पुणे : कोरोना व्हायरसमुक्त झालेल्या पहिल्या कुटुंबाची गोष्ट

औषधी Image copyright Getty Images

'आमच्यावर जी परिस्थिती आली ती येऊ नये असं वाटत असेल तर घरी बसा!'

"ते चौदा दिवस पूर्ण करून आम्ही घरी परतलो…आमच्या सोसायटीमध्ये आलो. बाल्कनीमध्ये लोकं जमा झाले होते. सोसायटीमध्ये सर्वांनी टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं. कोरोनाला हरवून आम्ही परत आलो होतो."

पुण्यातील ज्या कुटुंबाला कोरोनाची चाचणी राज्यात पहिल्यांदा पॉझिटिव्ह आली होती, त्या कुटुंबातील सदस्य आपल्या या कठीण काळाबद्दल सांगत होते.

कोरोनाची लागण झाल्याचा धक्का, तपासण्यांचं चक्र, चौदा दिवसांचं विलगीकरण आणि मग कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याचा आनंद… मानसिक-भावनिक चढउतारांचा हा काळ होता. हा सगळा प्रवास या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर मुक्त पत्रकार मयांक भागवत यांनी त्यांच्याच शब्दांमध्ये शब्दांकित केला.

(विनंतीनुसार या कुटुंबाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.)

मी, माझी पत्नी आणि मुलगी 4 फेब्रुवारीला दुबईला फिरायला गेलो होतो. माझा मुलगा आमच्यासोबत नव्हता. 29 फेब्रुवारीला आम्ही पुण्यात परतलो.

टूर छान झाली होती. आम्ही एकदम खूश होतो. पुण्यात घरी आल्यावर नेहमीचं रुटिन सुरू झालं. मी कामावर रुजू झालो. बायको आणि मुलगी त्यांच्या कामात व्यग्र झाल्या.

1 मार्चला मला थोडं बरं वाटत नव्हतं. मी डॉक्टरांकडे गेलो. अंगात थोडा ताप होता. डॉक्टरांनी औषध दिलं आणि आराम करण्यास सांगितलं. पुढचे तीन दिवस मी घरीच आराम केला.

Image copyright Getty Images

डॉक्टरांच्या औषधाने बरं वाटलं. त्यामुळे 5 मार्चला पुन्हा ऑफिसला गेलो. दुसऱ्या दिवशी अंग पुन्हा तापलं. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी म्हटलं, की पुन्हा ताप येणं चांगली गोष्ट नाही. तुम्ही दुबईहून आला आहात. कोरोनाची चाचणी करून घ्या.

अनपेक्षित धक्का

कोरोनाची चाचणी? कशासाठी? मला काहीच लक्षणं दिसत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 9 मार्चला स्वत:च पुण्याच्या नायडू रुग्णालयात पोहोचलो. डॉक्टरांनी टेस्ट केली आणि रिपोर्ट नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीला तपासणीसाठी पाठवलं.

रिपोर्ट आले. नक्कीच निगेटिव्ह असतील, असा मनात विश्वास पक्का होता. पण, डॉक्टरांच्या शब्दांनी धक्काच बसला.

तुम्हाला (COVID-19) कोरोना झालाय. डॉक्टरांचे शब्द ऐकून विश्वासच बसला नाही. काय करावं आणि काय बोलावं सुचतच नव्हतं.

मला काहीच लक्षणं नव्हती. मग हे असं का झालं असावं? मनात अनेक प्रश्न होते. पण त्याची उत्तरं शोधण्यासाठी वेळ नव्हता.

मला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यावर डॉक्टरांनी माझी पत्नी आणि मुलीला तपासणीसाठी बोलावलं. त्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह होता.

आम्हा तिघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. खरंतर विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या कोणाचा रिपोर्ट आपल्यासोबत बदलला गेला का, अशी शंका मनात आली. रिपोर्ट चुकीचा तर नाही? डॉक्टरांना विचारलं. त्यांनी सांगितलं, की एनआयव्हीमध्ये अशी चूक होणार नाही.

लोकांपर्यंत ओळख पोहोचल्यामुळे त्रास

आम्हाला पुण्यातील नायडू रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. खूप मानसिक ताण आला होता. मनातल्या मनात मी हे नक्की कशामुळे झालं असावं? याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पण, मला कोणामुळे झाला याची माहितीच नव्हती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कोरोना

नातेवाईक, जवळचे मित्र कोणालाच काही कळवलं नव्हतं. पण, एके दिवशी आमचं नाव आणि फोननंबरसह एक लिस्ट लीक झाली. लोकांचे काळजीपोटी एका पाठोपाठ एक फोन सुरू झाले. तेव्हा खूप वाईट वाटलं. लोकांपर्यंत आमची ओळख जाणं चुकीचं होतं.

