कोरोना व्हायरसः पुण्यानं चीनकडून कोणता धडा घेतला आहे?

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
पुणे कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्रात मुंबईखालोखाल पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनचा परिणाम या विषाणूचा फैलाव रोखण्यात होईल अशी आशा एका बाजूला सगळे करत असतानाच दुस-या बाजूला परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर काय करायचे याची तयारी सुरु आहे.

चीनमध्ये ज्या प्रकारे कोरोनाची पहिली लाट आल्यावर जी पावलं उचलली गेली, त्या धर्तीवर पुण्यात तयारी सुरु आहे.

चीनमध्ये सुरुवातीच्या अनागोंदीनंतर शहरातल्या एकाच हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पेशंट्सवर उपचार केले गेले. प्रत्यक्षात आहे ते हॉस्पिटल केवळ कोरोना पेशंट्ससाठी आरक्षित झाले किंवा नव्यानं हॉस्पिटलची उभारणीही काही ठिकाणी झाली. त्या भागातल्या खाजगी रुग्णालयांमध्ये येणारे पॉझिटिव्ह पेशंट्स एकाच ठिकाणी पाठवले गेले.

वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, सहाय्यक अशी सगळी यंत्रणा तिथे एकत्रित करण्यात आली. पुण्यातही हेच मॉडेल अंगिकारण्याची परिस्थिती उद्भवली आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या आवारात नव्यानं उभारण्यात आलेली 11 मजली इमारत ही पूर्णपणे कोरोनाच्या पेशंट्सवर उपाय करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

800 बेड्स असलेल्या या केवळ कोरोना हॉस्पिटलमध्ये जे पॉझिटिव्ह पेशंट्स पुणे परिसरात सापडतील त्यांना या विशेष हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने मान्यता दिलेल्या या सुपरस्पेशेलिटी हॉस्पिटलचं काम आता पूर्ण झालं होतं. तीच इमारत आता कोरोनासाठीचं विशेष हॉस्पिटल असेल.

बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनीही 'बीबीसी मराठी'शी बोलतांना ही तयारी आता पूर्ण होत आली असल्याला दुजोरा दिला.

"आता या क्षणाला आम्ही या इमारतीचा 5 वा आणि 7 वा मजला तयार ठेवला आहे. 50 आय सी यू बेड्स तयार आहेत. 700 बेड्सची तयारी या इमारतीत मूळ प्लॅनप्रमाणे असणारच होती. आता ती क्षमता गरजेनुसार वाढवली जात आहे. आता संपूर्ण इमारतीत ऑक्सिजनची लाईन पोहोचवण्याचं कामही चालू आहे," डॉ. चंदनवाले म्हणाले.

31 मार्चपर्यंत ही संपूर्ण व्यवस्था तयार ठेवण्याची पहिली डेडलाईन आहे.

चीनमध्ये राबवल्या गेलेल्या या मॉडेलनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडची ही पुढची तयारी सुरु झाली आहे. केवळ पुण्यातच असं विशेष करोना हॉस्पिटल नसेल तर पिंपरी-चिंचवडमध्येही असंच एक विशेष रुग्णालय तयार करण्यात येत आहे.

"पुण्यात 800 बेड्सचं आणि पिंपरीत 600 बेड्सचं, अशी दोन हॉस्पिटल्स आम्ही केवळ कोरोनाच्या पेशंट्ससाठी करतो आहोत. खाजगी रुग्णालयांचे रिसोर्सेसही इथे एकत्र केले जातील," असं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी 'बीबीसी मराठी'शी बोलतांना सांगितलं.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला कोणत्याही खाजगी रुग्णालयात आलेला आणि ज्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, तो पेशंट या नव्या कोरोना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केला जाईल.

