस्टिंग सेंटर, हॉस्पिटल्सना भेटी या सगळ्यातून वेळ काढून राजेश टोपे अगदी थोडा वेळ आपल्या आईला भेटायला रुग्णालयात जातात. दिवसभरातील तेवढी काही मिनिटंच त्यांना त्यांच्या खासगी आयुष्यासाठी मिळत असावीत…

यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, मुलाखतीत त्यांना त्याबद्दल प्रश्नही विचारले गेले, पण अगदी मोजक्या शब्दात त्याचं उत्तर देऊन टोपेंनी विषय कोरोना आणि राज्य सरकार त्याचा संसर्ग रोखण्यासाठी काय करत आहेत याकडे वळवला.

टोपेंच्या याच अटिट्यूडचं आणि मुद्देसूद, आकडेवारीच्या आधारे माहिती देण्याचं, त्यांच्या कामाच्या शैलीचं सोशल मीडियावर कौतुक व्हायला लागलं.

त्यानिमित्तानं काही जणांनी राजेश टोपेंची सामाजिक बांधिलकी जपण्यासंबंधीच्या काही आठवणींनाही उजाळा दिला. राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघात घरांवर मुलींच्या नावांच्या पाट्या लागल्या होत्या. त्यांपैकी एक नाव होतं…दिशा राजेश टोपे. स्वतः राजेश टोपे आपल्या मुलीच्या नावाची पाटी दारावर लावत होते.

खरंतर राजेश टोपे काही पहिल्यांदा मंत्री झालेले नाहीत, प्रशासनाचा त्यांचा अनुभवही मोठा आहे. पण तरीही त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये राजेश टोपे हे नाव फारसं परिचित नव्हतं.

राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार. राष्ट्रवादी म्हटलं, की राज्य पातळीवर अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे ही नावंच पटकन समोर येतात. त्यांच्या तुलनेत राजेश टोपे हे मधल्या फळीतले बॅट्समन…पण कोरोनामुळे आलेल्या या संकटात अडचणीच्या वेळी मधल्या फळीतल्या फलंदाजानं खेळपट्टीवर टिकून राहून डाव सांभाळावा असं काहीसं टोपेंच्या बाबतीत घडलं.

राजेश टोपे हे सुरुवातीची काही वर्षे राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलं. पण त्यांचं खातं उच्च आणि तंत्रशिक्षण हे होतं. या खात्याचा थेट संबंध सर्वसामान्यांशी येत नाही. कदाचित त्यामुळेच याआधी राजेश टोपे हे नाव सामान्यांपर्यंत तितक्या ठळकपणे पोहोचलं नसावं, असं मत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. पण तेव्हाही त्यांनी संघटन कौशल्य, प्रशासन कौशल्य दाखवून, अतिशय लो-प्रोफाईल राहून मंत्रि‍पदाची जबाबदारी सांभाळली होती. असंही चोरमारे यांनी म्हटलं.

राजेश टोपेंचा राजकीय प्रवास

राजेश टोपेंना राजकारणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे स्वतः खासदार होते. ते शरद पवारांच्या जवळचे समजले जायचे. जालना जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांचा विकास करण्यातही अंकुशराव टोपे यांचा महत्त्वाचा वाटा होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजेश टोपे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या टोपे यांनी वयाच्या 23 व्या वर्षी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1996 साली लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र या पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली. अंबड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले आणि त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथही घेतली. मात्र पक्षांतर्गत वादांमुळे त्यांना हे मंत्रिपद सोडावं लागलं. मार्च 2001 मध्ये पुन्हा त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आणि त्यानंतर सलगच 14 वर्षे ते मंत्रिपदावर राहिले.

2004 साली ते पुन्हा अंबड मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी नगरविकास, जलसंधारण, संसदीय कार्य, सामान्य प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं.

2009 साली राजेश टोपेंनी घनसावंगीमधून निवडणूक लढवली. कारण अंबड विधानसभा मतदारसंघ बदनापूरमध्ये विलीन झाला होता आणि घनसावंगी मतदारसंघाची निर्मिती झाली होती. त्यावेळी त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रि‍पदाचा कार्यभार सांभाळला होता.

राजेश टोपे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असताना नवीन विद्यापीठ कायदा संमत झाला होता. या कायद्यामुळे कुलगुरूंची स्वायत्तता कमी करण्यात आली होती. या निर्णयावर त्यावेळी खूप टीकाही झाली होती.

2014 साली मोदी लाटेतही टोपे निवडून आले होते. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रिपदाची जबाबदारी आली.

शरद पवारांशी एकनिष्ठ

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा राष्ट्रवादीच्या गोटातून अजित पवार यांच्यासोबत नेमकं कोण जाणार याची चर्चा सुरू होती. राजेश टोपेंकडेही सर्वांचे लक्ष होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंसोबत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेश टोपेंचीही उपस्थिती होती. तेव्हाच त्यांची भूमिका स्पष्ट झाली.

त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार हे राजेश टोपेंवर नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना मताधिक्य मिळालं नव्हतं. राजेश टोपेंचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हाही अजित पवार उपस्थित नव्हते.

Image copyright Getty Images

"थोडीफार कुरबूर होती, हे मान्य आहे. पण अजित पवारांची राजेश टोपेंवर नाराज होते, असं म्हणता येणार नाही," असं मत जालन्यातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक दुनियादारीचे कार्यकारी संपादक भारत धपाटे यांनी व्यक्त केलं. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तीन आमदार होते, त्या तिघांच्याही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कमी मतं होती. त्यामुळे केवळ राजेश टोपेंवर नाराज होण्याचा प्रश्नच नव्हता, असंही धपाटे यांनी व्यक्त केलं.

दुसरं म्हणजे राजेश टोपे हे शरद पवारांच्या अतिशय जवळचे आहेत. हे संबध त्यांच्या वडीलांपासूनचे, अंकुशराव टोपेंपासून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फार नाराज राहणंही शक्य नसल्याचंही अजित पवारांना माहीत असल्याचं धपाटे यांनी म्हटलं.

जालना जिल्ह्यातलं टोपेंचं राजकारण

राजेश टोपेंचे वडील अंकुशराव टोपे यांनी जालना जिल्ह्यात सहकारी संस्थांचं जाळं उभं केलं होतं. वडिलांनी उभारलेल्या अनेक संस्थांच्या प्रमुखपदांची जबाबदारी त्यांच्या हयातीतच राजेश टोपे यांच्याकडे आली.

अंकुशनगर इथला सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा संस्थात्मक कामांची जबाबदारी राजेश टोपेंनी सांभाळली.

या संस्थांच्या माध्यातून राजेश टोपेंनी जिल्हा आणि त्यांचा मतदारसंघ घनसावंगीमध्ये चांगला जनसंपर्क जपला आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची जनसामान्यांमधील प्रतिमा चांगली आहे, असं चोरमारे यांनी सांगितलं.

हे नक्की वाचा

हे आवर्जून पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)