कोरोना व्हायरस : खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत - मुख्यमंत्री #5मोठ्याबातम्या

लीड फोटो Image copyright SOCIAL MEDIA
प्रतिमा मथळा लीड फोटो

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत- मुख्यमंत्री

खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, "खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरू ठेवणे गरजेचे आहे. करोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वांना ओळखपत्र देत आहोत. त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी या सर्वांचा समावेश असेल."

सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

2. आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार, खासदारांचे एक महिन्यांचे वेतन सहाय्यता निधीसाठी देण्यात येईल, अशी घोषणा पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. हिंदुस्तान टाईम्स मराठीनं ही बातमी दिली आहे.

या संदर्भात काढलेल्या अधिकृत पत्रकात शरद पवार म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा, या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.”

“विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती आणि उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठाम उभा आहे,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदाराआणि आमदारांनी सुद्धा त्यांचं वेतन सहाय्यता निधीला देण्याचं जाहीर केलं आहे.

3. 'भीम जयंती कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीमजयंती साजरी करूया. त्या आधी करोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा, असंही ते म्हणाले आहेत.

4. राज्यातील 12 ते 13 हजार कैद्यांची मुक्तता

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील 12 ते 13 हजार कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन घरी सोडण्याचा निर्णय गृह विभागानं घेतला आहे. सकाळने बातमी दिली आहे.

यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावलेल्या तसंच 7वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्या मात्र 2 वेळा पॅरोलवर जाऊन नियमानुसार वेळेत परतलेल्या कैद्यांना सोडण्यात येणार आहे.

तर 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा होऊ शकेल, अशा कच्च्या कैद्यांना सोडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

5. कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात

कोरोनाविरुद्धचा लढा लढण्यासाठी बजाज समूहाकडून 100 कोटी रुपये सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार असल्याची करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे.

तर गोदरेज समूहानंही 50 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे,.

याशिवाय महेंद्रसिंग धोनीनं पुण्यातल्या मजुर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 1 लाख रुपयांची मदत दिली आहे, तर अभिनेत्री अँजेलिना जोलीनं साडे सात कोटींची मदत जाहीर केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)