डॉक्टरांनी आमच्या संपर्कात आलेल्या अनेकांची तपासणी केली. पण, सुदैवाने कोणाचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही. आपल्यामुळे हा आजार इतरांना झाला नाही, हे जेव्हा कळलं तेव्हा हायसं वाटलं. खरंतर मनावरील एक मोठं ओझं कमी झालं होतं.

नायडू रुग्णालयात डॉक्टरांनी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर मन हलकं झालं.

विलगीकरणाचा कठीण काळ

क्वारंटाईनचा काळ 14 दिवसांचा… 14 दिवस? पण, डॉक्टरांनी धीर दिला. पॉझिटिव्ह राहा, कोरोना बरा होतो, असं डॉक्टर वारंवार सांगत होते.

डॉक्टर म्हणायचे, की तुम्ही इथे थांबलात, तर तुमच्यापासून हा आजार लोकांमध्ये पसरणार नाही. उपचार योग्य पद्धतीने झाले पाहिजेत. कोरोना, त्याची उपचारपद्धती याबाबत डॉक्टर समजावून सांगायचे.

पाच दिवसांनंतर कोणतीही लक्षण न दिसल्यानं आम्हाला आयसोलेशनमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.

आयसोलेशन वॉर्डमध्ये आम्हाला एकमेकांशी बोलू देत नव्हते. दोन बेड्सच्यामधे काचेची भिंत होती. एकमेकांना 10 फूट अंतरावर ठेवायचे. डॉक्टर त्यांचं पूर्ण शरीर झाकून आमच्याकडे येत.

आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवलं होतं. मुलगी, पत्नी समोर असतानाही बोलू शकत नव्हतो. कधीतरी बोलायला मिळायचं…पण फक्त १-२ मिनिटं. ही खबरदारी आमच्यासाठीच घेतली जात होती हे मला माहीत होतं.

पहिले तीन दिवस आम्हाला जेवण बाहेरून मागवावं लागत होतं. पण, त्यानंतर रुग्णालयात जेवण मिळू लागलं.

24 तास एकट्यानं काय करायचं?

24 तास एकाच बंद खोलीत करायचं काय, हा प्रश्न होता. पण, आजारातून बरं व्हायचं होतं. त्यामुळे खचून जायचं नाही, असं ठरवून पुन्हा नव्याने सुरू केलं. बाहेर जायचं नाही, जास्त फिरायचं नाही. मग प्राणायाम, योग यावर भर दिला. त्याने खूप पॉझिटिव्हिटी मिळाली.

पण, दिवसभराचा प्रश्न होताच. एका मित्राने पुस्तकं आणून दिली. पुस्तकात मन रमवलं. दिवसभर वाचन आणि मग संध्याकाळी हिंदी चित्रपटाची गाणी. फोनवरून कुटुंबीय, नातेवाईक यांच्याशी बोलणं होत असे. आता, मनावर अजिबात ताण नव्हता.

आता पूर्ण बरे होऊन आम्ही घरी पोहोचलोय. पंधराव्या आणि सोळाव्या दिवशी आमची टेस्ट निगेटिव्ह आली. पुढील चौदा दिवस आम्ही कोणाच्याही संपर्कात येणार नाही. आम्ही होम क्वारंटाइन करून घेतलं आहे.

आमच्या अनुभवातून काही सांगतोय… मी जे भोगलं ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून माझं ऐका. जास्त आत्मविश्वास चांगला नाही. मला कोरोना झाल्याचं कळलंच नाही. हा आजार नकळत होणारा आहे. आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला असला तर?

त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे घरी बसा! बाहेर अजिबात जावू नका, रस्त्यावर गर्दी करू नका, गाड्या घेऊन बाहेर फिरू नका. आपल्या कुटुंबाच्या जीवाशी खेळू नका. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या.

तुमच्या एका चुकीमुळे सरकारी यंत्रणेवर प्रेशर येईल. आपण सामाजिक भान जपलं पाहिजे. आपल्यामुळे कोणालाही याचा त्रास होता कामा नये. प्रगत देशांमध्ये कडक नियम पाळले जातात. कोरोनाला सामान्यांपर्यंत पोहोचू न देणं आपलं कर्तव्य आहे.

सरकारने 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन केलाय. कशासाठी? कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी. आपल्यावर आता ही जबाबदारी आहे. आपण गांभीर्य ओळखलं पाहिजे. माझ्यावर ही पाळी आलीये, अशी कोणावरही येऊ नये. डॉक्टर आपल्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यांच्या विचार आपण केला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 21 दिवस संपतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)