अनेकदा असं होतं की ज्या खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त पेशंट असेल तर इतर कोणतेही रुग्ण तिथे जात नाहीत. त्यामुळे खाजगी हॉस्पिटल्सकडूनही पेशंट नाकारण्याचे प्रकार घडतात. काही वर्षांपूर्वी स्वाईन-फ्लू च्या संसर्गाच्या काळात पुण्याने हा अनुभव घेतला आहे. या विशेष हॉस्पिटल करण्याच्या आणि सगळे पेशंट इथे आणण्याच्या निर्णयाने तसे प्रकार घडणार नाहीत असेही प्रशासनाला वाटते आहे.

या विशेष हॉस्पिटलसोबतच पुणे महापालिकेचं नायडू संसर्गजन्य रोगांचं हॉस्पिटल आणि काही खाजगी हॉस्पिटल्स मिळून 11 हॉस्पिटल्स निर्देशित केली गेली आहेत. संख्या वाढल्यास इथे इमर्जन्सी व्यवस्था उभारण्यात येतील.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

तूर्तास सर्व खाजगी रुग्णालयांना आलेले संशयित रुग्णांवर आयसोलेशनमध्ये उपचार करावे आणि त्यांची एन आय व्ही मार्फत कोरोना टेस्ट करून घ्यावी असं सांगण्यात आलं आहे. खाजगी रुग्णालयांनाही आयसोलेशन वॉर्ड्सची तयारी करण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष कोरोना हॉस्पिटलची तयारी झाल्यावर प्रश्न असेल तो वैद्यकीय स्टाफचा. त्यासाठी प्रशासन खाजगी रुग्णालयांच्या संपर्कात आहे. या खाजगी रुग्णालयातले निवडक डॉक्टर्स, सहाय्यक यांना विशेष रुग्णालयात यांना ठराविक चक्रानं पाठवण्याची विनंती करण्यात येते आहे.

या आवश्यक व्यक्तींमध्ये अतिदक्षता तज्ञ, पल्मनोलॉजिस्ट्स, डॉक्टर्स, अतिदक्षता आणि सामान्य वॉर्डमध्ये काम करणा-या नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. सोबतच जी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणं आहेत तीसुद्धा आवश्यकता पडण्यास देण्याची विनंती खाजगी हॉस्पिटल्सना करण्यात येईल. जर स्वत:हून जर या हॉस्पिटल्सनं विनंतीला प्रतिसाद दिला नाही तर जिल्हाधिकारी परिस्थितीनुसार हे कायद्यानं बंधनकारक करू शकतात.

या विशेष हॉस्पिटलसोबतच सरकार अधिकाधिक पेशंट्सना क्वारंटाईन करण्यासाठी जागा तयार करते आहे. जे परदेशातून आलेले आहेत किंवा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत वा कोणत्याही प्रकारे संशयित आहेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं आहे. शिवाय जर पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढत गेली तर प्रत्येकाला आयसीयू असलेल्या विशेष हॉस्पिटलमध्ये ठेवता येणार नाही आणि वैद्यकीय तज्ञांच्या मते तशी गरजही नसते.

पण त्यांना सर्वांपासून वेगळं क्वारंटाईन करण्याची गरज असते जोपर्यंत त्यांची टेस्ट निगेटिव्ह येत नाही. पण त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुणे आणि परिसरात मोकळ्या जागा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

"सध्या पुणे शहरात आणि जिल्ह्यात मिळून 9000 फ्लॅटस क्वारंटाईनसाठी तयार ठेवण्यात आले आहेत. त्यातले 350 हे पुणे शहरात आहेत.आम्ही अशा जागांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत.

काही संशयित आहेत, ज्यांच्या टेस्ट्सचे रिपोर्ट यायचे आहेत ते अशा ठिकाणी असतील," पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'बीबीसी मराठी'ला सांगितलं.

ही बातमी लिहिली जाते आहे त्यावेळेपर्यंत अगोदरच्या 48 तासांमध्ये पुणे परिसरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही आहे आणि 5 पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांची टेस्ट उपचारांनंतर निगेटिव्ह आल्यावर परत घरी सोडले आहे. पण तरीही भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना कोणालाही नाही. त्यामुळे पुढच्या टप्प्यासाठी पुण्यासारखी शहरं तयात होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)